
कुंडलिका नदीच्या मुखाशी असलेल्या एका भूशिरावर जवळपास 100 मीटर उंच टेकडी आहे. आणि या टेकडीवर आहे उत्तर कोकणातील पोर्तुगीज सत्तेचा साक्षीदार कोर्लई चा किल्ला. या ठिकाणाला Morro De Chaul म्हणजे चौलचा डोंगर असे पोर्तुगीज नाव होते. कुंडलिका नदीच्या उत्तर तीरावर मुखापाशी रेवदंड्याचा पोर्तुगीज किल्ला आहे त्यामुळे या नदीतून होणाऱ्या व्यापारी आणि सैनिकी जल वाहतुकीवर पूर्ण नियंत्रण करणे या दोन किल्ल्यांच्या मदतीने शक्य होत असावं.

कोर्लई गाव या किल्ल्याच्या पायथ्याशी असून पूर्वेकडे गावातून आणि पश्चिमेकडे दीपगृहाकडून अशा दोन वाटांनी किल्ल्यावर जाता येते. या डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर आहे तो बालेकिल्ला ज्याला पोर्तुगीजांनी फोर्टलेझा रियल (राजेशाही दुर्ग) असे नाव दिले होते. भूशिराच्या उत्तर टोकाला बुरुजांची मालिका आहे आणि समुद्राकडे उघडणारे दार. या दोन भागांना जोडणारी दगडी तटबंदी बालेकिल्ला ते समुद्र अशी सहा भागांमध्ये उतरत गेली आहे.

गावातून पायऱ्या आणि पायवाटेने चढून आल्यावर दिसणारे बालेकिल्ल्याचे दार शाबूत आहे. त्याच्या कमानीचा आकार पाहता निजामशाही काळात हे बांधकाम झाले असावे असा आभास निर्माण होतो. या दारावरच गोलाकार साओ पेद्रो बुरुज बांधलेला दिसतो.

तिथून आत आल्यानंतर दक्षिणेकडे पाहिले तर अथांग समुद्र अन कोर्लई गावचा किनारा आपल्याला दिसू शकतो. तिथंच एक तोफ अजूनही पडलेली आहे. या वास्तूत इतिहासाच्या पाऊलखुणा तोफांच्या रूपाने आणि शिलालेखांच्या रूपाने विविध ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणच्या कात्रीच्या आकारातील बुरुजांच्या रचनेचे Orelha De लिब्रे म्हणजे सशाचे कान असे बारसे केलेले आहे.

सेंट इनॅसिओ, सेंट फ्रान्सिस्को अशा विविध संतांची नावे इथल्या बुरुजांना दिलेली आहेत आणि काही ठिकाणी तसं कोरलेले दगडी लेखही आपल्याला दिसू शकतात. बालेकिल्ल्यात जाताना अनेक दरवाजे आणि बंदिस्त रस्ते पार करत आपण आतमध्ये प्रवेश करत जातो.
इथून पुढे जात असताना कात्रीच्या आकाराचं बुरुजाचे बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं. इथल्या वास्तुरचनेवर पोर्तुगीज बांधकामाची छाप जागोजागी स्पष्टपणे दिसते.

किल्ल्याच्या माथ्यावर चाफ्याच्या झाडाला बहर आलेला पाहताना खूप छान वाटतं. तिथेच रत्नेश्वराचे ठिकाण आणि तुळशी वृन्दावनही दिसते.

पोर्तुगीज काळात बांधलं गेलेलं नोसा सेन्योरा चर्च आता वापरात नसलं तरीही त्याचं बांधकाम आणि वेदीची म्हणजेच आल्टर ची जागा आपल्याला नीट पाहता येते.
इथं कोरलेल्या लेखानुसार फिलिपे मस्कारेन्हास या पोर्तुगीज व्हाइसरॉयच्या आदेशाने इसवीसन १६४६ मध्ये या किल्ल्याचे बांधकाम सुरु करण्यात आले. मे १६५० मध्ये चौलचा कॅप्टन फर्नाव दे मिरांडा हेन्रीक्स इथला कप्तान क्रिस्तोवाव दे अब्र्यू दे अझवेदो यांच्या देखरेखीखाली किल्ला बांधून पूर्ण करण्यात आला.

उत्तरेकडे आपण अनेक बुरुज आणि दरवाजांची मालिका ओलांडत समुद्राच्या दिशेने चालत जाऊ शकतो. जसजसे आपण या अरुंद माथ्यावरून उत्तरेला जातो तसतशी टेकडीची उंची कमी होते आणि आपण किनाऱ्याकडे उतरत जातो.
समुद्रसपाटीवर जाऊन पोहोचले की दोन दरवाजे दिसतात. पश्चिमेकडे असलेला दरवाजा समुद्राभिमुख आहे तर पूर्वेचा दरवाजा कुंडलिका नदीचे मुख आणि तिथं असलेल्या जेटीच्या बाजूला उघडतो.
इथं कॅव्हेलेरो नावाचा प्रचंड बुरुज असून अनेक कमानींचे बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसू शकते. त्याला लागूनच सांताक्रूस बुरुज आहे. अनेक तोफा इथं मांडलेल्या आपल्याला दिसू शकतात.

संध्याकाळपर्यंत ही भटकंती आटोपून पुन्हा एकदा किल्ल्याच्या माथ्यावर चढून यायचे. पश्चिमेचे रंग आता आकर्षक होऊ लागलेले असतात. जवळजवळ पाचशे मीटर लांब असलेली दगडी तटबंदी सोनेरी सूर्यकिरणांनी उजळून निघालेली असते.

कोर्लई गावाला अतिशय सुंदर असा समुद्रकिनाराही लाभलेला आहे. नितळ निळे पाणी आणि फेसाळणाऱ्या लाटा पाहता पाहता संध्याकाळ ओसरू लागते आणि अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा नारिंगी रंग या निळाईत शिरू लागतो. १५२१ मध्ये इथं धक्का, तटबंदी आणि क्रूसाची बातेरी बांधण्याची परवानगी पोर्तुगीजांनी दिएगो लोपेझ दे सिक्वेरा मार्फत निजामशाहीकडे मागितली होती. पहिला बुऱ्हाण निजामशहा गेल्यावर जे अराजक माजले त्याचा फायदा घेऊन पोर्तुगीजांनी १५९४ साली इथं जम बसवण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामशहाने पोर्तुगीजांना हाकलून इथं स्वतः दुर्ग बांधण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात दोघेही मागे हटले.

त्यानंतर दुसऱ्या बुऱ्हाण निजामाने ही जागा जिंकून रेवदंड्याच्या पोर्तुगीज किल्ल्याला शह देण्याचा प्रयत्न सुरु केला. १५९२ साली रुपी खान नामक सरदाराबरोबर मोठी कुमक आणि तोफखाना देऊन निजामशाहीने कोर्लईवर कब्जा केला आणि बुऱ्हानदुर्ग नामक किल्ला बांधून काढला. त्याचे अवशेष काही ठिकाणी आजही बांधकामात दिसू शकतातत्यानंतर इथूनच रेवदंड्यावर तोफखान्याचा हल्ला सुरु झाला. आजही कोर्लईच्या पूर्व तटावरून रेवदंड्याची सातखणी म्हणजेच सांता बार्बाराचा मनोरा स्पष्ट दिसतो..

१५९४ साली कोर्लई किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. सुमारे चार हजार सैनिकांची फौज घेऊन हल्ला केला आणि कोर्लई जिंकला. या लढाईत त्यांना ५ हत्ती अनेक घोडे आणि ७७ तोफा मिळाल्या व निजामशाहीचे हजार सैनिक ठार झाले. पोर्तुगीजांची मात्र २१ माणसे कामी आली. त्यानंतर पुरेशी शिबंदी नसल्याने पोर्तुगीजांनी बुऱ्हानदुर्गाचे बांधकाम पाडून टाकले. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश लाभलं नाही. त्यानंतर वसईच्या मोहिमेच्या सुमारास मराठ्यांनी कोर्लई जिंकून घेतला.

इतिहासाच्या अद्भुत जगात भ्रमंती करत असताना सूर्य मावळतीला जातो आणि पश्चिमेला क्षितिजावर अनोखा अविष्कार पाहायला मिळतो. समुद्राचे पाणी आता सोनेरी दिसायला लागलेले असते आणि त्यावर एखाद्या मासेमारी बोटीचा ठिपका आपलं लक्ष वेधून घेत असतो.

कोर्लई किल्ल्याच्या पश्चिमेला असलेले दीपगृह नक्की पाहायला हवे मात्र ते पाहण्यासाठी संध्याकाळची ठराविक वेळ गाठावी लागते. कोर्लई गावचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं अनेक ख्रिस्ती कुटुंबे आहेत जी एक विशेष भाषा बोलतात. पोर्तुगीज, मराठी, इंग्लिश अशा विविध भाषांच्या संगमातून घडलेल्या भाषेला ते नो लिंग म्हणजे आमची भाषा असे म्हणतात. विशेष म्हणजे लिपी म्हणून ते देवनागरी वापरतात. दर्या फिरस्ती कोकणातील अशा अनेक अद्भुत ठिकाणांची चित्रयात्रा आहे. या जागांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचा ब्लॉग नक्की वाचा आणि तुमच्या कोकणवेड्या मित्रांनाही दर्याफिरस्ती बद्दल सांगा ही आग्रहाची विनंती.
अत्यंत अप्रतिम आणि सविस्तर माहिती.. वाचताना असे वाटत होते की मी किल्ल्यावर फिरतो आहे