Darya Firasti

पुनःश्च टाळकेश्वर

अंजनवेल कातळवाडीच्या डोंगरावर असलेले शिवाचे स्थान म्हणजे श्री टाळकेश्वर. इथल्या दीपगृहालाही हेच नाव दिले गेले आहे. सुमारे 90 मीटर उंच या सड्यावरून उत्तरेला वशिष्ठीचे मुख आणि दाभोळ बंदर तसेच पश्चिमेला अथांग महासागर असे दृश्य दिसते. व्याडेश्वराचे मूळ शिवलिंग तीन भागांमध्ये भंग होऊन एक भाग असगोळी येथे आला आणि तो बाळकेश्वर किंवा वालुकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला तर एक भाग अंजनवेल येथे गेला तो टाळकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला. काही जण या देवस्थानाचे नाव उद्धालकेश्वर असेही असल्याचे सांगतात. एप्रिल 202 मध्ये मी या ठिकाणाबद्दल लिहिले होते. सहा वर्षांनी पुन्हा एकदा तिथे जाण्याचा योग आला. मंदिराची नवीनच रंगरंगोटी झाली असल्याने त्याला एक वेगळीच झळली मिळाली होती. सगळे काही स्वच्छ आणि नेटक्या अवस्थेत होते. त्यामुळे पुन्हा एकदा हे शिवालय त्याच्या नवीन रूपात या ब्लॉगवर आणावे असे मला वाटले.

पेशवाई काळातील हे बांधकाम नवीन रंगांच्या ऊर्जेने ताजेतावाने झालेले वाटत होते. त्याच्या चहुबाजूंना जांभ्याचे कुंपण होते ते मात्र मी पूर्वीही पाहिलेले वाटले. व्याडेश्वर माहात्म्यात या मंदिराचा उल्लेख टाळदेव असा करण्यात आलेला आहे. आताचे बांधकाम दगडी पेशवेकालीन बांधकाम असून या मंदिराला 1683 सालापासून सनद आहे. उद्दालकेश्वर या नावानेही हे मंदिर ओळखले जाते.

गाभाऱ्यात एक मीटर लांबीची शाळीग्राम पिंडी आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी आणि कीर्तिमुख आहे. सभामंडप, अंतराळ आणि सुमारे अर्धा-पाऊण मीटर खाली गाभारा अशी रचना आहे. देवळाबाहेर घडीव दगडी दीपमाळ आहे आणि तुळशी वृंदावनही आहे. यावेळी गाभारा नविन फरशा बसवून स्वच्छ केलेला दिसला.

श्री वेणूगोपाळ, श्री गणपती व श्री उद्धालकेश्वर या देवस्थानांच्या धार्मिक व उत्सवपरंपरेसाठी अनेक भक्तांनी उदार देणग्या देऊन कायमस्वरूपी निधी उभारला आहे. रा. केशवराव लक्ष्मण देवळेकर यांनी श्री उद्धालकेश्वर देवळाच्या सांजवातीसाठी श्री वेणूगोपाळ-गणपती व उद्धालकेश्वर फंडाच्या ट्रस्टींकडे रु. १५० अर्पण केले. त्याचप्रमाणे रा. रा. गोपाळ गणेश आचवले यांनी आपल्या वडील व मातोश्री यांच्या स्मरणार्थ श्री वेणूगोपाळ, गणपती आणि उद्धालकेश्वर देवळांच्या उत्सवाकरिता रु. ६०० देणगी दिली. कै. गंगाबाई आपटे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव के. रा. रा. निवृत्त वासुदेव आपटे यांनी श्री उद्धालकेश्वराच्या उत्सवासाठी रु. ५०० अर्पण करून तो निधी श्री वेणूगोपाळ-गणपती व उद्धालकेश्वर फंडात जमा केला. तसेच श्री परशुराम दामोदर वैद्य यांनी बारा वर्षांत सहा कोटी ‘ॐ नमः शिवाय’ मंत्रजप पूर्ण केल्याच्या निमित्ताने आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ रु. ६०५ कायम निधी म्हणून अर्पण केले. या निधीवरील व्याजातून श्री उद्धालकेश्वर येथे प्रत्येक सोमवारी व महाशिवरात्रीस एकादशीचे तसेच श्री वेणूगोपाळ मंदिरातील तुळशीविवाहाचे धार्मिक कार्यक्रम ट्रस्टींनी नियमितपणे पार पाडावेत, अशी त्यांची इच्छा नमूद करण्यात आली आहे. या पाट्या या देवस्थानाच्या धार्मिक कार्यांना स्थानिक समाजाने दिलेल्या आर्थिक पाठबळाची, पूर्वजांच्या स्मरणार्थ देणगी देण्याच्या परंपरेची आणि कायमस्वरूपी निधी उभारून देवस्थानाची सेवा अखंड सुरू ठेवण्याच्या भावनेची साक्ष देतात. कोकणातील शिवशंकराची रूपे पाहणे हा एक निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा अनुभव असतो. वेळणेश्वर, कोळेश्वर, सप्तेश्वर, हरिहरेश्वर.. अशी अनेक रूपे आवर्जून दर्शन घ्यावे अशीच आहेत. अशा ठिकाणांची चित्रभ्रमंती करण्यासाठी दर्या फिरस्ती साईटला जरूर भेट देत रहा.

Leave a Reply

Discover more from Darya Firasti

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading