हा ब्लॉग मीनल आपटे हिंगे यांच्या प्रायोजनातून साकार झाला आहे. – संगमेश्वर तालुका म्हणजे निसर्ग, इतिहास, संस्कृती यांचं अद्वितीय मिश्रण असलेलं एक विलक्षण रसायन. शास्त्री नदीच्या खोऱ्यातील डोंगर दऱ्या आणि त्यांच्या दरम्यान वसलेली गावं. करजुवे चा त्रिवेणी संगम पाहून तुरळ कडे जाणाऱ्या रस्त्यावर असंच एक विलक्षण गाव आहे.. त्याचं नाव मावळंगे.. स्वतंत्र भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष झालेले माननीय श्री दादासाहेब मावळंकर इथलेच.. मराठ्यांच्या इतिहासाची सविस्तर मांडणी करणारे रियासतकार सरदेसाई सुद्धा इथलेच.. पण मुख्य मार्गापासून गावात जाणारा रस्ता मात्र खडबडीत..

चारी बाजूंनी गर्द झाडीने वेढलेल्या एका उतारावरील भागात असलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी गाडी रस्त्यापासून खाली जांभा दगडाची पाखाडी उतरून जावं लागतं. आणि अचानकपणे एक टुमदार सभामंडप असलेलं देऊळ आपल्यासमोर येतं. हेच योगनरसिंहाचे स्थान.

मंदिराचा सभामंडप तुलनेने नवीन बांधकाम असलेला आहे, पण मूळ गाभारा मात्र पुरातनच असावा असे दिसते. मंदिराच्या बाहेर लावलेल्या दोन दगडी फलकांवर बरीच ऐतिहासिक माहिती नमूद केलेली आहे. करजुवेहून तुरळ कडे जाणाऱ्या मार्गावर डाव्या बाजूला मावळंगे चा फाटा जातो.. तिथून कच्च्या मार्गाने गाडी देवळापाशी पोहोचते.. काही पायऱ्या उतरून देऊळ गाठता येते. गाभाऱ्याला कुलूप लावलेलं असते त्यामुळे गुरवांशी संपर्क साधून जाणे केव्हाही श्रेयस्कर

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजे नरसिंह किंवा नृसिंह अवतार.. दुभंगलेल्या खांबातून बाहेर येऊन हिरण्यकश्यपूचा कोथळा फाडणारे हे दैवी स्वरूप.. याला विदरण नरसिंह म्हणतात.. उभा असणारा स्थौण नरसिंह.. लक्ष्मी सोबत असलेला लक्ष्मी-नृसिंह (कर्णेश्वर देवळाच्या बाजूला एक लक्ष्मी-नृसिंह देवस्थान आहे) अशी अनेकविध रूपे आहेत… मेळुकोटे, कराडजवळचे कोळे नरसीपूर, हळेबिडू अशा अनेक ठिकाणी नृसिंह शिल्पे आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो ती मांडी घालून बसलेली पायाला योगपट्ट बांधलेली योग-नरसिंह मूर्ती…

भारतविद्या पारंगत आशुतोष बापटांनी त्यांच्या पुस्तकात या मूर्तीचे विलक्षण सुंदर वर्णन केले आहे. उजव्या खालच्या हातात कमंडलू तर वरच्या उजव्या हातात चक्र आहे. वरच्या डाव्या हाताने शंख धारण केलेला असून खालच्या डाव्या हाताने लक्ष्मीला आलिंगन दिलेले दिसते. लक्ष्मीची आभूषणे मराठी शैलीची आहेत. नथ आणि नऊवारी, दोन वाट्यांचे मंगळसूत्र, केसांचा अंबाडा आणि पुतळ्यांची माळ असा हा विलक्षण साज आहे.

मूर्तीच्या शिरावर करंडमुकुट आहे आणि नागाच्या फ़ण्याने त्यावर छत्र धरलेले आपल्याला दिसते. मुकुटावरील कोरीवकाम नाजूक आणि सुबक आहे आणि इतके प्रमाणबद्ध कोरीवकाम पाहून आपण चकित होतो.

