भगवान परशुरामाने वसवलेल्या कोकण किनाऱ्यावर श्री शिवशंकराचा वरदहस्त आहे. हिमालयावरील कैलासावर जितका नीलकंठ रमत असेल तितकाच तो कोकणातील रम्य शांत वातावरणातही रमतो असं मला वाटतं. कुठं समुद्रकाठी, कुठं नदीकाठी, कुठं तळ्याकाठी तर कुठं वाहत्या झऱ्याला लागून शिवाचा अधिवास कोकणात आहे. असेच एक गूढ रम्य आणि शांत ठिकाण म्हणजे वाड्याचे श्री विमलेश्वर देवस्थान. इथे एका खोदीव लेण्यात शंकराचे देऊळ आहे.. सभोवताली गर्द वनराई, त्यातून खळाळत वाहणारा झरा आणि पठारावरची हिरवीगार शेती या कोंदणात विमलेश्वराचे स्थान कित्येक शतके इथे आहे


वाडा हे गाव देवगड पडेल विजयदुर्ग या मार्गावर आहे साधारणपणे देवगड पासून 13-14 किलोमीटर अंतरावर ही जागा असेल मुख्य रस्त्यापासून फणसेच्या किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळले की उतारावर एक कमान दिसते तिथून पायऱ्यांनी खाली उतरून गेल्यानंतर आपल्याला विमलेश्वराचे दर्शन होते. सगळ्यात आधी आपले लक्ष जाते ते तिथल्या अनेक वीरगळ आणि सती शिळांकडे…




इथं जवळ काही मोठे युद्ध झाले होते का असा प्रश्न इतक्या मोठ्या संख्येतील वीरगळ पाहून पडतो… आता आपल्याला तिथेच वाहणाऱ्या झऱ्याची खळखळ ऐकू येऊ लागते.. त्यानंतर दिसते ती कालभैरवाची गुफा. इथं महिला आतपर्यंत जाऊन दर्शन घेत नाहीत.

ग्रामस्थ मानतात की या ठिकाणाला किमान चारशे वर्षांचा इतिहास आहे.. जसा काशीचा विश्वेश्वर तसा इथला प्रतिकाशीचा विमलेश्वर अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. जसे काशीला आधी गंगास्नान करून मग कालभैरवाचे दर्शन घेऊन नंतर विश्वेश्वराकडे जातात तशीच इथली परंपरा आहे.

नारळ, सुपारी आंबे, फणस आणि इतर उंच वृक्षांच्या दाट जाळीतून इथं झिरपणारा प्रकाश उबदार असला तरी सुखावणारा वाटतो. बारमाही झऱ्याच्या थंडगार पाण्याने पावलेही सुखावलेली असतात.. इथं गरम पाण्याचे कुंड आहे, हे पाणी पूजेसाठी आणि पिण्यासाठीही वापरले जाते. खळाळत्या प्रवाहाखाली अगदी नैसर्गिक मिनरल वॉटर पिऊन आपण तृप्त होतो.


जांभा कातळात खोदून काढलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इतर ठिकाणी शिवदर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात पायऱ्या उतरून जावे लागते तर इथं पायऱ्या चढून. सभामंडपात वटवाघळांचा किचकिचाट ऐकू येतो.. इथल्या छपराला लागून त्यांची मोठी वसाहतच आहे म्हणा ना.. पण भाविकांना त्याचा कसलाही त्रास नाही.. त्यामुळे कोणतीही भीती काळजी न बाळगता इथं दर्शन घ्यावे.

मंदिराची दर्शनी बाजू फारच भव्य आहे.. मध्यंतरी इथं पत्र्याचा मंडप घातलेला असल्याने हे नीट दिसत नव्हते.. आता मात्र दोन्ही बाजूला असलेले अजस्त्र दगडी हत्ती आणि त्यावर बसलेले माहूत, तसेच हनुमान, ब्रह्मा, महेश, विष्णू आणि गरुड अश्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. काही जण मानतात की या पाच मूर्ती पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. इथं कोकणी शैलीच्या जांभा दगडातील दीपमाळाही आहेत.

मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव सात दिवस चालतो. माघ कृष्ण दशमीच्या दिवशी देवाची पालखी देवळात आणली जाते आणि अमावस्येपर्यंत रोज रात्री भक्त पालखी घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालतात तिथे रोज कीर्तनही होते. दिवसभर भोजनाचे कार्यक्रम देवळात होतात अमावस्येच्या दिवशी भक्तगण पालखी घेऊन समुद्र स्थानाला जातात आणि अशा रीतीने महाशिवरात्रीचा सोहळा संपन्न त्याच्या बिंदूला पोहोचतो. हे समुद्रस्नान जवळच्याच फणसे नावाच्या समुद्रकिनारी होते कोकणातील हा एक अतिशय सुंदर अनाघ्रात, अस्पर्श असा किनारा आहे त्याबद्दल एक स्वतंत्र ब्लॉग मध्ये माहिती दिलेली आहे ती जरूर वाचा.