Darya Firasti

समरभूमी कुलाबा

Aerial view of Fort Kulaba


अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरची जानेवारीतील एक सकाळ. एरवी पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेलेल्या या चौपाटीवर नीरव शांतता अनुभवणे म्हणजे विलक्षणच. निरभ्र आणि थंड सकाळी क्षितिजावर दिसणारा कुलाबा किल्ला. ओहोटीनंतर किनाऱ्यावर उरलेली पाण्याची नक्षी. नांगरून ठेवलेल्या होड्या आणि वाऱ्याने फडफडणारे त्या होड्यांवरचे झेंडे. किनाऱ्यावर सुरु झालेली सकाळची लगबग. सागरगडाच्या दिशेने दिसणारे ढगांचे पुंजके आणि धुक्याची चादर. दूर कुठेतरी मंदिरात लागलेल्या भजनाची कानावर पडणारी अस्पष्ट चाहूल. रात्रभर मासेमारी करून परतणाऱ्या होडीच्या डिझेल इंजिनचा ताल आणि थंड वाळूतून चालताना नितळ पाण्याचा पायाला होणार स्पर्श. या किल्ल्यावर मी पूर्वी अनेकदा आलो आहे. पण पर्यटकांनी गजबजलेल्या अलिबाग किनाऱ्यावर आणि कोलाहलाने भरून गेलेल्या आसमंतात असा अनुभव घेणे अशक्य. मुंबईतून मी साडेचारच्या सुमारास निघालो आणि फक्त अडीच तासांत अलिबागला पोहोचलो. किनाऱ्यावर रोज सकाळी चालायला किंवा व्यायाम करायला येणाऱ्या अलिबागकरांशिवाय कोणीच नव्हतं. सूर्योदयापूर्वी पसरलेल्या प्रकाशाने किल्ल्याची तटबंदी दिसू लागली होती. महादरवाजा गाठेपर्यंत सूर्यबिंब पूर्वेला डोकावू लागलं आणि सोनेरी किरणांनी काळ्या चिऱ्यांनी रचलेले बुरुज उजळू लागले होते. भवानी मंदिराच्या पूर्वेला असलेल्या तटावरून अलौकिक भासणारा सूर्योदय मी अनुभवत होतो

Sunrise at Fort Kulaba

महादरवाजा पाहायचा बाकी होता तरीही त्या सोनेरी उन्हात किल्ल्याचा आसमंत अनुभवावा म्हणून आधी गडफेरीला निघालो. पश्चिमेकडील बुरुजावर चालायला सुरुवात केली की सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतात दोन धातूच्या भक्कम तोफा. या तोफा लोखंडी गाड्यावर ठेवलेल्या आहेत आणि नीट लक्षपूर्वक पाहिलं तर या तोफा ब्रिटिश बनावटीच्या आहेत हे आपल्याला दिसतं. इंग्लंडमधील यॉर्कशर येथे असलेल्या कारखान्यात या तोफा १९व्या शतकात ओतल्या गेल्या.

English canon at Fort Kulaba

या तटावरून उत्तरेकडे नजर टाकली तर आपल्याला दिसतो उपदुर्ग सर्जेकोट आणि मुख्य किल्ल्याला उपदुर्गाशी जोडणारा दगडी पूल. महादरवाजा सुरक्षित राहावा म्हणून बांधलेला तटबंदीचा एक घेरही आपल्याला इथून दिसतो. समुद्राकडे पाहिलं तर किल्ला ज्या खडकाळ बेटावर बांधला गेला आहे त्याचा विस्तार स्पष्ट दिसतो. बुरुजांना लागूनच असलेली पुळणही दिसते.

Bastion design

किनाऱ्याला समांतर अशी उत्तर दक्षिण पसरलेली तटबंदी पाहत आपण पुढं जातो. इथं संरक्षक बुरुजांची एक विशिष्ट रचना आपल्याला दिसून येते. बुरुज आतल्या बाजूने एका अर्ध वर्तुळाकार भिंतीने संरक्षित केलेला दिसतो आणि या भिंतीत असलेले दरवाजे बुरुजाकडे एका खोलगट भागात घेऊन जातात. ही रचना कदाचित संरक्षक सैन्याला दारूगोळा, हत्यारे पुरवण्यासाठी असू शकेल. पण तज्ज्ञच यामागचे कारण स्पष्ट सांगू शकतील.

