देवगड तालुक्याचे उत्तर टोक म्हणजे विजयदुर्ग किल्ला. टोम्बोलो किंवा भूशीर नामक भौगोलिक रचनेवर हा किल्ला बांधला गेला आहे. या किल्ल्याला स्वतःचा समुद्रकिनारा आहे. तिथून दक्षिणेकडे आले म्हणजे दामलेमळा, कोठारवाडी, कालवशी वगैरे किनारे आहेतच. हे किनारे शोधता शोधता मी अरबी समुद्राला भिडलेल्या एका खडकाळ टापूवर पोहोचलो. गिर्ये च्या रामेश्वराच्या मागे असलेला एक कच्चा रस्ता आपल्याला या ठिकाणी घेऊन जातो.

या ठिकाणी मी मागे एकदा म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ च्या आसपासही आलो होतो परंतु अंधार पडायला लागला होता त्यामुळे किनाऱ्यापर्यंत जाऊन भटकता आले नव्हते. रामेश्वर मंदिराच्या मागे एक छोटासा झरा आहे.. त्यावर पूल बांधलेला असून तिथून पुढे पाव किमी डांबरी रस्ता आहे.. त्यानंतर आपण सड्यावर पोहोचतो आणि एक कच्ची गाडीवाट आपल्याला दिसू लागते. त्या पुलाजवळ जर झऱ्यापाशी उतरले तर एक जुना दगडी बंधारा पाहता येतो. हा शिवकालीन बंधारा असून इथं हत्ती आणले जात असं स्थानिक सांगतात. मला त्याबद्दल ऐतिहासिक माहिती मिळालेली नाही.. ती मिळाली की एक स्वतंत्र ब्लॉग लिहिता येईल. मी कच्च्या रस्त्याने घडीवाडी किनाऱ्याच्या सुमारे २०० मीटर अंतरावर आलो. मागच्या वेळी इथं टाटा नॅनो घेऊन आलो होतो. यावेळेस आमचा विद्युत रथ नेक्सन इव्ही इथं पार्क केला आणि किनाऱ्याकडे चालू लागलो

अतिशय रुक्ष राकट असं हे ठिकाण. किनारा म्हणावा तर वाळूची पुळण नाही.. समुद्रापर्यंत असलेली लाल माती आणि जांभा खडकाचे चित्रविचित्र आकार. महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे भौगोलिक सर्वेक्षण करून पुण्याचे प्राध्यापक श्रीकांत कार्लेकर यांनी फार माहितीपूर्ण पुस्तके लिहीली आहेत. हल्ली या विषयावरील महाराष्ट्राची सागर संपदा असे नवीन आणि फोटो युक्त पुस्तक मला माझी मैत्रीण मानसी सोमण मराठेंच्या संग्रहात वाचायला मिळाले. विशाल भावे अतुल साठे आणि दीपक आपटे या पुस्तकाचे लेखक. त्यांच्या मते असे खडकाळ किनारे आणि तिथली डबकी हे जैव वैविध्याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठिकाण असते. इथं प्रवाळ, शैवाल, कालवे, विविध प्रकारचे खेकडे, समुद्री गोगलगायी वगैरे साठी उत्तम अधिवास असतो.

अशावेळेला भ्रमंती करत असताना सोबत तज्ज्ञ मंडळी असावी किंवा त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सगळं काही शोधत हिंडायला मुबलक वेळ तरी हवा. या प्रदेशात विशेषतः मुटाट नावाच्या ठिकाणी प्राध्यापक श्रीकांत कार्लेकरांनी जांभा खडकाच्या आश्रयाने वसलेल्या समुद्र संपत्तीवर संशोधन केले आहे. पण अशा गोष्टी पर्यटक म्हणून ३ दिवसात १० ठिकाणे पाहणाऱ्या लोकांना दिसत नाहीत. त्यांना कशाला नावे ठेवा.. मी फोटोग्राफर म्हणून सगळी कोकण किनारपट्टी म्हणून हिंडलोय पण जैव-विविधता, भूगोल या अंगाने फील्डवर्क करायचं म्हंटलं तर एक जन्म पुरणार नाही.

ओहोटी संपून बहुतेक भरतीला सुरुवात झाली होती. दगडाच्या कपारींतून आत घुसणारे समुद्राचे पाणी लॅटेराइट आणि तिथल्या शेवाळाच्या सान्निध्याने हिरवट गढूळ दिसत होते. काही डबक्यांमध्ये छोटेसे मासे दिसले.. ऊन खात बसलेले खेकडेही दिसले. मला निघायला तसा उशीरच झाला होता त्यामुळे उन्हाची तिरीप वाढली होती. माझ्या आसपास नजरेच्या टप्प्यात कोणीही दिसत नव्हते. एक प्रकारचे गूढपण त्या वातावरणात मला जाणवले. उकाड्याने आणि आर्द्रतेने असह्य झालेला मी आता या कपारीच्या सावलीत थोडा विसावलो होतो. अशावेळी लाटांची खळखळ अगदी सौम्य असते.. पैंजणाचा आवाज येतो तशी.. थोडी विश्रांती घेतल्यानंतर इथूनच टेकाड चढून गिर्येचा किनारा गाठता येईल का किंवा किमान पाहता तरी येईल का या विचाराने मी समुद्राला लागूनच असलेला तो २०० फुटी डोंगर चढू लागलो.

इथं वर पोहोचताना माझी ओबडधोबड खडकांनी बरीच दमछाक केली. पण माथ्यावर पोहोचल्यानंतर मला घामाने डबडबलेल्या अंगावर थंडगार वर घेऊन जरा बरं वाटलं. तापमान ३० डिग्री सेल्शियस च्या आसपास असेल पण आर्द्रतेने जास्ती थकवा येत असावा. अशावेळी भरपूर पाणी पीत राहणं आणि सनस्क्रीन वापरणं महत्वाचं. मला लक्षात आलं की मॅपवर अगदी शेजारी आहे असं भासणारा गिर्ये किनारा टेकडीपलीकडं दूर आहे. ही पूर्ण टेकडी उतरून किनारा पाहून परत चढून येऊन गाडी गाठण्यापेक्षा दुसऱ्या वाटेने जाणे जास्त योग्य ठरेल. पण खडकाळ असला तरीही स्वच्छ पुळणीने नटलेला गिर्ये किनारा आणि त्यामागे सागरी कडे आणि कालवशी च्या दक्षिणेची सुटावलेली टोके दिसत होती. या ठिकाणी जाण्याची सोपी वाट म्हणजे विठ्ठल मंदिराजवळ कच्च्या रस्त्याने सड्यावर गाडी जिथवर नेता येईल तिथवर न्यायची आणि मग सुमारे दोन किमी पायपीट करायची आपली तयारी हवी. रामेश्वराजवळच्या हत्ती महाल शिवकालीन बंधाऱ्याचा इतिहास कोणाला सापडला तर नक्की शेयर करा.. पुढच्या भ्रमंतीत गिर्ये, कालवशी आणि कोठारवाडी किनाऱ्यांची पाहणी करू. तोवर राम राम.