कोकणात सूर्योपासना महाराष्ट्राच्या इतर भागांपेक्षा कदाचित जास्त होत असावी. कर्णेश्वर देवळातील सूर्य, खारेपाटण ची सूर्यमूर्ती, आरवली चा सूर्य, कशेळी चा आदित्यनारायण अशी अनेक मंदिरे. संगमेश्वर तालुक्यातील एक शांत, निर्मळ सुंदर गाव म्हणजे आंबव. पोंक्षे मंडळी आंबव गावची त्यामुळे गावाला पोंक्षे-आंबव म्हणत असावे. पेशवाईत दांडेकर मंडळी इथं आली आणि त्यांनी अनेकांना पोसले म्हणून त्यांना पोंक्षे म्हंटले जाऊ लागले असं मी श्री आशुतोष बापटांच्या पुस्तकात वाचलं. या गावात आधी आठवडी बाजार भरत असे.. आंग्रेकाळात तो पुढं माखजनला गेला असं वाटतं. इथलं पूर्वाभिमुख सूर्यमंदिर महत्त्वाचं देवस्थान आहे.

गावातील ६ पोंक्षे मंडळी रोज एक एक दिवस पूजन करत, या पद्धतीला सहाव्या म्हणतात असे बापट सांगतात. आणि रविवारी एकत्र पूजन केले जाते.. सौर अभिषेक केला जातो. मंदिराचे बांधकाम नवीन वाटते. गाभाऱ्यात पूर्वी असलेली मूर्ती बदलून आरवली ला गेली आणि इथं नवीन मूर्ती १८२१ मध्ये स्थापन झाली. नंतर त्या मूर्तीस काही इजा झाल्याने १९३७ ला नवीन मूर्ती घडवली गेली जी आज दिसते असं प्र. के. घाणेकर सांगतात. सूर्याच्या मूर्तीच्या दोन्ही हातांत कमळे असतात असा संकेत आहे. इथे मात्र मूर्तिकाराने शंख-चक्र कोरले आहेत. ही प्रतिमा कमळात विराजमान असून सात घोड्यांचा रथ आणि त्याचे सारथ्य करणारा अरुणही दिसतो.

या परिसरात अनेक मंदिरे आहेत. बुरंबाड चा आमणायेश्वर, सरंद चा नारायण, राजवाडीचा सोमेश्वर, कसब्याच्या डोंगरावरील सप्तेश्वर आणि कसबा गावातील कर्णेश्वर व इतर प्राचीन देवालये. कोकणात नव्या पद्धतीचे, नवीन वास्तुरचना असलेले एखादे सूर्यमंदिर निर्माण केले तर? भारताच्या पूर्व किनाऱ्यावर जसे कोणार्क आहे तसेच पश्चिम किनाऱ्यावर एखादे सूर्यस्थान होऊ शकते. दर्या फिरस्ती करता करता अशा कल्पना सुचत असतात.
संदर्भ
आशुतोष बापट
प्राध्यापक प्र के घाणेकर