
दर्या फिरस्तीसाठी भ्रमंती करत असताना रेवस पासून तेरेखोल पर्यंत मी 125 हून अधिक समुद्रकिनारे पाहिले. गुहागर, वेळणेश्वर, भोगवे, तारकर्ली, दिवेआगर असे प्रसिद्ध किनारे तर आहेतच. पण बाकाळे, माडबन, कोंडुरा, फळयेफोंड, गोडीवणे असे पर्यटन नकाशावर नसलेले किनारेही आहेत.. शुभ्र वाळू, समुद्र आणि आकाशाची निळाई, फेसळणाऱ्या लाटा.. क्षितिजापर्यंत जाऊन पोहोचलेला किनाऱ्यावरचा एखादा डोंगर हे सगळं सगळं तेच असलं तरी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मिळणारा अनुभव मात्र वेगळा. विमलेश्वर वाडा जवळ असलेला फणसे हा अतिशय सुंदर आणि अस्पर्श सौंदर्य असलेला किनारा. गूगल मॅपवर ही पुळण अगदी स्पष्ट दिसते. गावाला लागून खाडी आणि मग सुरूची झाडी यातून मार्ग काढत पलीकडे गेले की आपण या रम्य सागरतीरावर पोहोचतो.

गेल्या वेळी मी इथं सायंकाळी पाचच्या सुमारास गावात पोहोचलो आणि मग सुरुच्या जंगलात अडकलो. किनारा न पाहताच परतलो. नकाशात पाहून लक्षात आलं की ओहोटीच्या वेळेला खाडीच्या बाजूने कदाचित चालत जाता येईल. काल तसाच गावात पोहोचलो. खाडीच्या जेट्टीवर गेलो तेव्हा एक स्थानिक जोडपे ओहोटीने मोकळ्या झालेल्या वाळूतून चालत येताना दिसले. त्यांना माझ्या अंदाजाबद्दल विचारले तर त्यांनी दुजोरा दिला.

सुमारे 20 मिनिटे कांदळवन आणि खाडीच्या ओलसर वाळूतून चालत गेलो आणि इथं पोहोचलो! कोकणातील स्वर्गीय सौंदर्य अनुभवायला थोडीशी वाट वाकडी करावी लागते! अर्थात स्थानिकांना विचारून, भरती ओहोटीच्या वेळा नीट तपासून मगच अशा गोष्टी कराव्यात आणि निसर्गाच्या शिस्तबद्ध वेळेचे भान ठेवावे. सामान भरले, गाडी काढली रिसॉर्ट बुक केलं की सगळीकडं जीवाची प्रति मुंबई करायला धावले म्हणजे पर्यटन सार्थक झाले असे नव्हे. थोडा वेळ, थोडं कुतूहल आणि थोडीशी मेहनत सुद्धा हवी..

किनाऱ्यावर उभा राहून सागराचा ठेका आणि तिथला निःशब्द आसमंत अनुभवताना मला आरती प्रभूंच्या ओळी आठवल्या.
तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा
पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन, चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा
शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी, यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा
देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे, साराच आसमंत घननीळ होत जावा
पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो, शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा
तारांवरी पडावा केव्हा चुकून हात, विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा
तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

रेवस ते तेरेखोल या टप्प्यातील जवळपास सगळे सागरतीर आता दर्या फिरस्तीच्या भ्रमंतीत कव्हर झाले आहेत. आता हळूहळू मुंबई जिल्हा आणि उपनगरे व उत्तरेकडील ठाणे पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारे चित्रित करायचे आहेत. या परिसरात दक्षिणेला पडवणे-पालये चा अतिशय सुंदर समुद्रकिनारा आहे. लेण्यांमध्ये वसलेलं अनोखं विमलेश्वर शिवालय सुद्धा आहे. त्याची चित्रकथा पुन्हा केव्हातरी.
नमस्कार 🙏🏼 सर
लेख वाचून छान वाटलं. आनंद झाला. कोणीतरी आपल्या गावाबद्दल चार शब्द लिहिले त्यांचा अभिमान पण आहेच. फणसे माझं गाव. आज तो परिसर तुमच्या नजरेने पहायला मिळाला. खूप छान वाटले.
तुम्हाला तुमच्या ह्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