
कुणकेश्वर किनाऱ्यालगत जो रस्ता आहे त्याला समांतर असा पूर्वेकडे एक रस्ता आहे. एमटीडीसी कडे जाणाऱ्या रस्त्यावरून पुढं जायचं. एका आमराईत असलेल्या छोट्या टेकाडावर ही सातवाहनकालीन गुहा आहे. गुगल मॅप्स वर शोधताना पांडव लेणी असा टॅग पहा म्हणजे ती सापडेल. गुहा खासगी जागेत असल्याने स्थानिकांना विचारून पायवाटेने २० मीटर चढून वर गेले की लगेच डाव्या बाजूला गुहा दिसते. गाडीरस्त्यापासून जेमतेम ५ मिनिटे लागतात तिथं पोहोचायला.

ही गुहा १०० वर्षांपूर्वी १९२० मध्ये या ठिकाणची साफसफाई करताना इथल्या ग्रामस्थांना सापडली. तेव्हा मोठ्या शिळेने गुहेचे तोंड झाकून ठेवलेले होते. मूळ बौद्ध विहार असलेल्या या गुहेत मध्ययुगीन काळात मूर्तिभंजकांच्या हल्ल्यांपासून रक्षण करण्यासाठी काही मूर्ती/ मुखवटे इथं आणून ठेवले गेले.

आज इथं आत एक शिवलिंग आणि नंदी दिसतो. त्याबरोबरच अनेक मुखवट्यांच्या जोड्या आहेत. स्त्री-पुरुष अशी जोडी असलेले हे मुखवटे म्हणजे कदंबकालीन एखाद्या राजघराणे परिवारातील लोकांच्या समाधी आहेत असं इतिहास अभ्यासक संशोधक श्री रणजित हिर्लेकर सांगतात.

कोकणात पर्यटन म्हणजे निसर्ग आणि इतिहासाच्या, संस्कृतीच्या सहवासात केलेली भ्रमंती. दर्या फिरस्ती प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातील किनारपट्टीचा प्रवास आणि तिथल्या महत्त्वाच्या ठिकाणचे डॉक्युमेंटेशन करत आहोत. आता दुसऱ्या टप्प्यात मुंबई ठाणे पालघरही करायचे आहे. पण गेली दहा वर्ष ही भ्रमंती करत असताना मला लक्षात आलेली गोष्ट म्हणजे कोकण कधीच पाहून होत नाही. एखादं ठिकाण पाहताना काही नवीन जागा समजतात, त्या पाहू म्हणजे झालं असं म्हणून गेलं की नवीन जागांच्या यादीत भर पडते आणि कोकणात पुन्हा येण्याचं आमंत्रण मिळालेलं असतं.
अद्भुत माहिती धन्यवाद. हो कोकण म्हणजे खरंच एक कधीही न उलगडणारे कोडे आहे