मुंबई गोवा महामार्गावरील खारेपाटण हे एक प्रकारे सिंधदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणता येईल. राजापूरहून कणकवलीच्या दिशेने जाताना महामार्गाच्या उजव्या बाजूला हे नगर आपल्याला दिसते. या ठिकाणचे महत्त्व कोकणाच्या इतिहासात फार जुने आहे. एकेकाळी ही व्यापारी पेठ होती आणि अर्जुना नदीतून व्यापारी जहाजे सामान घेऊन आतवर येत असत. बारबोसा याने या जागेचे वर्णन अरापतनी असे केलेले दिसते. भात, भाजा, मासे मीठ यांची ही बाजारपेठ होती. इथे अनेकदा मलबारी चाचे आश्रय घेत असत असंही बारबोसा म्हणतो. 1571 मध्ये इथे पोर्तुगीजांनी जाळपोळ केल्याची नोंद फेरिश्त्याने केली आहे. 1713 पासून पुढे हे स्थान आंग्रेंकडे होते. 1819 मध्ये मोठ्या बोटी इथे येत असल्याने हे व्यापारासाठी उपयुक्त बंदर असल्याची नोंद ब्रिटिशानी केलेली दिसते. तेव्हा इथून 90,700 रुपयांची निर्यात तर 1,61,000 रुपयांची आयात झाल्याचे दस्तऐवज आपल्याला सांगतात. इथे कालभैरवाचे मंदिरही फार प्रसिद्ध होते. त्याचा आता जीर्णोद्धार केला गेला आहे.


बर्जेसच्या यादीत खारेपाटण येथील ताम्रपटांचा उल्लेख आहे. मराठी विश्वकोशातील माहिती अनुसार दुसरे शिलाहार घराणे दक्षिण कोकणात राज्य करत होते ज्यांची राजधानी बलिपट्टन म्हणजेच आजचे खारेपाटण येथे होती. इथे हिंदू आणि मुस्लिम अशा दोन मोठ्या वस्त्या होत्या. दक्षिणी जैन मंडळींचेही हे एक ठिकाण..इथेच जवळ नदीत काळ्या संगमरवरात घडवलेली जैन मूर्ती सापडली होती. विशेष म्हणजे ज्यू बांधवांची थडगीही इथे सापडतात.


पण इथली सर्वात प्रेक्षणीय आणि अमूल्य गोष्ट म्हणजे इथल्या कपिलेश्वर मंदिरात असलेला शिल्पकलेचा वारसा. सूर्याची पाषाण मूर्ती. अगदी घरासारख्याच भासणाऱ्या या मंदिरातील अमूल्य असा पुरातत्व वारसा पाहून आपण थक्क होतो. गाभाऱ्याच्या भिंतीला टेकून दोन मूर्ती आपल्याला दिसतात. एक अतिशय बारीक कलाकुसर केलेली सूर्य देवतेची मूर्ती तर दुसरी काहीशी ओबडधोबड आणि अपूर्ण वाटणारी विष्णूची मूर्ती. या मूर्तीच्या आयुधांचा क्रम पाहिला असता तो पद्म, शंख, चक्र आणि गदा आहे त्यामुळे ती केशव मूर्ती आहे हे लक्षात येते. या मूर्तीच्या पायाशी आपल्याला दोन छोट्या मूर्ती दिसतात. त्यापैकी एक विष्णूचे वाहन गरुड आहे तर दुसरी लक्ष्मी.


कोकणाला सूर्य भक्तीची परंपरा आहे असे म्हणायला हरकत नाही. सूर्य, आदित्य, आदित्य नारायण, कनकादित्य, आदित्यनाथ अशा विविध नावांनी सूर्याचे कोकणात विविध ठिकाणी पूजन होते. कर्णेश्वर, व्याडेश्वर अशा ठिकाणी सूर्य पंचायतनात आहे.. तर कशेळीचा कनकादित्य, आंबव अशा ठिकाणी स्वतंत्र मंदिरे दिसतात. डॉ गो. बं देगलूरकर यांनी एका लेखात कोकणात इराणी/ पर्शियन सूर्योपासक मंडळी समुद्र मार्गे आली असावीत असा अंदाज वर्तवला आहे. इराणी पद्धतीच्या मूर्तींमध्ये सूर्य मूर्तीच्या पायात पावसाळी बूट असतात तसे बूट आणि लष्करी गणवेशात असतात तसे छातीवर एकमेकांना छेद देणारे (छन्नवीर) पट्टे असतात असे दिसते. खारेपाटण च्या कपिलेश्वर मंदिरात आढळणारी सूर्य मूर्ती मात्र सातव्या शतकातील चालुक्य पद्धतीची मूर्ती असावी असे देगलूरकर सांगतात.

