Darya Firasti

सागर निवासी दत्तगुरु

दापोली तालुक्यात हर्णे-मुरुड-कर्दे असा प्रवास करत बुरोंडी-कोळथरे च्या दिशेने निघाले की वाटेत किनाऱ्यापाशी लागणारे गाव म्हणजे लाडघर. इथले तामसतीर्थ प्रसिद्ध आहे कारण इथल्या पाण्याला तांबूस रंग आहे. किनाऱ्यावरील मातीत असलेल्या विविध धातूंच्या गुणधर्मामुळे हे होत असावे. हा भाग पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. इथं वेळेश्वर मंदिरही आहे. पण तिथं पुढं न जाता कर्दे गावातून समुद्राला लागून असलेल्या मार्गाने लाडघर गावाचे उत्तर टोक गाठायचे. तिथं रस्त्याला उतार लागण्याआधी उजवीकडे दत्त मंदिर परिसर दिसतो. तिथं दत्त-गुरूंचे दर्शन घ्यायचे.

इथल्या दीपमाळेचा आकार खूपच आकर्षक आहे. एप्रिल २०२२ मध्ये मी गेलो होतो तेव्हा नुकतीच रंगरंगोटी झाली होती. आधी श्रीगणेशाचे दर्शन घ्यायचे, थोडे निवांत बसायचे आणि मग नंतर कौलारु दत्त मंदिरात प्रवेश करायचा. ऐकीव माहितीप्रमाणे हे मंदिर १८८० ते १८९० मध्ये पांडुरंग संभाजी मोरे यांनी दृष्टांत झाल्यावर बांधले. त्यांना स्वप्नात गावाच्या उत्तर बाजूला असलेल्या टेकडीवर औदुंबराच्या बुंध्याशी दत्त पादुका सापडतील असा दृष्टांत झाला होता. इथेच काळभैरवाचे स्थानही आहे कारण मंदिर स्थापने नंतर उत्सवाच्या वेळी कोण्या उपासकाचा वाघाने बळी घेतला होता आणि मग संरक्षण म्हणून काळभैरवाला आमंत्रित करण्यात आले.

एका पुस्तकात मी हा एकमुखी दत्त असल्याचे वाचले होते परंतु इथं मात्र मला नेहमीची मूर्तीच दिसली. कदाचित हा हल्लीच्या काळातील बदल असू शकेल. स्थानिक जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. मंदिराच्या आत दरवाज्यावर केलेल्या नोंदीप्रमाणे मंदिराची स्थापना १७६८ साली झाली.

जटाधरं पाण्डुराङ्गं शूलहस्तं कृपानिधिम् । 
सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ॥ १॥ 
अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारदऋषिः । 
अनुष्टुप् छन्दः । श्रीदत्तपरमात्मा देवता । 
श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥ 
जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहार हेतवे । 
भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १॥ 

नारदमुनी विरचित दत्त-स्तोत्राची आठवण मला झाली. देवळात दत्त जयंती साठी वापरली जाणारी पालखी आहे आणि मूर्तीसमोर पादुकांची पूजा केली जाते. लाकडी जाळीची वेगळीच रचना असलेला इथला गाभारा मोहक आहे.

या टेकडीच्या मागे समुद्रकिनाऱ्यापाशी एक खडकाळ मंच आहे. तिथं पर्यटक, कोळी बांधव, ग्रामस्थ मुले असे सगळे जात असतात त्यामुळे तिथं एक चैतन्य मला जाणवलं. सूर्यनारायणाने आता आपले तेज समुद्रात अर्पण करायला सुरुवात केली होती. कोकण ही देवभूमी आहे. परशुरामांनी वसवलेली भूमी.. तितकीच निसर्गदेवतेने अगणित वर देऊन समृद्ध केलेली भूमी सुद्धा. इथं सूर्यास्त पाहताना सूर्य, समुद्र आणि मी हे तेच असलो तरीही अनुभव मात्र नवीन भासतो. त्यामुळे इथं भटकंती करत असताना निसर्गभक्तीच्या रसात आपण स्वतःला कधी अर्पण करून टाकतो ते कळतच नाही. हेच अद्वैत सहज साधणारी भूमी म्हणजे अपरान्त भूमी.

दत्त मंदिर परिसरात दक्षिण टोकाला एक पायवाट आपल्याला लाडघरच्या समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाते. जांभा दगडात पायऱ्या बांधल्या असल्याने हा उतार आपण अगदी सहजपणे उतरून खाली येतो. पण तुमच्याकडे गाडी असेल तर मात्र डांबरी रस्त्याने खाली गावात उतरावे लागते. रस्ता अगदी खाडीच्या टोकापर्यंत जातो.

सूर्यास्ताला आता तासभर उरला होता त्यामुळे त्या दिवसाची सांगता किनाऱ्यावर बसूनच करायची असं मी ठरवलं होतं. दिवसभर चालून, शूट करून दमलो होतो. पाणी संपलं होतं. खिशात मूठभर शेंगदाणे होते ते खाल्ले आणि शरीराची बॅटरी थोडी चार्ज केली. इथं भेळेच्या गाड्या नव्हत्या आणि वॉटर स्पोर्ट्स साठी जमलेली गर्दी सुद्धा नव्हती.. जवळच रिसॉर्ट मध्ये उतरलेले काही पर्यटक समुद्रस्नान करत होते.. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली जोडपी सूर्यास्ताची किमया एकत्र पाहायला थांबली होती. पण किनारा निर्मनुष्य नसला तरीही शांत होता..

लाटांची लयबद्ध आवर्तने आणि त्यांच्यात उतरलेली सोनसळी किरणे.. मी कितीही प्रयत्न केला तरी त्या अनुभवाला शब्दबद्ध करणे आवाक्याबाहेरचेच.. अशावेळी कविता आठवतात.. बा. भ. बोरकरांच्या चांदणवेलीतील एक पुष्प मला आठवले

इंद्रनील चंद्रकांत सांध्यसुंदरी ही
येइ हसत मधुर मंद विश्वामंदिरीं ही …..

उंबर्‍यांत धुउनि उन्हे धूळ माणकांची
मूर्ति सजल-पारिजात-कांत पावलांची
नेसुनि ये वसन नरम तलम अंजिरी ही ….

मंदानिल दुडदुडुनी बिलगले पदांला
उचलुनि त्यां मृदुल करें लाविलें उराला
चुंबुनि त्यां मोहरली स्नेहमंजिरी ही …

कुरवाळुनि बोलवि ही बोबडया खगांना
लावुनि गालांस बोट खुलवि वल्लरींना
एक एक नवलदिवा लावि अंबरीं ही ….

व्यथित मना … कर जोडुनि स्मर ‘शुभं करोति’
स्थिरचर एकाग्रचित्त जाहलें सभोतीं
वाहाया तुजवर ये शांतिनिर्झरी ही

सूर्य मावळला आणि मी तिथेच समुद्राचा ख्याल ऐकत तासभर बसलो. आता आकाशात अंधाराचे आगमन व्हायला लागले होते. गाडी काढून मी कोळथरे च्या दिशेने निघालो. कोळथरे गावात उतरणारा फाटा पकडण्यापूर्वी कोल्ह्याचे दर्शन झाले. आज गजब का है दिन म्हणावं असाच दिवस होता.

One comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: