दर्या फिरस्तीच्या प्रवासात अनेक परिचित आणि अपरिचित किनाऱ्यांची भ्रमंती करून झाल्यानंतर एखादा समुद्र किनारा कसा अनुभवायचा याबद्दलची माझी मते, माझी दृष्टी खूप बदलत गेली. मला आठवते आहे की १०-१२ वर्षांपूर्वी मी अमुक एक किनाऱ्यावरील एखादे विशिष्ट ठिकाण मॅपवर हेरून तिथे जात असे आणि फोटोग्राफी करून पुढे निघत असे. सूर्योदय झाल्यानंतरचे दोन तास आणि सूर्यास्तापूर्वीचे दोन तास या गोल्डन अवर मध्ये फोटो-व्हिडिओ जास्त चांगले येत. नंतर ऋतूप्रमाणे विविध किनाऱ्यांचे वैविध्य अनुभवायला सुरुवात केली. विशेषतः पावसाळ्याच्या वेळेला बुधल आणि आचरा या ठिकाणी केलेली पदभ्रमंती माझ्या आठवणीत राहिली आहे. आंबोळगड जवळच्या गोडीवणे किनाऱ्यावर वेत्ये खाडीच्या टोकापर्यंत पाच किमी चालत जाऊन खाडी ओलांडून वेत्यातून परत आंबोळगडला आलो ती पदभ्रमंती सुद्धा स्मरणीय झाली.

फील्डवर्क सुरू केले तेव्हा रेवस ते तेरेखोल या जवळपास सातशे किमी लांब किनारपट्टीचे चित्रण करायचे असल्याने अनेक ठिकाणे यादीत असायची आणि मग प्रत्येक जागा पटापट पाहिली जात असे. गेल्या ३-४ वर्षांत यामध्ये खूप फरक पडला आहे. डोळ्यांना जे दिसते त्यापलीकडे जाऊन शरीर जे अनुभवते त्याकडे मी जास्त लक्ष देऊ लागलो आणि शाळेत शिकलेल्या भूगोलातील विविध खडक, वनस्पती, भूरूपे स्पष्ट दिसायला लागली. कोकणात सुदैवाने आजही असे अनेक किनारे आहेत जिथे पर्यटकांची गर्दी नसते. किनाऱ्यावर एकटेच तुम्ही असता.. किनाऱ्याच्या एका टोकाला एखादे टेकाड असते तर दुसऱ्या टोकाला खाडी. मुद्दाम वेळ काढून किनाऱ्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जायचे.. त्याआधी भरती ओहोटीच्या वेळेचा नीट अभ्यास करायचा असे ठरवून मी किनारी पदयात्रा सुरू केली. रत्नागिरी जिल्ह्याचे उत्तर टोक असलेल्या आणि कासवांचे गाव म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या वेळास गावच्या किनाऱ्याची भ्रमंती मी हल्लीच केली. तेव्हा मी जे निसर्गकाव्य अनुभवले त्याची ही गोष्ट.

वेळास गाव तसे छोटेसेच. हरिहरेश्वरच्या पुढे बागमांडले येथे फेरीने सावित्री नदी ओलांडून तिच्या दक्षिण तीरावर आपण पोहोचतो ते रत्नागिरी जिल्ह्याचे उत्तर टोक असलेलं स्थळ म्हणजे बाणकोट.. बाणकोट गाव ओलांडून समुद्राच्या किनाऱ्याने पुढे जात राहायचे. उजवीकडे आपल्याला सावित्री नदीचे विशाल मुख दिसते आणि दूरवर हरिहरेश्वराचा डोंगर दिसतो.. दिनमान आणि ऋतूप्रमाणे इथे सागराचे रूप कधी रौद्र तर कधी सौम्य असते. बाणकोट किल्ल्याचा पाणबुरुज ओलांडून एखादा किलोमीटर पुढे गेल्यावर एक छोटीशी खाडी आणि तिच्यापलीकडे वाळूचा दांडा असे आगळेवेगळे दृश्य आपल्याला दिसते. तिथून रस्ता डाव्या बाजूला वळतो आणि आपल्याला वेळास गावात घेऊन जातो. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनातून जागतिक नकाशावर स्थान पटकवलेले हे गाव. यावेळी मी कासव महोत्सव संपल्याच्या बराच नंतर आलो होतो. फक्त इथला भूगोल आणि निसर्गरूपे अनुभवायची हाच बेत होता. कोकणातील निसर्गसंपदा हा एक खुला खजिना आहे. त्याचे वैभव अनुभवणे सर्वांना शक्य आहे.. पण तो अनुभवण्याची दृष्टी आणि वेळ मात्र तुमच्याकडे हवा.

