Darya Firasti

वेत्येचा विलक्षण सागरतीर

प्राचीन काळी अट्टीवरे म्हणून प्रसिद्ध असलेले गाव म्हणजे आजचे अडिवरे तिथलं महाकालीचे देऊळ तर सर्वांना माहिती आहेच परंतु त्या देवळामधील मूर्ती तिथे कुठून आली असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर एका ऐतिहासिक दंतकथेमध्ये सापडेल. अडिवरेच्या उत्तरेला एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे वेत्ये. या गावातल्या समुद्रकिनाऱ्यावर ही मूर्ती ग्रामस्थांना सापडली. 1

कोळ्याच्या जाळ्यात वेत्ये जवळ महाकालीची मूर्ती सापडली आणि मग तिची स्थापना भाऊ महादेव शेट्ये नामक एका धनिक व्यापाऱ्याने अडिवरे येथे केली असे सांगितले जाते. त्यामुळे वेत्ये गाव हे महाकालीचे माहेर अशी मान्यता आहे. अतिशय सुंदर असा हा वेत्ये समुद्रकिनारा जेमतेम दोनशे ते अडीचशे मीटर लांब असेल. उत्तर टोकाला एक टेकाड तर दक्षिणेला तिवरे खाडीचे मुख अशी त्याची व्याप्ती. कशेळी कडून अडिवरेच्या दिशेने जाणाऱ्या सागरी महामार्गावरून इथं जाण्यासाठी एक फाटा कोंभे नामक गावाजवळ येतो. तिथं उजवीकडे वळून आपण ३-४ किमी प्रवासानंतर वेत्ये किनाऱ्यावर पोहोचतो. तिवरे खाडीच्या पलीकडं दिसते ती वाडा-तिवरे आणि गोडिवणे ची लांबलचक किनारपट्टी. इथल्या सुरुच्या बनाची हिरवळ इथल्या शुभ्र पांढऱ्या पुळणीच्या पार्श्वभूमीवर उठून दिसते.

इथलं पाणी अतिशय स्वच्छ, त्यामुळे दिवसाच्या कोणत्याही वेळेला लखलखणाऱ्या लाटांच्या खाली समुद्राचा तळ अगदी सहज पाहता येतो. इथं मी दोनवेळा गेलो आहे. दोन्ही वेळेला अजिबात गर्दी नव्हती त्यामुळे निसर्गाच्या सहवासात इथं मनसोक्त निवांत एकटेपणा अनुभवता आला. वाळूत आडवं पडून पाण्याच्या अगदी जवळ जाऊन लाटांची आवर्तने पाहण्याचा मोह मला आवरला नाही

खाडीच्या दिशेने थोडं पुढं चालत गेलो तेव्हा वाळूत उमटलेली पायवाट आणि किनाऱ्यावर पसरलेली सागरी वनस्पतीची जाळी दिसली. या वनस्पतीने किनाऱ्याची धूप होणं कमी होतं असं शास्त्रज्ञ मानतात. या वनस्पतीचे नाव मर्यादा वेल (Ipomoea pes-caprae) किंवा गोट्स फूट.. नावाप्रमाणेच ही वेल समुद्राला सीमा घालते. भरतीची रेषा कधी हिला ओलांडत नाही. किनाऱ्यावर सगळ्यात पुढे ही वनस्पती दिसते. कधीकधी जांभळ्या रंगाची सुंदर फुलेही दिसतात. कोणी या वनस्पतीला बीच मॉर्निंग ग्लोरी म्हणते तर कोणी अजून काही. ब्राझीलमध्ये सालसा दे प्राया नावाने प्रसिद्ध ही वनस्पती पोटाच्या विकारांवर उपचारासाठी वापरली जाते. ऑस्ट्रेलिया आणि फिलिपिन्समध्येही ही औषधी गुणांसाठी वापरली जाते.

ओहोटीच्या वेळेला तिवरे खाडी ओलांडून गोडिवणे गाठता येत असेल असा माझा कयास आहे. गोडि यावणे हा एक नितांत सुंदर आणि गर्दी विरहित लांबलचक किनारा आहे. याची लांबी ४-५ किमी तरी असावी. कधीतरी आंबोळगड गावात मुक्काम करून मग इथं सागर भ्रमंतीला जायला हवं.

चालत चालत खाडीच्या टोकाला गेलो तिथं मला एक होडी दिसली. नांगरून पाण्यात न ठेवता किनाऱ्यावर खेचून आणून ठेवलेल्या होड्या मला फार गमतीशीर वाटतात. जणू काही पोहायच्या कामातून त्यांनी निवृत्ती घेतली आहे आणि आता निर्विकारपणे त्या पाण्याकडे पाहत बसल्या आहेत असा भास होतो. ओहोटी सुरु होती बहुतेक. खाडीपल्याड एक काका चिखलातून चालत निघाले होते. पुन्हा एकदा मला खाडी ओलांडून गोडिवण्याकडे जाण्याचा मोह आवरेना. पण आंबोळगड, यशवंतगड करून मुक्कामाला विजयदुर्ग गाठायचा असल्याने बेत रहित केला. दरवेळी कोकणात आलं की यावेळी काम झालं आहे, किमान हा भाग तरी छान कव्हर झाला आहे असं वाटतं. पण पुढच्या वेळी जास्त वेळ काढून इथं यायला काही न काही निमित्त सापडतं ते असं. कोकणाची ओढ म्हणा, भुरळ म्हणा अशीच आहे. हल्लीच मी ब्राझीलमध्ये कामासाठी गेलो होतो तेव्हा अनेक सुंदर समुद्रकिनारे पाहून आलो. पण कोकण आपलं आहे म्हणून मनात घर करून राहतं हे नक्की. कुठं लांब प्रवास करून भारावलेल्या अवस्थेत इथं भटकावे लागत नाही कारण हे आपलं अंगणच आहे. ते नीट पाहायचं असेल तर वेळापत्रक आणि घाई सोडून पायी चालायची तयारी ठेवून आणि सोबतीला डोळस पर्यटन करण्यास उत्सुक मंडळी घेऊन यायला हवं.

Leave a comment