Darya Firasti

वारसा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा

दक्षिण मुंबईतील एक आलिशान इमारत.. ब्रिटिशकालीन वास्तू.. मुंबईच्या वैभवाची साक्ष देणारा तिथला माहौल.. भारतातील मोठ्या शहरांमध्ये आणि थेट युरोपात आढळणारी मध्ययुगीन गॉथिक वास्तुरचना शैली आणि तिला लाभलेलं भारतीय रुपडं. सव्वाशे वर्षांहून अधिक जुन्या इमारतीत गेल्यावर होणारी भूतकाळात प्रवास केल्याची अनुभूती आणि तिथून बाहेर आजच्या जगाकडे पाहताना जाणवणारी कालविपर्यस्तता (anachronism) फ्रेडरिक विल्यम स्टीफन्स ने डिझाईन केलेल्या आणि सीताराम खंडेरावांनी बांधकाम केलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीत आल्यानंतर मन अन मेंदू १९व्या शतकाच्या शेवटी जाऊन पोहोचले होते.

विश्व वारसा स्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरच ही देखणी इमारत उभी आहे. समोरच मुंबईतील आद्य लोकप्रतिनिधींपैकी एक फिरोजशाह मेहतांचा पुतळा आहे. अतिशय भव्य अशी ही इमारत बाहेरून नेहमीच पाहिली आहे. पण खाकी टूर्स च्या आणि एमटीडीसी च्या तर्फे एका रविवारी ही इमारत आतून पाहण्याचा योग आला. सुरक्षा तपासणी नंतर आत गेल्यावर इमारतीची भव्यता नीट लक्षात आली.

दगडी जिने चढून वर जाण्याआधी लक्ष वेधून घेते ते सिंह आणि ड्रॅगन च्या मिश्रणातून निर्माण झालेले हे शिल्प. मुंबई शहराच्या विकास आणि वैभवाच्या रक्षणासाठी सिद्ध झालेला हा योद्धा इथं आजही तैनात आहे. त्याचा प्रचंड आकार आणि रेखीव सौंदर्य यातून एक प्रकारचा जिवंतपणा या शिल्पाला लाभला होता. या इमारतीच्या डिझाईन साठी एक स्पर्धा घेण्यात आली होती ज्यात रॉबर्ट चिझमच्या इंडो सारासेनिक शैलीतील (हिंदू-मुस्लिम शैलींचा संगम असलेली शैली) डिझाईन ला प्रथम पुरस्कार मिळाला होता. पण प्रति-लंडन उभे करण्याच्या इराद्याने इथं बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय उभारू पाहणाऱ्या ब्रिटिशांना इथं व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील बांधकाम करणेच जास्त प्रशस्त वाटले आणि काहीतरी तांत्रिक कारण देऊन रॉबर्ट चिझम चे डिझाईन बाद केले गेले आणि गॉथिक शैलीतील भव्य इमारतीचा मार्ग मोकळा झाला.

रॉबर्ट चिझम ने केलेल्या डिझाईन ची निवड झाली असती तर इमारत वर दिलेल्या चित्राप्रमाणे दिसली असती. याच शैलीत रॉबर्ट चिझम ने वडोदरा येथील लक्ष्मी-विलास राजवाडा, चैन्नई येथील सिनेट हाऊस अशा इमारती बांधल्या आहेत. मुंबईतही इंडो-सारासेनिक शैलीत जीपीओ आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय अशा इमारती बांधल्या गेल्या. पण आज मुंबईची शान असलेल्या आणि विश्व वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त अनेक गॉथिक व्हिक्टोरियन इमारती सर बार्टल फ्रेयर या ब्रिटिश अधिकाऱ्याची देणगी आहेत असं म्हणायला हरकत नाही. या प्रयत्नांना स्थानिक नागरिकांचाही पाठिंबा होताच. या भव्य इमारतींना लागणारा दगड मालाड आणि कुर्ला येथील खाणींतून आणला गेला होता. सीताराम खंडेरावांसारखे इंजिनिअर आणि वेंकू बाळू कालेवार असे कंत्राटदारही या कामात सामील होते.

हे बांधकाम डिझाईन करण्यापूर्वी स्टीव्हन्स ने युरोप मधील अनेक टाऊन हॉल्स चा अभ्यास केला. त्याने गॉथिक शैलीत भारतीय-पौर्वात्य प्रतीकांचा वापर करण्याचे ठरवले. इमारतीत अनेक ठिकाणी केलेल्या कोरीवकाम याची झलक दिसते. पहिल्या मजल्यावरील छज्जावरून व्हेनेशियन शैलीतील सिंह आणि समोरच असलेले स्टीव्हन्सनेच आरेखन केलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसही दिसते.

या इमारतीचा आतून दिसणारा घुमट आणि बाहेरचा घुमट या दोन्हींच्या मध्ये जागा आहे. त्या जागेत सुमारे १ लाख ८२ हजार लीटर पाण्याची टाकी आहे. ही इमारत पूर्णतः विद्युतीकरण केलेली असून घुमटांच्या आत असलेल्या टाकीचे पाणी हायड्रॉलिक लिफ्ट चालवण्यासाठी वापरले जात असे. त्या काळातील ही एक अतिशय आधुनिक इमारत होती. सर बार्टल फ्रेयर ने इथं Urbs Prima in Indis म्हणजेच भारतातील प्रथम श्रेणीचे शहर अशा बोधवाक्याची योजना केलेली दिसते. त्यासाठी हेम्स नावाच्या ब्रिटिश शिल्पकाराने एक शिल्पही घडवले आहे. इंग्लिश अक्षर व्ही च्या आकारातील ही इमारत जमिनीच्या त्रिकोणी तुकड्यावर बांधली गेली आहे. दर्शनी भागाची उंची तिची भव्यता वाढवते तर आत गेल्यानंतर दिसणारी छोटी बाग इमारतीमधील मोकळ्या जागेला हिरवा साज देते.

इमारतीच्या बांधकामाला १८८९ मध्ये सुरुवात झाली तर बजेटपेक्षा कमी रक्कम वापरून निर्मिती १८९३ साली पूर्ण झाली. २३५ मीटर उंच ही इमारत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पेक्षा २० फूट उंच असली तरीही दोन्ही इमारतींचे स्वतंत्र अस्तित्व जाणवते. घुमटाची रचना विजापूर येथील गोल गुंबजापासून प्रेरित आहे असे क्रिस्तोफर लंडन सारखे कला इतिहासकार सांगतात.

इथं आत फेरफटका मारला की आयुक्तांची कचेरी आणि सभासदांसाठीचे सभागृह पाहता येते. खिडक्यांवर स्टेन ग्लासने सुंदर चित्रे काढली आहेत. महापौरांची खुर्ची पाहण्याची सोयही इथं करण्यात आली आहे. ६५ फूट लांब ३२ फूट रुंद आणि ३८ फूट उंच सभागृह मुंबई शहराच्या सन्मानाला साजेशा दिमाखात बांधले गेले होते. २००१ साली इथं वास्तुविशारद विकास दिलवारी यांच्या मदतीने संवर्धन करण्यात आले. ग्लासगो आणि बर्मिंघम येथील नगरपालिका सभागृहांतील रचनेची काही वैशिष्ट्ये इथं वापरण्यात आली आहेत. ब्लॅकवूड आणि टीक या दोन उत्कृष्ट दर्जाच्या लाकडांमधील इथले काम विनब्रिज आणि कंपनी ने मुंबई येथे केल्याची नोंद सापडते.

या इमारतीत असलेले जाळीचे कोरीवकाम जेजे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये काम करणाऱ्या तेलगू कारागिरांनी केल्याचे सांगितले जाते. मुंबईचा किल्ला पाडून शहराचे जो विस्तार सर बार्टल फ्रेयर ने केला त्याचा एक मानबिंदू म्हणून या इमारतीकडे पाहता येईल. फ्रेयर च्या काळात इतरही अनेक उत्कृष्ट गॉथिक इमारतींची निर्मिती झाली. समुद्राला समांतर एका रेषेत यातील अनेक इमारती आहेत. सचिवालय, मुंबई विद्यापीठाचे पदवीदान सभागृह आणि वाचनालय, जे जे स्कूल ऑफ आर्टस्, गोकुळदास रुग्णालय, सेलर्स होम (आजचे महाराष्ट्र पोलीस मुख्यालय) अशी अनेक उदाहरणे देता येतील. प्रेमचंद रायचंद यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ देणगी देऊन उभा केलेला राजाबाई टॉवरही याच काळातील. स्टीव्हन्स वयाच्या बावन्नाव्या वर्षापर्यंत मुंबईत राहिला आणि मलेरियामुळे त्याचा मृत्यू ओढवला त्याच्या मुलाने म्हणजे चार्ल्स स्टीव्हन्स ने रिगल सिनेमा सारख्या आर्ट डेको इमारतींची रचना केली. त्यांची गोष्ट पुन्हा केव्हातरी.

One comment

  1. अप्रतिम 👌👌
    हे जतन केलंय आणि आता इतरांना दर्शनासाठी उपलब्ध करुन दिलंय, ह्याचाच हेवा वाटावा, अशी वास्तू !!!
    Thanks for Sharing 🙏

Leave a reply to Sanjay Pethe Cancel reply