फेसबुकवर दर्या फिरस्तीवर लिहायला लागल्यानंतर रत्नागिरीचे प्राध्यापक डॉ सुरेंद्र ठाकुरदेसाई यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी मला त्यांचे गुरु आणि पुण्याचे प्राध्यापक डॉ श्रीकांत कार्लेकर यांच्या ‘माझा समुद्रशोध’ या पुस्तकाशी ओळख करून दिली. भूगोल हा माझ्या आवडत्या विषयांपैकी एक.. पण एक तर त्यात नोकरीधंदा काय करता येतो याचा पत्ता नाही आणि दुसरे म्हणजे इतका रंजक विषय जो फील्डवर्क द्वारे शिकवला जायला हवा तो शिकवण्याची रटाळ (अगदी पार्ले टिळक विद्यालयात सुद्धा) पद्धत.. यामुळे कुतुहल असूनही भूगोलकडे काहीसे दुर्लक्षच झाले होते. कार्लेकर सरांच्या लेखनातून संशोधक तांत्रिकतेच्या पलीकडचे कोकणातील अनुभव उलगडले आणि कोकण किनाऱ्याकडे पाहण्याची दृष्टी व्यापक होत गेली.

बेत असा होता की गावातून निघून दक्षिण दिशेला जायचे, गाव ओलांडून नदीपाशी कांदळवनातून समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याने किनाऱ्याच्या दक्षिण-मध्य भागापाशी पोहोचायचे. तिथून डावीकडे वळून अजून दक्षिणेकडे जायचे आणि जिथवर तिथल्या खडकांवरून दक्षिणेकडे सरकत किनारा पाहता येईल तितका पाहून उत्तरेकडे खाडीच्या दिशेने निघायचे. उत्तर टोकापर्यंत चालत गेल्यावर जर खाडी पायी ओलांडणे सुरक्षित वाटले तर दर्ग्याजवळ किनारा गाठून डांबरी रस्त्याने गावात परत शिरायचे किंवा पुन्हा किनाऱ्यावरूनच परत फिरून चालत त्याच रस्त्याने कांदळवन ओलांडून गावात परतायचे. साधारण ओहोटीची वेळ पाहून संध्याकाळी साडेतीन पावणेचार वाजता निघालो जेणेकरून हातात दोन तास असतील आणि खाडी पायी ओलांडण्याइतके पाणी ओसरलेले असेल. अर्थात वाळू दलदल सदृश नसेल आणि पाण्याला खूप ओढ नसेल तरच हे शक्य होऊ शकते त्यामुळे हा वर्तुळाकार फेरफटका संपन्न होणार का हे जाणून घ्यायला मी उत्सुक होतो. (माझ्या भ्रमंतीचा जीपीएस ट्रॅक तुम्हाला वरील नकाशात पाहता येईल)

भ्रमंतीची सुरुवात होते ती कांदळवनातून चालत जाताना.. वेळासच्या दोन्ही बाजूला सुमारे 100 मीटर किंवा 325 फूट उंचीच्या टेकड्या आहेत.. दक्षिण पूर्वेला डोंगरात धरण आहे.. तिथून समुद्राकडे उतरणारी व्याघ्रेश्वर नदी गाव आणि किनाऱ्याच्या मधून वाहते आणि तिथेच कांदळवन परिसंस्था विकसित झालेली दिसते. खाडीच्या शांत पाण्यात अलगद उभी असलेली खारफुटी ही वेळासची रक्षणकर्ती आहे. भरती-ओहोटीच्या अखंड लयीत रुजलेली ही झाडे किनाऱ्याला धूप होण्यापासून जपतात, गाळाला कवेत घेतात आणि समुद्र व भूमी यांच्यामधील नाजूक समतोल टिकवून ठेवतात. त्यांच्या मुळांमध्ये असंख्य मासे, खेकडे, कोळंबी आणि जलचरांचे प्रजनन संगोपन सुरक्षित राहते, तर असंख्य पक्ष्यांना हा परिसर अन्न आणि आसरा देतो. टोकदार श्वसन मुळे असलेल्या तिवरांशी माझी ओळखही वेळासला झाली. याचे शास्त्रीय नाव Avicennia असावे. या मुळांवर लेंटिसेल्स (Lenticels) नावाची सूक्ष्म छिद्रे असतात. भरती ओसरल्यानंतर ही छिद्रे हवेशी संपर्कात येतात आणि त्यातून ऑक्सिजन आत घेतला जातो. हा ऑक्सिजन नंतर जमिनीखालील मुख्य मुळांपर्यंत पोहोचवला जातो. या पाणथळ ठिकाणी दिसणारी काही लहान गोल छिद्रे ही बहुधा फिडलर क्रॅब किंवा इतर चिखलातील खेकड्यांची बिळे असावीत असा माझा अंदाज आहे.

