हरिहरेश्वर – कालभैरवाचे दर्शन घेऊन आपण सावित्री नदी ओलांडतो आणि आपला रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश झालेला असतो. समुद्राच्या कडेने दक्षिणेकडे गेले काही सुमारे एक किलोमीटर अंतरावर आपण वेळास या टुमदार गावात पोहोचलेलो असतो. सावित्रीचे मुख, व्याघ्रेश्वर नदी आणि वेळासच्या वाळूचा दांडा अशा निसर्गरम्य परिसरात हे गाव वसलेले आहे. गावातील मुख्य रस्त्याच्या एका टोकाला शाळा आणि एसटीचा थांबा आहे. पुण्याहून, दापोलीहून आलेल्या बस रात्री इथेच मुक्कामाला असतात. इथे दहा बारा फुटाच्या उंचवट्यावर ग्रामदेवता रामेश्वर आणि त्याच्या जोडीलाच असलेले काळभैरव मंदिर दिसते. मंदिराच्या मागे वेळासची टेकडी आहे.

मराठा वास्तुरचनेचे उत्तम उदाहरण असलेली ही दोन मंदिरे एकमेकांशी काटकोनात उभी आहेत. अशी रचना मी इतरत्र कुठेही पाहिलेली नाही. हा गाव नाना फडणवीस यांचा मूळ गाव. त्यांचे मूळ आडनाव भानू होते. त्यांनी गावात पाण्यासाठी दगडी पाट बांधून घेतले असे रत्नागिरी गॅझेट सांगते. इथे 1952 साली न. सि. नरवणे यांच्या हस्ते नाना फडणवीस यांचा पुतळा स्थापन केला गेला. आजही तो पाहता येतो.

इथल्या जोड मंदिरांपैकी रामेश्वराचे देऊळ मोरोबा दादा फडणवीस तर कालभैरवाचे देऊळ नाना फडणवीस यांनी बांधून घेतले असे ऐतिहासिक दस्त ऐवजांच्या आधारे सांगण्यात येते. देवळात शांत आणि मांगल्यपूर्ण वातावरण असते. कालभैरव मंदिरात जोगेश्वरी, बाबदेव आणि काळेश्री अशा तीन मूर्ती पूजनात ठेवलेल्या आपल्याला दिसतात.

मंदिरात शिरताना उंबरठ्यावर असलेले कीर्तिमुख आपले लक्ष वेधून घेतेच. दगडांची साधीच पण रेखीव, प्रमाणबद्ध बांधणी आणि काही ठिकाणी लाकडाचा उत्कृष्ट वापर हे कोकणातील मंदिर स्थापत्याचे खास वैशिष्ट्य आहे. साधारणपणे रामेश्वर म्हणजे रामाचे दैवत असलेला शिव अशी मान्यता आहे. पण मला असेही वाटते की कोकणाचा निर्माता असलेल्या परशुरामने किंवा भार्गवरामानेही शिवभक्ती केली होती त्यामुळे रामेश्वरातील राम कदाचित भार्गवराम असावा. रामेश्वरच्या सभामंडपातील गणपती बाप्पाची मूर्तीही अगदी सुबक आणि रेखीव दिसते.




दोन्ही देवळांचे आजचे बांधकाम केळशी येथील श्री रामचंद्र बल्लाळ बेंद्रे यांनी शके 1855 म्हणजे इसवी सन 1934 मध्ये केले आहे हे इथल्या संगमरवरी पाटीच्या कृपेने कळते. शालिवाहन शकाची सुरुवात इसवीसन 78 मध्ये झाली त्यामुळे आपल्याला शकाच्या वर्षावरून जर इसवीसन काढायचा असेल तर त्यात 78 जोडून आकडा काढावा लागतो. या मंदिरात माझ्या लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे उंबरठ्यावर कोरलेले कीर्तिमुखाचे कोकणी स्वरूप. मानवी चेहऱ्याशी साधर्म्य सांगणारी मुद्रा.. धीरगंभीर भाव, गहिरे डोळे.. त्याच्यावर वाहिलेली फुले आपल्याला सांगतात की याचे महत्त्व केवळ रक्षक देवतेपुरते मर्यादित नसून स्थानिकांचा भक्तीभावही त्याच्या ठायी आहे. अशा देवळांमध्ये दुपारच्या वेळेला एकटेच जाऊन बसावे आणि डोळे मिटून ध्यानस्थ व्हावे हा माझा अगदी आवडता उपक्रम. वेळासचा रामेश्वर त्याला अपवाद कसा असेल. आज दिसणारे मंदिर प्रामुख्याने पेशवेकालीन (अठरावे शतक) स्थापत्य वैशिष्ट्ये दर्शवित असले, तरी त्याचा मूळ गाभारा अधिक प्राचीन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारची टप्प्याटप्प्याने झालेली वाढ कोकणातील अनेक शिवमंदिरांत आढळते.