कोकणात शास्त्रोक्त भ्रमंती करणारे आणि अनेकांना अशा डोळस भ्रमंतीची गोडी आपल्या पुस्तकांद्वारे आणि सहलींच्या द्वारे लावणारे भारतविद्या तज्ज्ञ आशुतोष बापट सरांना आम्ही मूर्तीशास्त्र किंवा पुरातत्वातील पटकन न कळलेल्या गोष्टींचे बारकावे विचारत असतो. इथे मूर्तीच्या पायाशी दिसणारी चार छोटी शिल्पे कोणाची असे मी त्यांना विचारले. हातात कमळ घेतलेल्या सूर्य पत्नी आणि दंड तसेच दौत हातात धारण करणारे त्याचे दंड व पिंगल हे त्याचे सेवक आहेत असे आशुतोष सरांनी सांगितले. इतक्या रेखीव मूर्तीची उंची सुमारे एक मीटरपेक्षा जास्त आहे आणि तिच्या मागे दिसणारी प्रभावळ अगदी संतुलित आणि नक्षीदार अभिकल्पनेची आहे तिच्यावर मकर तोरण आहे. (दोन टोकांना दोन मगरी आहेत)

बृहत संहितेत सूर्याच्या कमरेवरील कपड्यांना अव्यांग आणि वियांग असे म्हंटले गेले आहे. तैतेरीय आरण्यकात सूर्याच्या 7 शिल्पांचा उल्लेख आहे. याचा अर्थ वेदकाळात सुद्धा सूर्याच्या मूर्तीचे पूजन होत असावे असे गोव्याच्या इंद्र प्रकाश प्रभुशास्त्री त्यांच्या शोध निबंधात सांगतात. सांब पुराणात सूर्यभक्तीचा अधिक तपशील मिळतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या गोमांतकात सुद्धा चालुक्यकालीन सूर्य मूर्ती पाचव्या शतकापासून दिसतात असे सांगितले जाते. बृहत संहितेतील वर्णनात सूर्यमूर्ती चेहरीपट्टी आणि बांध्याच्या बाबतीत प्रमाणबद्ध रेखीव असावी असे म्हंटले आहे. इथेही आपल्याला अतिशय सुंदर मुकुट, गळ्यात आभूषणे आणि कानात कुंडले दिसतात. आशुतोष जी सांगतात – या मूर्तीच्या गळ्यात एकावली, फलक हार, वैकक्षक, यज्ञोपवीत, प्रलंब हार, कानात पत्र कुंडले, दंडात बाजूबंद, पायात पादांगद, डोक्यावर करंड मुकुट दिसतो.

विजयदुर्गच्या मुखातून वाघोटन खाडीत शिरलेली व्यापारी गलबते भरतीच्या पाण्यावर स्वार होत थेट खारेपाटणच्या प्राचीन बलिपत्तन बंदरापर्यंत येत असत. इथे उतरलेला माल बावडा आणि फोंडा घाट ओलांडत देशावरच्या बाजारपेठांकडे रवाना होत असे. या गजबजलेल्या व्यापारमार्गाचे, समृद्ध बंदराचे आणि तत्कालीन राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला उभारण्यात आला. आठव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत तब्बल हजार वर्षांचा इतिहास आपल्या तटबंदीवर कोरून ठेवणारा हा किल्ला आजही त्या वैभवशाली काळाची साक्ष देत उभा आहे.

इ.स.च्या आठव्या शतकात दक्षिण कोकणावर शिलाहारांची सत्ता होती. शिलाहार राजा श्वम्मियर (इ.स. ७८५–८२०) याने खारेपाटण येथे किल्ला उभारून आपली राजधानी स्थापन केली. पुढे अनेक सत्तांतरांचा साक्षीदार ठरलेला हा किल्ला इ.स. १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात दाखल झाला. राजापूर जिंकल्यानंतर महाराजांनी खारेपाटण किल्लाही आपल्या ताब्यात घेतला. याच काळात राजापूर येथे पकडलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्डला काही काळ या किल्ल्यातील अंधारकोठडीत कैद करून ठेवण्यात आले.


खारेपाटण गावाच्या मधोमध असलेल्या एका छोट्याशा टेकडीवर हा किल्ला विसावलेला आहे. एकेकाळी एका बाजूला वाघोटन खाडी आणि जमिनीच्या बाजूला खोल खंदक अशा दुहेरी संरक्षणकवचाने तो सुरक्षित होता. काळाच्या ओघात गावाचा विस्तार झाला आणि खंदक इतिहासजमा झाले. आज गावातून शाळेकडे जाणाऱ्या पायऱ्यांची वाटच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. किल्ल्यात प्रवेश करताच मातीत अर्धवट गाडलेले बुरुज आणि तटबंदीचे अवशेष नजरेस पडतात. बालेकिल्ल्यावर दुर्गादेवीचे मंदिर असून स्थानिक परंपरेनुसार ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आले, अशी श्रद्धा आहे. मंदिराशेजारील विहिरीतून एक गुप्त भूयार असल्याची आख्यायिका सांगितली जाते. या भूयाराचे दुसरे टोक खाडीकिनाऱ्यावरील घोडेपठार येथे झुडुपांमध्ये लपलेले असल्याचे स्थानिक दाखवतात.





याशिवाय किल्ल्यावर ‘सुळाचा दगड’, उध्वस्त वास्तूंचे चौथरे आणि इतिहासाच्या अनेक मूक खुणा आजही भटक्यांचे लक्ष वेधून घेतात. इथल्या सती शिळा, भग्न मूर्ती पाहून… दुर्गादेवी आणि जरीपटक्याला मनापासून वंदन करून मी देवगडच्या दिशेने पुढे निघालो.

खारेपाटणच्या इतिहासाला भक्कम आधार देणारा सर्वांत महत्त्वाचा पुरावा म्हणजे शिलाहार राजा रट्टराजाने इ.स. १००८ (शक ९३०) मध्ये दिलेला ताम्रपट. संस्कृत भाषेत आणि नागरी लिपीत कोरलेल्या या ताम्रपटातून दक्षिण कोकणातील शिलाहार राजांची वंशावळ, त्यांची राजकीय स्थिती आणि खारेपाटणच्या तत्कालीन वैभवाची मौल्यवान माहिती मिळते. यात रट्टराजाने आपल्या वडिलांनी उभारलेल्या अव्वेश्वर (अव्वेश्वर/अव्वेश्वर महादेव) मंदिरासाठी गावे, जमिनी आणि विविध महसुलांचे दान दिल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे परदेशातून येणाऱ्या जहाजांवरील कर, तसेच बंदरात येणाऱ्या व्यापारी नौकांकडून मिळणाऱ्या महसुलाचाही उल्लेख या ताम्रपटात आढळतो. यावरून अकराव्या शतकाच्या प्रारंभीच खारेपाटणचे प्राचीन बलिपत्तन हे केवळ एक किल्लेवजा नगर नव्हते, तर देश-विदेशातील व्यापारी जहाजांची वर्दळ असलेले समृद्ध सागरी बंदर होते, हे स्पष्ट होते. त्यामुळे खारेपाटणचा ताम्रपट हा केवळ दानपत्र नसून कोकणच्या सागरी व्यापार, बंदर व्यवस्था आणि शिलाहारकालीन आर्थिक समृद्धीचा समकालीन दस्तऐवज म्हणून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
या ब्लॉग साठी श्री आशुतोष बापट यांची खूप मदत झाली त्याबद्दल मनःपूर्वक आभार.