
कोकणभूमीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवरायांच्या नंतर औरंगजेबाचा लष्करी वरवंटा महाराष्ट्रावर फिरू लागला. पण छत्रपती संभाजी महाराजांनी ९ वर्षे त्याला निकराचा लढा दिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा पराक्रमी वीर धर्मरक्षणासाठी लढला. संगमेश्वर जवळ कसबा येथे मुकर्रबखानाच्या लष्करी तुकडीने माघ वद्य सप्तमी म्हणजे शुक्रवार १ फेब्रुवारी १६८९ रोजी अचानक छापा मारून छत्रपती संभाजी महाराजांना बंदी बनवले तेव्हा आलमगीराला वाटले असावे की आता आपण महाराष्ट्राचे स्वामी झालो. पण त्यानंतर २७ वर्षे झुंजत राहिलेल्या महाराष्ट्राने शेवटच्या सामर्थ्यवान मुघल राजाला गुडघे टेकायला लावले. काही इतिहासकारांच्या मते छत्रपती संभाजीराजेंना सरदेसाई वाड्यात कैद केले गेले तर महिपतगडचा सुभेदार रामचंद्र बल्लाळ भगवंत त्रिम्बक प्रतिनिधी याने राजे नावडी येथील बंदरावर गेले असताना कैद झाले असा उल्लेख १७७१ मधील पत्रात केला आहे. तिथं शास्त्री नदीतून चिपळूण किंवा राजापूरच्या दिशेने जाऊ शकत होते आणि अशा ठिकाणी घोडदळाने पाठलाग करण्याची शक्यता कमी होती त्यामुळे हे ठिकाण अधिक योग्य वाटते असं इतिहासकार कमल गोखले सांगतात. (शिवपुत्र संभाजी पृष्ठ ४६७) आजही कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे हे अतिशय सुंदर स्मारक पाहून त्याच्या आयुष्यातील झंझावात डोळ्यासमोर उभा राहतो. दर्या फिरस्तीचे छत्रपती संभाजी महाराजांना मनोभावे नमन.