
कोणे एकेकाळी इथं नागोबा नावाचे सत्पुरुष राहत होते आणि त्यांच्या सोबत त्यांचे शिष्य बुधोबा आणि चांगोबा देखील वस्तीला होते अशी आख्यायिका आवास भागात प्रसिद्ध आहे. सकाळी समुद्रस्नान घ्यायचे, मग आवासच्या वक्रतुंड विनायकाचे दर्शन घेऊन कनकेश्वराच्या दर्शनाला जायचे आणि मग रात्री मुक्कामाला आवास गावात परतायचे अशा नेमाने त्यांनी आयुष्य जगले. नागोबांची शंभरी पूर्ण झाल्यावर त्यांनी आणि यथावकाश त्यांच्या शिष्यांनी संजीवन समाधी घेतली आणि मग पाषाण रूपात त्यांची पूजा केली जाऊ लागली. तेच हे नागोबा देवस्थान.

या मंदिराचा जीर्णोद्धार प्रथम मापगांव येथील गणू उर्फ बाळाजी सखोजी राऊत यांनी १८५६ च्या सुमारास केला आणि नंतर १९२६ च्या आसपास वर्गणी जमवून पुन्हा मंदिर आजच्या स्वरूपात बांधले गेले. मंदिराच्या सभागृहात नवसासाठी बांधलेल्या अनेक घंटा दिसतात. आवारात कोकणी पद्धतीची दीपमाळही आहे.

मंदिराचे बांधकाम अतिशय साधे असून लाकडी फ्रेमवर्कचा वापर करत अतिशय सुबक रीतीने त्याची बांधणी केल्याचे लक्षात येते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथे सर्पदंशाचे विष उतरवले जाते. अर्थात, आजच्या काळात सर्पदंशासारखी दुर्घटना घडली असता शांतपणे प्रथमोपचार करून योग्य ती वैद्यकीय सेवा तातडीने रुग्णाला मिळवून देणे आवश्यक आहे.

आवास परिसरातील वक्रतुंड विनायक मंदिर आणि समुद्र किनारा, कोळी समाजात महत्त्वाचे स्थान असलेले पांडवा देवीचे मंदिर आणि जवळच सासवणे येथील करमरकर शिल्पकला संग्रहालय पाहण्यासारखे आहे.