
या ठिकाणाचे चित्रण करण्यासाठी अमृता रास्ते यांनी प्रायोजक म्हणून योगदान दिले.
रत्नागिरी शहरातून आरे-वारे रस्त्याने गणपतीपुळेकडे जाताना साखरतर पूल पार केला की एक अतिशय सुंदर ठिकाण लागतं. ते म्हणजे काळबादेवी. खरं म्हणजे या गावाचे नाव पुसाळे होते परंतु कालंबिका देवीचे म्हणजेच काळबादेवीचे मंदिर इथं असल्याने गावाला काळबादेवी असं नाव पडलं. शंकराच्या या मंदिरासाठी अतिशय सुंदर ठिकाण निवडण्यात आले आहे. असं म्हंटलं जातं की काळंबादेवी ही देवी गोव्याहून इथं आली. रामेश्वर मंदिराच्या चारही बाजूला दगडी तटबंदीचे संरक्षण आहे.

या मंदिराची दुरुस्ती नेवरे येथील मुकादम महादेव वासुदेव बरवे यांनी शके १८१० म्हणजे १८८९ साली केली असा कोरीव लेख इथं लावलेला दिसला. माझा लहानपणापासूनचा मित्र सुशांत प्रकाश बरवे हा नेवरे गावचा असल्याने मी त्याच्या वडिलांना याबद्दल विचारले.. ते त्यांच्या आजोबांचे आजोबा निघाले. भ्रमंती करत असताना अशा गोष्टी अचानकपणे गवसणे खरंच मजेची गोष्ट आहे.
या देवळात एक पोर्तुगीज घंटा आहे. स्थानिकांच्या मते या घंटेचे वजन ५०० किलो आहे आणि तिचा आवाज अनेक किलोमीटर दूर ऐकू जातो. या घंटेवर क्रूस आणि १७३७ साल कोरलेले दिसते. सांगलीचे सरदार पटवर्धन यांनी विसाजीपंत लेल्यांच्या मार्फत ही पोर्तुगीज घंटा उंटावरून इथं पाठवली अशी नोंद इतिहासकारांना सापडली. अशा पोर्तुगीज घंटा महाराष्ट्रात ५० ठिकाणी तरी असतील.

अगदी साधी पण प्रमाणबद्ध बांधणी आणि निळ्या रंगाने रंगवलेलं हे मंदिर सागराच्या निळाईशी नातं सांगतं. दगडी दीपमाळा आकाशाच्या निळेपणाशी एकरूप होताना दिसतात. अशी ठिकाणे जीर्णोद्धार करण्याच्या नावाखाली आपलं मूळ स्वरूप हरवून बटबटीत होऊ नयेत यासाठी कोकणात जागृती करावी लागेल. कोकणातील अशा विलक्षण ठिकाणांची माहिती आणि फोटो पाहण्यासाठी आमच्या दर्या फिरस्ती ब्लॉगला भेट देत राहा ही सर्व कोकणवेड्यांना आग्रहाची अगत्याची विनंती.
या ठिकाणाचे चित्रण करण्यासाठी अमृता रास्ते यांनी प्रायोजक म्हणून योगदान दिले.
Me kalbadevichi aahe. Yamdhe ji blue and white dipmala disate tichya pujecha man amachya gharat aahe. Majhe sasare Ketan Bhole ani ata majhe husband Mahesh Bhole Tripurari pornimela puja karatat. I am pround as Konkankar.