मूर्तीमागे असलेल्या प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत, त्यांची रचना उजवीकडून डावीकडे केलेली दिसते. यातील मत्स्य आणि कूर्म अवतार हे मनुष्य रूपात इथं कोरलेले दिसतात हे इथले वैशिष्ट्य

नमः श्री नरसिंहाय मावलङ्ग निवासिने, नृसिंह भट्ट वन्शस्य दीर्घ उद्धार कारिणे
गोदावरी नदीच्या तीरावर राहणारे नरसिंह भक्त नृसिंह भट्ट सत्यवादी हे कौशिक गोत्री ब्राह्मण दहाव्या शतकाच्या अखेरीस देशाटन करत मावळंगे येथे आले आणि नृसिंहाचे हे जागृत ठिकाण पाहून इतके प्रभावित झाले की त्यांनी इथेच वास्तव्य करण्याचे ठरवले. त्यांचे नातू नृसिंह भट्ट यांनी कोल्हापूरचा शिलाहार राजा विजयार्क (इसवीसन 1142 ते 1154) याच्याकडून संगमेश्वर गाव इनाम मिळवला. त्याचा पुत्र कृष्णाजी याने विजयार्क पुत्र भोजराजा (इसवीसन 1190 ) याच्या पदरी पराक्रम गाजवला व संगमेश्वर गाव वसवले.. त्याला मावळंगे गाव इनाम मिळाला आणि मग तिथे लक्ष्मी-नृसिंह मंदिर बांधले गेले. पुढे त्याच्या वंशातील केशवनायक याने १६३७ ला इथं घुमट आणि लाकडी सभामंडपाची रचना केली. त्यानंतर सुमारे अडीचशे वर्षांनी झोंबडीकर देसाई मंडळींनी साली मंदिराचा जीर्णोद्धार केला.मंगलोरी कौलांचे छप्पर तेव्हाच उभारले गेले.

अतिशय सुबक असे लाकडी कोरीवकाम आपण आजही गर्भगृहाजवळ पाहू शकतो. या भागात पुढे सिंघण राजा यादवांचे शासन आले आणि कृष्णभट्टच्या कर्तबगारीने त्यांना इथलं सरदेसाईपण मिळालं आणि तेच नाव या कुटुंबाने धारण केले.. काही जण मावळंगे गावावरून मावळंकर नाव लावू लागले. रियासतकार सरदेसाई इथलेच. बडोद्याचे आणि कोल्हापूर येथेही गोविंद सखाराम सरदेसाई, पुणे येथील डॉ नरहर गोपाळ सरदेसाई आणि अहमदाबाद येथील गणेश वासुदेव मावळंकर यांनी सर्व ऐतिहासिक साधने तपासून आणि संकलित करून या घराण्याचा इतिहास लिहिला व 26 एप्रिल 1926 रोजी नृसिंह जयंतीच्या दिवशी प्रकाशित केला. पुढे ग. वा. मावळंकर यांनी पुढाकार घेऊन रत्नागिरीचे कंत्राटदार नाना सुर्वे यांच्या मदतीने 1938 साली मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला.. त्यासाठी मात्र रुपये 4500 खर्च झाला असे दगडी फलक नमूद करतो.
श्री लक्ष्मी नृसिंह ‘ देवस्थान (मावळंगे ) येथे भेट देणे अथवा अन्य कुठलीही माहिती संदर्भात खालील ठिकाणी संपर्क साधावा .
१)श्री संजय मु. सरदेसाई 020-25673310
२) श्री जयंत न.सरदेसाई 020-24359397, +91 9422317690
३)श्री प्रदीप सु. सरदेसाई +91 9271110668
संगमेश्वर परिसरात अनेक शांत, रम्य आणि अध्यात्मिक अनुभूती देणारी मंदिरे आहेत.. राजवाडी येथील सोमेश्वर देवस्थानही असेच आवर्जून पाहण्याजोगे आहे.