कोकणातील सर्व समुद्र किनाऱ्यांचे चित्रण करता करता जिथे गाडी जात नाही अशा अनवट अनाघ्रात ठिकाणांचा शोध घ्यायला मी सुरुवात केली. बाकाळे, फणसे अशी ठिकाणे पाहिली. गोडीवणे ते वेत्ये अशी लांबलचक किनाऱ्यांची भ्रमंती सुद्धा केली. पण काही ठिकाणे अजूनही बाकी आहेत. विशेषतः रत्नागिरी शहर परिसर आणि त्याच्या दक्षिणेला असणाऱ्या टप्प्यात काही पुळणी शिल्लक आहेत जिथे गुगल मॅप्स वर वाळूचा मोठा पट्टा तर दिसतो पण तिथवर पोहोचायचा मार्ग मात्र सापडत नाही. जून 2026 ची एक दुपार.. मी आणि माझा मित्र ऋत्विज अशाच एका किनाऱ्याच्या शोधात निघालो होतो. रत्नागिरीतील मिऱ्या डोंगराच्या पलीकडे असलेला एक किनारा. मिऱ्यातील डोंगर गाडीने चढून सड्यावर जायचे आणि पश्चिमेकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने जिथवर गाडी नेता येईल तिथवर जाऊन मग 11 नंबरची बस पकडून किनाऱ्यावर उतरायचे असे ठरवले. आम्हाला मार्गदर्शन करायला भाटवडेकर साहेब सुद्धा आले होते.

रत्नागिरीतील काळा पांढरा समुद्र तसे परिचित आहेत. मिऱ्याजवळ अलावा नामक छानसा किनारा सुद्धा आहे आणि मिऱ्या डोंगराच्या उत्तरेला काळबादेवीच्या खाडीचे दर्शन देणारे एक ठिकाण सुद्धा पाहता येते. इतर दोन किनारे गाठायला मात्र सड्यावरून पायपीट करून जावे लागते. तिथे कदाचित पुढे डांबरी रस्ता बनवण्याचा बेत असेल पण कच्चा रस्ता मात्र खूपच खडबडीत होता. जिथवर उतार लागला नाही तिथवर गाडी नेऊन पार्क केली आणि रुंद पायवाटेने पुढे निघालो. समुद्र अजूनही दिसत नव्हता पण समुद्राची गाज ऐकू यायला लागली होती. दर्या फिरस्ती करतानाची ही वेळ जरा चुकलीच होती. मे महिन्यात निघता आले नाही आणि मग जून उजाडला तेव्हा हातात जेमतेम 4-5 कोरडे दिवस उरले होते. पाऊस पडत नव्हता पण दाटून आला होता. डोंगर उतरण्यापूर्वी दक्षिणेला क्षितिजावर रत्नदुर्गाची टेकडी आणि दीपगृह ढगांच्या चादरीत अर्धवट लपलेले दिसले. आम्हाला साधारण एक किलोमीटर अंतर आणि शंभर एक मीटर उतार पार करून किनाऱ्यावर उतरता येईल असे दिसले. उन्हाळा जेमतेम संपून पावसाळा सुरूही झाला नव्हता पण तरीही सड्यावर छान हिरवळ होती. आमच्यासारखीच किनारी भ्रमंती करून वर परतणारा एक म्हशींचा कळप आम्हाला ओलांडून वर गेला. आता वाळू दिसायला लागली होती.

समुद्रकिनाऱ्याला भिडणाऱ्या डोंगररांगा हे रत्नागिरी जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य आहे. इथून पुढे उतार कमी तीव्र होत होता आणि वळणदार वाटेने आम्ही समुद्रसपाटीकडे जाऊ लागलो होतो. आकाश निस्तेज भासत होते. पावसाळ्याच्या राखाडी रंगाचे सावट काहीसे खिन्न करणारेच भासले. अजून सूर्यास्त व्हायला तास दीड तास वेळ तरी होता.. पण पाऊस कोसळायला सज्ज होता आणि वरुणदेवाने आपल्या आगमनाची वर्दी द्यायला सुरुवात केली होती. लाल मातीची पायवाट संपून खाली उतरलो तेव्हा किनाऱ्याचा खडकाळ पट्टा आमच्या समोर आला.