वेळास म्हणजे ऑलिव्ह रिडले कासवांचे आश्रयस्थान असलेले गाव; पण या कासवांसह संपूर्ण किनारी जीवनचक्राला आधार देणारा अदृश्य पाया म्हणजे ही खारफुटी. म्हणूनच वेळासचा अनुभव केवळ समुद्रकिनाऱ्यापुरता मर्यादित राहत नाही; तो खाडी, खारफुटी, सह्याद्री आणि समुद्र यांनी एकत्र विणलेल्या सजीव परिसंस्थेचा अनुभव बनतो. वेळासच्या किनाऱ्यावर पाय ठेवताच सर्वप्रथम लक्ष वेधून घेते ती येथील तांबूस-काळसर वाळू. ही केवळ वाळू नसून कोकणाच्या लाखो वर्षांच्या भूवैज्ञानिक प्रवासाची जपून ठेवलेली कहाणी आहे. तिच्यातील काळे कण हे सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीच्या उदरातून उसळलेल्या दख्खन ट्रॅपच्या प्राचीन बेसॉल्ट लाव्हाचे सूक्ष्म अवशेष आहेत, तर तांबूस रंग हा असंख्य पावसाळे आणि उष्ण-दमट हवामानाच्या साक्षीने तयार झालेल्या जांभा खडकाचा वारसा आहे. सह्याद्रीच्या कुशीतून दरवर्षी पावसाच्या पाण्यासोबत हे खनिजकण ओढे-नद्यांमधून प्रवास करत अरबी समुद्रापर्यंत येतात. पुढे समुद्राच्या लाटा, भरती-ओहोटी आणि किनाऱ्यावरील अखंड हालचाल या कणांना पुन्हा पुन्हा घडवत राहते. म्हणूनच वेळासचा हा तांबूस-काळसर किनारा एखाद्या चित्रकाराने रंगविलेला वाटत असला, तरी प्रत्यक्षात तो निसर्गाने कोट्यवधी वर्षे संयमाने घडवलेला भू-इतिहासाचा जिवंत दस्तऐवज आहे.

वाळूमधील काळसर कणांमध्ये प्रामुख्याने मॅग्नेटाइट, इल्मेनाइट, पायरॉक्सीन आणि अँफिबोल यांसारखी लोह व मॅग्नेशियमयुक्त खनिजे आढळतात. ही खनिजे दख्खन ट्रॅपच्या प्राचीन बेसॉल्ट खडकाच्या अपक्षयातून निर्माण झाली आहेत. तर वाळूला लाभलेली तांबूस छटा ही जांभा (लॅटराइट) खडकामधील लोह ऑक्साइड (हिमॅटाइट व गोएथाइट) यांमुळे दिसून येते. याशिवाय वाळूमध्ये अल्प प्रमाणात क्वार्ट्झ चे फिकट रंगाचे कण आणि समुद्री शंख-शिंपल्यांचे सूक्ष्म तुकडेही मिसळलेले असतात. त्यामुळे वेळासच्या किनाऱ्यावरील वाळू एकसारखी दिसत नाही; सूर्यप्रकाश, भरती-ओहोटी आणि ऋतूनुसार तिच्या रंगछटा काळसर, तांबूस, राखाडी किंवा सोनेरी अशा बदलत राहतात. किनाऱ्यावर चालताना पायाखाली जाणवणारा हा रंगांचा खेळ म्हणजे कोट्यवधी वर्षांच्या भूवैज्ञानिक प्रक्रियांनी घडवलेले निसर्गाचे एक अद्भुत रसायनशास्त्रच आहे.


वेळासच्या किनाऱ्यावर वाळूइतकेच लक्ष वेधून घेतात ते इथले काळसर खडक. समुद्राच्या अखंड प्रहाराने आणि खाऱ्या वाऱ्याच्या झिजेमुळे या खडकांवर निसर्गाने असंख्य आकार कोरले आहेत. काही ठिकाणी मधपोळीसारखी असंख्य भोके पडलेली दिसतात, तर काही ठिकाणी लाटांनी खडकाच्या पायथ्यालाच कुरतडत नैसर्गिक कमानी आणि बोगद्यासारखे मार्ग तयार केले आहेत.

