
वसिष्ठी नदीच्या मुखाजवळ दक्षिण तीरावर डोंगरसडा आहे. अंजनवेल गावच्या या डोंगरावर असलेला पहारेकरी म्हणजे किल्ले गोपाळगड. इथं दाभोळहून फेरी बोटीने पोहोचता येतं आणि गुहागरहून कातळवाडी मार्गे थेट किल्ल्याच्या दारापर्यंत रस्ताही आहे. जवळच गोपाळगडाच्या पश्चिमेला बाजूला सड्यावर अंजनवेलचे दीपगृह आणि टाळकेश्वराचे शिवमंदिर सुद्धा आहे. व्याडेश्वराचे मूळ शिवलिंग तीन भागांमध्ये भंग होऊन एक भाग असगोळी येथे आला आणि तो बाळकेश्वर किंवा वालुकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला तर एक भाग अंजनवेल येथे गेला तो टाळकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला. काही जण या देवस्थानाचे नाव उद्धालकेश्वर असेही असल्याचे सांगतात. या ठिकाणाला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे.
मंदिरासमोरच तुळशी वृंदावन आणि दगडी दीपमाळ आहे. मंदिराची दुरुस्ती केलेली असली तरीही मूळ बांधकाम पेशवेकालीन असावे असे दिसते. मंदिरात एक दगडी समई आहे. तिला बहुतेक ठाणवई म्हणतात.

मंदिराजवळच दीपगृह आहे. ते साधारणतः संध्याकाळी चार ते पाच या वेळेत पाहता येते. दीपगृह कसे काम करते त्याचा नौकानयनाच्या साठी कसा उपयोग होतो हे जाणून घेण्यासाठी इथं जरूर भेट द्यावी.

मंदिराजवळच डोंगराची एक सोंड समुद्राकडे गेलेली आहे. मला हा डोंगर पाहून डॉल्फिन माशाची आठवण झाली. या डोंगर सोंडेवर जाण्यासाठी प्रशस्त पायवाट आहे. या ठिकाणी जाऊन नितांत सुंदर सागर आणि त्याला जाऊन भिडलेला कडा यांचे रौद्र सौंदर्य अनुभवता येते.

कड्याजवळ कठडा आहे, इथं बसून वशिष्ठी नदीच्या मुखाचा परिसर न्याहाळता येतो. नदीचे मुख सुमारे दीड किलोमीटर लांब असून वाळूच्या दांड्याने काही प्रमाणात ते अरुंद झाले आहे. चिपळूणहून वाहत येणाऱ्या नदीच्या समुद्र संगमाचा देखावा ३०० फूट उंच असलेल्या या कड्यावरून पाहणे एक अद्भुत अनुभव असतो. इथं वाढलेलं रानगवत वाऱ्याच्या तालावर डोलत असतं आणि त्याच्यापलीकडे सागराच्या फेसाळणाऱ्या लाटा आपल्या लयीत किनाऱ्याच्या दिशेने येत असतात.

कोकणातील शिवशंकराची रूपे पाहणे हा एक निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा अनुभव असतो. वेळणेश्वर, कोळेश्वर, सप्तेश्वर, हरिहरेश्वर.. अशी अनेक रूपे आवर्जून दर्शन घ्यावे अशीच आहेत. अशा ठिकाणांची चित्रभ्रमंती करण्यासाठी दर्या फिरस्ती साईटला जरूर भेट देत रहा.