तटावरून चालत जाताना एक विलक्षण दृश्य मला दिसले. सूर्य आता हातभर वर आला होता. बुरुजाखालील दरवाजाच्या कमानीचे फोटो काढत असताना पूर्व दिशेला नजर गेली तर गणेश मंदिराच्या कळसाजवळ सूर्यबिंब आलेलं दिसलं. पुन्हा एकदा उगवतीलाच शांत वातावरणात लगबगीने किल्ल्यावर पोहोचल्याबद्दल मी स्वतःची पाठ थोपटून घेतली. मला वाटतं की कोणतेही पुरातत्व स्थळ पाहत असताना जर आपण विचारपूर्वक वेळ निवडली तर केवळ फोटोच चांगले येतात असं नाही तर एकंदर ते स्थळ पाहण्याचा अनुभव सुद्धा अधिक संपन्न असतो.

Yashwant/ Darya Darwaja

तटालगत सरळ चालत जाऊन दक्षिणेकडे यशवंत दरवाजा गाठायचा. तिथं असलेल्या दगडांच्या राशीवरून मागच्या बाजूला वाळूवर येऊन उभं राहिलं की यशवंत दरवाजाची भव्यता लक्षात येते. मागे हनुमानाचे देऊळ आहे. तिथं मारुतीरायाला नमस्कार करून थोडा विसावा घ्यायचा. ओहोटी असेल तर मागच्या खडकाळ भागाचा विस्तार सहज लक्षात येतो.

West side fortification

१९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला.

कान्होजी आंग्रेंना समुद्रावरील शिवाजी असं म्हंटलं गेलं आहे. त्यांनी मराठा आरमाराचा दरारा पश्चिम किनारपट्टीवर निर्माण केला. इंग्लिश, पोर्तुगीज, डच, सिद्धी अशा कसलेल्या आरमारी सत्तांना मोठं आव्हान उभं केलं. त्याला प्रत्युत्तर देण्याचा या सत्तांनी अनेकदा प्रयत्न केला परंतु कान्होजींनी त्यांचा वारंवार पराभव केला. अशाच एका लढाईचा साक्षीदार हा कुलाबा किल्ला आहे. इथं इंग्लिश आणि पोर्तुगीजांच्या संयुक्त सैन्य मोहिमेचा कान्होजींनी दारुण पराभव केला. त्यांच्या समर्थ आरमाराला मदत म्हणून थोरल्या बाजीराव पेशवेंनी पिलाजी जाधवरावांच्या नेतृत्वाखाली घोडदळाची तुकडी पाठवली होती. मराठ्यांच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जावा असा हा क्षण. या लढाईची सविस्तर माहिती देण्यासाठी मला एक वेगळा ब्लॉग लिहावा लागेल. तूर्तास आपण आपली गडफेरी सुरु ठेवू.

यशवंत दरवाजातून आत आल्यानंतर समोरच कान्होजींची घुमटी दिसते. तिथं या महत्त्वाच्या आरमारी सेनापतीचं स्मरण करायचं. मनोहर माळगावकरांनी लिहिलेल्या आणि पु ल देशपांडेंनी उत्तम भाषांतर केलेल्या कान्होजींच्या चरित्रातून माझी ओळख या अलौकिक योद्ध्याशी झाली. हे कान्होजींचे उत्तम चरित्र तर आहेच पण कोकणच्या मध्ययुगीन इतिहासातील एक महत्त्वाचं दालन आपण या पुस्तकातून रंजक पद्धतीने पाहू शकतो. पुढे डॉ सचिन पेंडसेंनी लिहिलेल्या मराठा आरमारावरील पुस्तकातून आणि बी के आपटेंच्या पुस्तकातून याबद्दल अधिक माहिती मिळत गेली आणि कोकणातील या ठिकाणांबद्दलचे कुतूहल वाढत गेले.