भरतीच्या वेळी या खडकाखालून फेसाळ समुद्राचे पाणी वेगाने आरपार वाहताना दिसते. भूगर्भशास्त्रात अशा रचनांना सागरी धूपीतून तयार झालेली सी आर्च किंवा वेव्ह-इरोडेड चॅनेल असे म्हटले जाते. तर खडकांच्या पृष्ठभागावरील लहान-मोठ्या खोलगटांना टॅफोनी (Tafoni) किंवा हनीकॉम्ब वेदरिंग म्हणून ओळखले जाते. लाटा, भरती-ओहोटी, खाऱ्या पाण्यातील क्षार आणि लाखो वर्षांची झीज यांनी घडवलेल्या या रचना म्हणजे समुद्राने स्वतःच्या हाताने घडवलेली शिल्पेच आहेत. त्यांच्याकडे पाहताना किनारा हा केवळ वाळूचा पट्टा नसून सतत बदलत राहणारी, आजही आकार घेत असलेली एक जिवंत भूशिल्पगॅलरी असल्याची जाणीव होते.

इथल्या खडकांना अविरत टक्कर देत राहणाऱ्या लाटा आणि दगडांच्या मंचावर या पाण्याने कोरलेले खळगे लक्ष वेधून घेत होते.. सांजवेळी पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याची किरणे रांगड्या दगडांना उजळून टाकत होती. फेसाळते पाणी त्या दगडांमधून झिरपून शांत होत होते. शेकडो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेने कोरल्या गेलेल्या किनाऱ्यावरील कलाकुसरीचा मनसोक्त आनंद घेत आता मी किनाऱ्याच्या उत्तर टोकाच्या दिशेने चालायला लागलो होतो.

किनाऱ्याचे उत्तर टोक निदान दोन किलोमीटर तरी दूर असावे.. मी पाण्याच्या रेषेला समांतर हळूहळू चालत निघालो होतो.. पूर्ण ओहोटीची वेळ आलेली असल्याने समुद्र शांत भासत होता.. वेळासचा विस्तीर्ण किनारा नजरेच्या टप्प्यात होताच आणि पलीकडे सावित्री नदीचे पात्र आणि हरिहरेश्वराचा डोंगरही दिसत होते.. उजव्या बाजूला सावित्री नदीवर होऊ घातलेल्या पुलाचे खांब दिसायला लागले.. इथे मागे एक पूल बांधायला सुरुवात झाली होती.. त्याचे खांब माझ्या 2013 वगैरे सालच्या शूट मध्ये दिसतात.. पुढे तो कंत्राटदार बुडाला आणि काम बंद पडले असे ग्रामस्थ सांगतात.. पण आता नव्याने काम सुरू झालेले असले तरीही बहुतेक जुन्या खांबांच्या दर्जाची खात्री कोण घेणार त्यामुळे तिथेच नवे खांब बांधले जात आहेत. कदाचित पुढच्या उन्हाळ्यात किंवा 2027 च्या वर्षाखेरीस तरी हा पूल वाहतुकीला खुला झाला असेल. वेळास गावच्या दक्षिण बाजूला साखरी नावाचे ठिकाण आहे. तिथे खाली भारजा नदीचे मुख आणि पलीकडे केळशी गाव. तिथेही पुलाची बांधणी सुरू आहे. सध्या साखरीतून केळशीत जायला मांदीवली नावाच्या ठिकाणी पूर्वेकडे नदीकिनाऱ्याने आतवर जाऊन, छोटा पूल ओलांडून पुन्हा पश्चिमेकडे वळावे लागते.. ते अंतर बरेच वाचेल. शिवाय केळशीतील प्राचीन वाळूची टेकडीही नवा पूल इतरत्र बांधल्याने सुरक्षित राहील. पण सध्या थोडेसे सुटावलेले वाटणारे बाणकोट-वेळास हे दोन पूल झाले की पर्यटकांच्या गर्दीने अजून गजबजून जाईल असा अंदाज आहे. यातून स्थानिकांना रोजगार, उत्पन्न वाढेल हे खरे पण इथल्या नैसर्गिक परिसंस्थेची काय परिस्थिती होईल हा सुद्धा काळजी करण्यासारखा विचार आहे. किनाऱ्यावर माझ्या मागून येऊन समुद्राकडे वेगाने वारा वाळू सोबत घेऊन जोरात वाहायला लागला होता. सूर्यास्त व्हायला अजून बराच वेळ होता. वाळूच्या कणांनी वाऱ्यावर स्वार होऊन उडताना काढलेल्या रेघोट्या दिसत होत्या. काल संध्याकाळी वेळास-बाणकोटच्या मधल्या टेकाडावरून पाहिलेली खाडी आता मी विरुद्ध दिशेने पाहू शकत होतो.

