भाऊच्या धक्क्यावरून रेवसला जाणारी बोट पकडली आणि रायगड जिल्ह्याचा किनारा गाठला की सुरु होते ती शंभराहून अधिक रम्य समुद्र किनाऱ्यांची मालिका. हे सगळे किनारे पाहण्यासाठी अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, देवगड, मालवण आणि वेंगुर्ला अशा ११ तालुक्यात भ्रमंती करावी लागते. मी २०१३ पासून जवळपास २०-२५ वेळा सागर भ्रमंतीला गेलो असेन पण जिथं गाडी जात नाही असे ३-४ समुद्र किनारे राहून गेले होते. विशेषतः देवगड तालुक्यात विजयदुर्ग किल्ल्याच्या परिसरात काही किनारे आहेत जिथं पायपीट करून जावे लागते आणि अगदी स्थानिक मंडळी सुद्धा अगदी सहज रस्ता सांगू शकत नाहीत. त्यांची नावेही सहज सापडत नाहीत. काही ठिकाणी गुगल मॅप्स वर चुकीची नावे टाकली आहेत त्यामुळे संभ्रम अधिकच वाढतो.

इथल्या किनाऱ्यांपैकी सगळ्यात खास आणि लांबलचक असा कालवशीचा किनारा…. देवगड तालुक्यातील किनाऱ्यांचा शोध घेत असताना सुरुच्या गर्द बनामागे लपलेल्या फणसे किनाऱ्याने बरेच दमवले होते.. तीच तऱ्हा या किनाऱ्याची सुद्धा. गेल्या वेळेला विजयदुर्गाच्या दक्षिणेला एका टेकडीपलीकडं असलेल्या दामलेमळा आणि घडीवाडी किनाऱ्यांची सैर झाली होती.. पण घडीवाडीच्या दक्षिणेला आणि कोठारवाडीच्या उत्तरेला सड्याखाली असलेल्या दोन पुळणी कव्हर झाल्या नव्हत्या. एप्रिल २०२२ मध्ये मात्र हे मिशन फत्ते झाले. रात्री मुक्कामाला विजयदुर्ग किल्ल्यापाशी हॉटेल सुरुची मध्ये होतो. तिथं अनिकेत वर्दम आणि फेसबुकवर भेटलेला मित्र अनिमेश जोशी याच्याकडून काही टिप्स घेऊन ठेवल्या होत्या.

तुम्ही विजयदुर्गाकडून येत असाल तर मुख्य रस्त्याला नेनेंच्या शुभंकर होमस्टे नंतर उजवीकडे आणि पुरळ कडून येत असाल तर चौंडेश्वरी देवी मंदिरानंतर डावीकडे एक रस्ता जातो. मी गेलो तेव्हा फक्त ४बाय४ जाऊ शकेल अशा अवस्थेत रस्ता होता.. खरं म्हणजे फक्त सड्याजवळ असलेला रस्ता नीट नाही नंतर अगदी सपाट कच्ची वाट आहे. वाहन मुख्य रस्त्याला जाऊन ११ नंबरच्या बसने पायपीट करायची तयारी हवी. दुपारचे कडकडीत ऊन टाळून जाणे (मी नेमका तेव्हाच गेलो) उत्तम.

रणरणते एप्रिलचे ऊन, ३०-३२ डिग्री सेल्शियस तपमान आणि सड्यावरून २ किमीची भ्रमंती मी ३५ मिनिटांत पूर्ण केली. हमरस्त्यापासून सड्यावर जायला २५ मीटर चढावे लागते.. मग सपाट रस्त्यावरून वाऱ्याची झुळूक अनुभवत चालायचे आणि नंतर पायऱ्या उतरून कालवशी चा किनारा गाठायचा. हा उतार सुमारे ७५ मीटर किंवा जवळपास २५० फूट उतार आहे. परतताना हा एवढा चढ पार करायला लागतो. पण इतकी पायपीट केल्याचे समाधान म्हणजे आपण एका अस्पर्श अशा नितांत सुंदर सागरतीरावर येतो.

उजवीकडे अथांग समुद्र, डावीकडे मी आत्ताच उतरून आलो तो अडीचशे फूट उंच कातळसडा आणि समोर स्वच्छ निर्मळ शुभ्र-केशरी वाळू.. उन्हाने कोरडी झालेली आणि पायाला ऊब देणारा तिचा स्पर्श. चपला काढून अर्धा किलोमीटर चालत जाण्याचा मोह मला आवरेना.. कधीतरी इथं पर्यटक येत असतात.. पण मी गेलो तेव्हा अगदी एकटाच होतो. समुद्राच्या लाटांची साद आणि घोंगावणाऱ्या वाऱ्याची शीळ एवढाच काय तो आवाज. तिथं तंद्री लागली.. रसभंग नको म्हणून मी फोनचा रिंगर अशा ठिकाणी ऑफ केलेलाच असतो.. चालता चालता निसर्गाच्या संपत्तीचे कण वेचत थोडा दक्षिणेकडे गेलो..


किनाऱ्याला उतार होता त्यामुळे भरतीच्या लाटांचा गजर सागर गर्जनेची अनुभूती देत होता.. पाण्याची निळाई क्षितिजापर्यंत गडद होत गेली होती पण आकाश अगदीच निरभ्र आणि रिकामे भासत होते. वाळूचा रंग इथं फिकट गुलाबी छटेने आपलं वेगळेपण जपून होता.. दुपारचे साडेतीन चार वाजले असावेत.. मी इथं सकाळी पोहोचलो असतो तर दोन किमी लांब हा पूर्ण किनारा नीट चालत पाहता आला असता. पण देवगड दीपगृह बंद होण्याच्या आत तिथं पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे पावले परत वळली.

सूर्य पश्चिमेच्या आसमंतात क्षितिजाकडे झेपावू लागला होता आणि आता माझी सावली माझ्या पुढे निघाली होती. पुन्हा एकदा सड्यावरून दोन किमी चालत जायचं होतं. मग गाडी घेऊन देवगड दीपगृह सव्वापाच च्या आत गाठायचं होतं. ते मला कसेबसे जमलेही.. परंतु वीज पडून दुर्घटना घडल्याने दीपगृह परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मुंबई ते गोवा या टप्प्यातील हे एकमेव दीपगृह आहे जे मी पाहिलेलं नाही. आणि तिथं दारात तीनदा पोहोचूनही पाहू शकलेलो नाही. अगदी खांदेरी, वेंगुर्ला रॉक्स अशी बेटांवरची दीपगृहे असतील किंवा नानवेल सारखं ट्रेक करायला लागणारं काहीसं दुर्गम दीपगृह असेल.. किंवा आंजर्ले केळशीच्या मध्ये असलेलं ताडाचा कोंड गावचं नवीन दीपगृह असेल… या सगळ्यांनी माझा उत्तम पाहुणचार केला.. पण देवगड दीपगृह काही फत्ते झालेलं नाही. इथं परत भ्रमंतीला यायला तेवढंच एक निमित्त..

पण दिवसाचा शेवट मात्र अजून एका खास अनुभवाने समृद्ध झाला. देवगड किल्ल्याच्या पश्चिम तटबंदीवर येऊन बसलो तेव्हा सूर्यनारायण अस्ताला जाण्याच्या तयारीत होता. बुरुजावर मराठ्यांचा भगवा जरीपटका दिमाखात फडकत होता.. रांगड्या जांभा खडकात बांधलेल्या बुरुजामागे समुद्रानेही भगवा धारण केलाय असं भासत होतं. छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्याच्या शिलेदारांनी दिल्लीपलीकडं जाऊन भारताच्या उत्तर सीमेचे रक्षण केले आणि इथं पश्चिम सागरतटावर आक्रमण करू पाहणाऱ्या आरमारी शत्रूनाही वेसण घातली. इथल्या पाण्यात पोर्तुगीज, डच, इंग्लिश, सिद्दी सगळ्यांनीच मराठा आरमाराचा तडाखा खाल्ला आहे. कान्होजींच्या पराक्रमाने अजरामर झालेला कुलाबा असो किंवा घेरिया आणि शिवरायांच्या साक्षेपी धोरणातून घडलेला सिंधुदुर्ग असो वा खांदेरी.. मराठ्यांच्या इतिहासाच्या एका सोनेरी अध्यायातलेच हे मानकरी. हरहर महादेव गर्जना करत वेगाने लाटांवर स्वार होऊन आलेलं एखादं मराठा गलबत, पाल, शिबाड समोर दिसेल की काय असं मला क्षणभर वाटलं. एखाद्या युरोपियन जहाजाच्या वरामीला असलेल्या तोफा टाळत तांडेल वेगाने आपलं शिबाड जवळ नेतील.. मग युरोपियन लोकांकडून पळवलेल्या त्यांच्याच तोफा त्यांच्यावरच डागत हल्ला करतील. हेलकावे खाणाऱ्या शिबाडांवरील या तोफा आळीपाळीने आग ओकत शत्रूच्या जहाजाला खिंडार पाडतील आणि मग कोळी, खारवी, दालदी समाजातील मराठा योद्धे आपल्या बाकदार समशेरी घेऊन निकराचा वार करतील. असं सगळं दृश्य डोळ्यासमोरून सरकलं. खरंच या पुरातन वास्तू म्हणजे टाइम मशीनच असतात.