हा किनारा अर्धा खडकाळ होता तर अर्धा वळूने भरलेला. राखाडी आकाशाच्या नेपथ्यासमोर भारतीच्या लाटांची गर्जना अधिकच गंभीर वाटत होती. खडकाळ किनाऱ्याचा मंच लाटांना थोपवून धरत होता. काळ्या राकट दगडांच्या अध्ये मध्ये पाणी पसरू लागलेले होते. टेकडीच्या उतारावर रेंगाळलेली गुरे कोरड्या झालेल्या गवतावर ताव मारत होती. हा किनारा पाहून आम्ही न भिजता गाडीपर्यंत काही पोहोचत नाही अशी चिन्हे दिसायला लागली होती. सावळी सावळी सांज हे शब्द यापूर्वी कवितेत ऐकले होते खरे पण आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो.

जवळपास अर्धा तास दोन हजार पावले एक किलोमीटर आणि सव्वा तीनशे फूट उंची एवढे अंतर पार करून आता आम्ही मिऱ्याच्या या रम्य किनाऱ्यावर येऊन पोहोचलो होतो. ढगांचा पडदा काहीसा उघडला होता आणि मावळतीच्या सूर्यनारायणाने तिथल्या पाण्यावर वाळूवर सोनेरी-केशरी किरणांची पखरण केली होती. किनाऱ्यावरच उतरलेल्या मिऱ्या डोंगराच्या एका शाखेने किनाऱ्याला कुंपण घातले होते. दोन खडकाळ टोकांच्या मधोमध ही स्वच्छ मऊ वाळूची पुळण विसावलेली दिसत होती. चपला काढून ठेवल्या आणि त्या तलम वाळूवर काही पावले चालून परतलो. पश्चिम दिशेने खाऱ्या वाऱ्याची झुळूक थोडा गारवा आणत असली तरी तापमान तीस डिग्रीच्या वर आणि आर्द्रता शंभरीजवळ जाऊन पोहोचलेली होती. काही क्षण कोणीच कोणाशी बोलत नव्हते. तिथे उभे राहून निसर्गाचे ते रूप पाहणे, स्वतःत तो अनुभव सामावून घेणे एवढेच आम्ही करू पाहत होतो. अशावेळी कविता वगैरे सुचतात .. पण ती संध्याकाळ अंतर्मुख करणारी होती.. मनात काहीच विचार नव्हते. त्या शांततेत. लाटांचा आवाज, वाऱ्याची गुणगुण आणि माझ्याच हृदयाच्या ठोक्यांचा आणि श्वासाचा आवाज एवढ्या गोष्टी मला स्पष्ट जाणवत होत्या. पश्चिमेकडे नजर गेली तेव्हा त्या रंगमंचावर सूर्याची एंट्री झालेली होती.

हा सूर्यास्त पाहताना मला सुधीर मोघेंनी लिहिलेले ऋतू हिरवा मधील सांज ये गोकुळी आठवलेच.. माऊली सांज अंधार पान्हा .. विश्व सारे जणू होय कान्हा.. या ओळी त्या वेळेचे, त्या अनुभवाचे वर्णन करायला अगदी समर्पक वाटत होत्या.. काही वेळ संध्याप्रकाशाची ती चित्रकारी पाहून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. त्यावेळी दिसलेले दृश्य मात्र अगदी विषण्ण करणारे होते. मला अनेकदा लोक सांगतात की अशा ठिकाणांची माहिती देत जाऊ नकोस कारण लोक गर्दी करतील आणि कचरा वाढवतील.. मला ही भीती अतिशय रास्त वाटते. पण बाकाळे, मिऱ्या, दांडेवाडी असे किनारे पाहून मला लक्षात आलेली गोष्टी ही की जिथे माणसे जात नाहीत अशाही ठिकाणी लोकांनी इतरत्र टाकलेला कचरा भारतीच्या प्रवाहाबरोबर वाहत येऊन जमा होत जातो..


भरतीच्या रेषेकडे नीट पाहिले, तर ती केवळ समुद्राची सीमा नव्हती. ती निसर्ग आणि मानव यांच्या सवयींची सीमारेषा होती. एका बाजूला वाळू, खडक आणि लाटा; दुसऱ्या बाजूला प्लास्टिक, रबर आणि थर्माकोल. समुद्राने दोन्ही एकत्र आणले होते, पण त्यांचा जन्म एकाच जगात झाला नव्हता. किनाऱ्यावर संध्याकाळच्या प्रकाशाइतकीच एक गोष्ट मनात घर करून राहिली—भरतीने किनाऱ्यावर टाकलेला प्लास्टिकचा पसारा. समुद्राला त्याची गरज नाही, किनाऱ्याला त्याची सवय नाही; तरीही प्रत्येक लाटेबरोबर तो पुन्हा येतो. निसर्गाने लाखो वर्षांत घडवलेला हा किनारा आपण काही दशकांत कृत्रिम कचऱ्याच्या थराखाली दडपून टाकत आहोत, ही जाणीव त्या क्षणी अधिक अस्वस्थ करून गेली. समुद्रकिनारा स्वच्छ करत राहणे आवश्यक आहेच, पण समुद्रात टनावारी कचरा पोहोचूच न देणे अधिक महत्त्वाचे आहे. भरती प्रत्येक वेळी आपल्याला दोषी ठरवत नाही; ती फक्त पुरावा किनाऱ्यावर आणून ठेवते. नद्यांच्या मुखाशी आणि खाड्यांमध्ये कचरा अडवण्याची व्यवस्था झाली, गावोगावी प्लास्टिकचे योग्य व्यवस्थापन झाले, तर समुद्राला हा अवांछित भार वाहून न्यायची वेळच येणार नाही. अंदमान सारख्या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील ठिकाणी जशी कडक नियमावली आखून कचऱ्याला रोखले जाते तसेच कोकणातही करायची गरज निर्माण झाली आहे.

किनाऱ्यावर प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग पाहून खराब झालेला मूड सूर्यास्त आणि भरतीच्या फेसाळत्या लाटा पाहून थोडा ठीक झाला.. रत्नदुर्गावर जमा होऊ लागलेले ढग या दिशेने येत आहेत की नाही हे मधल्या टेकडीमुळे दिसायला मार्ग नव्हता. आता आम्ही सगळे पावसाच्या आत मिऱ्या डोंगराचा माथा गाठायला म्हणून लगबगीने सड्याच्या दिशेने चढू लागलो. अशा दुर्गम किनार्यांची सफाई करण्यासाठी छोटे ट्रॅक्टर आणि ट्रॉली वापरता येईल का असा मनात विचार डोकावला. रत्नागिरी शहराला मिऱ्याचा डोंगर लागूनच असला तरीही तो काहीसा दुर्लक्षित भागच आहे असे म्हणता येईल. डोंगराच्या दक्षिणेला अजून एक छोटासा किनारा आहे. पुढच्या वेळी तिथे जाऊन पाहू असा मनोमन निश्चय करून परतत होतो. अर्ध्या तासापेक्षा थोड्या कमी वेळातच आम्ही गाडीपाशी पोहोचलो.

समोर दिसणारे दृश्य अद्भुत होते. रत्नदुर्ग आणि दीपगृह परिसरातच ढग ठाण मांडून बसलेले होते. काळ्याकुट्ट मेघांचा तांडा भगवतीच्या डोंगरावर छत्र धरून मुसळधार वर्षाव करीत होता. रत्नागिरीच्या दीपगृहाची शलाका त्या आसमंतातील एकमेव जिवंत गोष्ट आहे असे भासत होते. आमच्या दिशेने वारा घोंगावू तर लागला होता पण पावसाचे चिन्ह अजूनही नव्हते.

अंदाजे पाव लीटर घाम गाळून आम्ही चढाई पूर्ण केली असे मला माझे फिटनेस वॉच सांगत होते. अंधार पडण्याच्या आधीच डांबरी रस्ता गाठून ऋत्विज आणि मी पुन्हा शहरात आलो. हॉटेलकडे परत जाताना आठवडी बाजारच्या गर्दीत गाडी अडकली. मिऱ्या डोंगर परिसर आणि रत्नागिरीतील बाजार ही दोन ठिकाणे फक्त काही किलोमीटर दूर असली तरीही दोन भिन्न विश्वे भासावी इतकी वेगळी होती. दुसऱ्या दिवशी पावसाने साथ दिली (म्हणजे खरं तर सुट्टी घेतली) तर गणेशगुळेच्या दक्षिणेला असलेल्या कुर्धे येथील दोन समुद्रकिनारे पाहायचे असा बेत डॉ सुरेंद्र ठाकुरदेसाई सरांच्या बरोबर केला होता. आताशा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शंभरहून अधिक किनारे चित्रित करून झाले आहेत. आता कुर्धे, रणपार अशी काही मोजकी ठिकाणेच बाकी आहेत.