Tunnel under fortification

तिथून उजवीकडील पायवाटेने पूर्व दिशेचा तट गाठायचा. छत्रपती शिवरायांच्या दुर्ग बांधणीतील अजून एक वैशिष्ट्य इथं पाहता येते. तटाच्या खालून भिंतीच्या बाहेरच्या बाजूला उघडणाऱ्या झरोक्याकडे भुयारी मार्गातून जाता येते. या रचनेमागे सामरिक कारण असले पाहिजे. सकाळच्या वेळेला किल्ल्यात गेलो तर या झरोक्यातून येणारा सूर्यप्रकाशाचा कवडसा पाहण्याचा अद्भुत अनुभव मिळतो. इथून भिंतीलगत उत्तरेकडे सरकायचे. जुन्या वाड्यांचे अवशेष दिसायला लागतात. हजरत हाजी कमाल उद्दीनशहा दरबार ह्यांच्या दर्ग्याकडे इथून जाता येते. तिथंच अलीकडे जमिनीखाली नेणारी एक पायऱ्यांची वाट दिसते. खाली गेलं की अंधारात थंड पाण्याची विहीर आहे असं आपल्या लक्षात येतं.

दर्ग्या समोरच दगडी बांधकाम केलेली पुष्करणी आहे. काही ठिकाणी या ठिकाणाचा उल्लेख अप्सरा तलाव असा केलेला दिसतो. या पुष्करणी पलीकडे सिद्धिविनायक मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम रघुजी आंग्रे दुसरे यांनी १७६१ साली केले. मंदिराजवळ असलेली दीपमाळ खूप सुंदर आहे. इथं केलं गेलेलं कोरीवकाम नक्की पाहायला हवं. मला इथं पाहिलेलं तुळशी वृंदावन खूपच आवडलं होतं. इथं बाजूलाच शिवमंदिर आणि हनुमान मंदिरही आहे. गावकरी या स्थानाची देखभाल मनापासून करतात. मी जरी अज्ञेयवादी असलो तरीही अशा ठिकाणी गर्दी नसेल, कोलाहल नसेल तर काही मिनिटे शांत बसून डोळे मिटून ध्यान करायला मला नक्की आवडतं.

Kanhoji remembrance place

पुन्हा आपली पावले महादरवाजाकडे वळू लागतात. आंग्रे घराण्यातील सदस्यांच्या वाड्यांचे अवशेष आपण पाहू शकतो. या किल्ल्याच्या बाबतीत मोठं दुर्दैव म्हणजे इथं अनेकदा अग्नितांडव होऊन आगीत बांधकामे भस्म झाल्याचा नोंदी आहेत. आज किल्ल्यात जाळून टाकलेलं तण आणि त्यातून धुमसणाऱ्या निखाऱ्यांना पाहताना मला हा इतिहास आठवला. पुढं पद्मावती आणि गुलवती अशा दोन देवतांची मंदिरे आहेत. तिथं नमस्कार करून महादरवाजात यायचं. दरवाजाच्या कमानीजवळ विविध शिल्पं कोरलेली दिसतात. गणपती, गरुड, कमळ चिन्ह अशी विविध चिन्हे आपण लक्षपूर्वक पाहू शकतो.

Motifs on Mahadarwaja
Aerial view of Sarjekot

ओहोटी संपून जर भरती पुन्हा सुरु झाली नसेल तर आपल्याकडे उपदुर्ग सर्जेकोट पाहण्यासाठी अजून काही वेळ आहे. थंडगार वाळूतून अनवाणी भटकत किल्ल्याच्या तटबंदीचे निरीक्षण करत सर्जेकोट गाठायचा. सर्जेकोटाची गोष्टसुद्धा तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. पण त्यासाठी आपल्याला स्वतंत्र ब्लॉग लिहावा लागेल. कोकण किनाऱ्यावरील सर्व ठिकाणांची चित्रकथा वाचण्यासाठी दर्या फिरस्तीला नियमित भेट देत रहा ही अगत्याची विनंती.

2 comments

  1. मृण्मयी

    लेख छानच झालाय. किल्ला नव्याने समजला. पुन्हा पाहणार blog च्या मदतीने.

  2. Pingback: झुंजार पद्मदुर्ग | Darya Firasti

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: