
चौल रेवदंडा भागात ऐतिहासिक ठिकाणांची रेलचेल आहे. इथं भ्रमंती म्हणजे विविध काल आणि संस्कृतींच्या विश्वातून भ्रमंती करणे. १८८८ साली लिहिल्या गेलेल्या कुलाबा गॅझेटमध्ये या इतिहासाचा मागोवा घ्यायला गेलं तर बरीच रंजक माहिती मिळते. तेव्हाच्या शिरगणती प्रमाणे चौल-रेवदंड्यात ६९०८ लोकांची वस्ती होती. यापैकी ६०७२ हिंदू, ४९३ मुस्लिम, २३ बेने इस्राएल आणि ३२० इतर धर्मीय होते असेही समजते. हा परिसर पोर्तुगीज किल्ल्यासाठी ओळखला जातो पण पंचक्रोशीत हिंदू देवळे आणि इस्लामी इमारतीही अनेक आहेत. चौलचे दत्त स्थान प्रसिद्ध आहे. तिथं जाणाऱ्या रस्त्यातून चौल नाक्याहून सराई गावात पोहोचलं की निजामशाही किंवा बहामनी शैलीचा एक वाडा रस्त्यालगत दिसतो. त्याला कलावंतिणीचा वाडा किंवा कलावंतिणीचा महाल या नावाने ओळखले जाते.

ही इस्लामी पद्धतीची दगड आणि चुना वापरून बांधण्यात आलेली इमारत आहे. तीन घुमट आणि तीन कमानी असलेले हे बांधकाम घडीव दगडांच्या प्रमाणबद्ध रचनेतून साधण्यात आले आहे. त्याचं एक राकट सौंदर्य आहे.

कुलाबा जिल्हा गॅझेट आणि आंग्रेकालीन अष्टागर या पुस्तकांमध्ये मला ही माहिती मिळाली. परंतु या वास्तूच्या निश्चित कालनिश्चिती आणि उपयोगितेबद्दल कोणत्याही कागदपत्रातील संदर्भ उपलब्ध नाही.

सराई गाव आणि जवळपासच्या परिसरातील मुलं इथं क्रिकेट खेळायला येत असतात. मी गेलो होतो तेव्हाही इथं एक अटीतटीची मॅच रंगात आलेली दिसली. माझ्या कॅमेरासाठी या मंडळींनी आनंदाने पोझही दिली.

या परिसरातच चौलची लेणी, दत्त देवस्थान, हिंगलजा माता अशी अनेक ठिकाणे पाहण्याजोगी आहेत. सोमेश्वर नावाचे श्री शंकराचे देवस्थानही आहे. इथून साधारणपणे अर्धा किलोमीटर दूर एक बारव आहे असं मी वाचलं. पुढच्या भेटीत तिचा शोध घ्यावा असा संकल्प आहे. या बारवेत १७८२चा शिलालेख असून, श्री शके १७०४ शुभकृत नाम संवत्सरे, श्री विठ्ठल चरणी शामजी त्रिंबक प्रभू सोपरकर अशी नोंद त्यावर कोरलेली आहे.

या वास्तूच्या मागच्या बाजूला मोकळी जागा आहे. तिथं डाव्या बाजूला पायऱ्या आहेत. त्यांनी चढून आपण घुमटांच्या पातळीवर जाऊन पोहोचतो. मागच्या माळरानाचे दृश्य इथून छान दिसतं.

कलावंतिणीच्या महालामागे ५० फूट अंतरावर तीन कमानी असलेली मशीद आहे. हे बांधकामहीदगड आणि चुना वापरून केलेलं आहे. यात पश्चिम दिशेला प्रार्थनेसाठी मिहराब आहे. छतावरील दगड कोसळून मोकळी जागा निर्माण झाली आहे त्यातून सूर्यप्रकाश पाहणे हा एक स्मरणीय अनुभव असतो.

कलावंतिणीचा महाल पाहून चौलकडे परतत असताना उजवीकडे एक रम्य तळ्याचा परिसर नजरेला पडतो. तिथं काठावर बसून दिसणाऱ्या मोहक लँड्स्केपचा आनंद जरूर घ्यायला हवा. चौलच्या दत्ताचा डोंगर आणि हिरवळीने भरलेल्या काठाचं प्रतिबिंब असलेलं नितळ पाणी.

या तळ्याच्या पश्चिम दिशेला एक टेकाड आहे, त्यावर मशीद आहे असं स्थानिक सांगतात. गुगल मॅपवर इथं भोवाळे देवीचे स्थान आहे असं दर्शवलेला टॅग आहे. परंतु गॅझेटमधील माहितीनुसार हा एक इस्लामी धाटणीचा मकबरा आहे. बांधकामाची दख्खनी शैली पाहता निजामशाही किंवा बहामनी काळात किंवा आदिलशाहीच्या दहा वर्षांत हा मकबरा बांधला गेला असावा असं वाटतं.

साधारणपणे ३७ मीटर स्क्वेयर आकाराचा या मकबऱ्याचा पाया असावा. घुमट अंदाजे १० फुटी आहे. दगडी भिंती साध्याच असून जाळीच्या खिडक्या आणि कमानीचा दरवाजा आहे. १५१४ साली बार्बोसाने लिहिलेल्या नोंदीनुसार सराई गावाच्या आसपासच्या भागात मोठी जत्रा भरत होती असे दिसते. इसवीसनाच्या पहिल्या शतकापासून मध्ययुगीन काळापर्यंत विविध प्रवाशांनी आणि नंतर गॅझेटच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराबद्दल बरीच कल्पना येते. दर्या फिरस्तीच्या माध्यमातून इतिहासातील नोंदींचे हे दुवे जोडत स्थलदर्शन करणे आणि कोकणची ही चित्रकथा तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवणे हीच आम्ही इच्छा आहे.
संदर्भ –
कुलाबा जिल्हा गॅझेट १८८३
आंगरेकालीन अष्टागर – शां वि आवळस्कर