खाडीतले पाणी बरेचसे ओसरलेले होते. प्रवाहाला जोरही विशेष नव्हता. पण काही ठिकाणी वाळू इतकी मऊ आणि भुसभुशीत लागत होती की पाऊल टाकणे सुरक्षित वाटेना. मी विचार केला इथवर आलो आहोत तर अजून थोडे चालत पुढे जाऊन सावित्रीचे मुख, व्याघ्रेश्वर नदी/ खाडीचे मुख आणि समुद्र यांच्या तिहेरी संगमापर्यंत जाऊ. डांबरी रस्ता आणि मी जेमतेम शंभर मीटर अंतर असेल. जरी मी थोडीशी हटके भ्रमंती करणारा असलो तरीही उगीच अनावश्यक धोका पत्करून काहीही करत नाही. स्थानिक कोणी भेटले.. त्यांनी माहिती दिली तर ठीक.. सुदैवाने मला थोडेसे पुढे पाण्यात बसून जलक्रीडा करणारे एक स्थानिक कुटुंब दिसले. त्यांना मी लांबूनच आवाज देऊन विचारले की इथे पाणी ओलांडून रस्त्यावर यावे का.. काका चालत माझ्या दिशेने आले आणि कमीत कमी पाणी लागेल आणि जिथे ओढ सुद्धा विशेष नाही असे ठिकाण त्यांनी मला दाखवले.

त्या ठिकाणी लांबून पाहिले तर खूप पाणी आहे असे वाटते पण ओलांडताना जेमतेम पाऊल भिजेल एवढेच पाणी होते. आधी सावित्रीच्या मुखाकडे पाहताना समोर तांबडी-काळसर वाळू होती, त्याची जागा आता पाण्याने घेतली होती. क्षितिजावर रेंगाळणारे ढग आधी पांढरे होते, आता त्यांनी राखाडी शाल पांघरून नवे रूप धारण केलेले दिसू लागले. मानसून ची चाहूल देणारी ती जून मधील एक संध्याकाळ होती.

व्याघ्रेश्वर खाडी ओलांडता आल्याने आता पायपीट तर वाचली होतीच पण त्याच रस्त्याने परत येण्याऐवजी माझा वर्तुळाकार प्रवास पूर्ण होत होता म्हणून समाधानही वाटले. जणू दोन डोंगरांच्या ओंजळीत वसलेल्या वेळास गावाच्या परिघाची परिक्रमा मी सहा किलोमीटर पदभ्रमण करून पूर्णत्वाला नेली होती. साडेपाच पावणेसहाच्या सुमारास मी उत्तर टोकाहून आत येणाऱ्या रस्त्याने शाळेपाशी आलो. ही भ्रमंती करत असताना मी समुद्राचे सौंदर्य फक्त कॅमेरात किंवा दृष्टीत टिपले होते एवढेच नाही तर तिथल्या वाळूच्या, खडकांच्या, शिंपल्यांच्या स्पर्शाचा अनुभव घेतला होता.. खारफुटी, पाषाणशिल्पे आणि खाडी मुख या तीन ठिकाणी तीन प्रकारचे गंध अनुभवले होते.. खारफुटी ते किनारा मला सोबत देणाऱ्या भुभुच्या पायाच्या आवाजाची लय आणि टिटवीच्या (red wattled lapwing) कर्कश पण परिचयाच्या आवाजाची साद यांनी ध्वनिद्वारेही ती आठवण कोरून ठेवली होतीच.

या ठिकाणी उभे राहिल्यावर लक्षात येते की नकाशावर दिसणारी नदी आणि समुद्र यांची रेषा प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. सावित्रीचे गोडे पाणी आणि अरबी समुद्राचे खारे पाणी दिवसातून दोनदा एकमेकांना भेटतात, दूर जातात आणि पुन्हा भेटतात. त्यांच्या या अखंड खेळातूनच मधला वाळूचा पट्टा मोकळा होतो. ओहोटीच्या वेळी हा पट्टा प्रवाशाला चालण्याचा मार्ग देतो; भरती आली की पुन्हा समुद्र त्याला आपल्या कवेत घेतो. म्हणून या खाडीवरून चालताना आपण एका स्थिर भूमीवर नव्हे, तर नदी आणि समुद्र रोज नव्याने घडवत असलेल्या जिवंत भूभागावर पाऊल ठेवत असतो. पुढल्या खेपेत भरडखोल आणि हरिहरेश्वर या दोन ठिकाणी पदभ्रमंती करून सागराचे नवे रूप पाहायचे असा संकल्प करून मी होमस्टे मध्ये परतलो.