
निवती आणि भोगवे या दोन अप्रतिम समुद्र किनाऱ्यांच्या मध्ये असलेल्या एका डोंगरावर बांधलेला किल्ले निवती म्हणजे दर्याचा दोस्तच. ब्लू फ्लॅग चं आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेला शुभ्र वाळूचा किनारा पाहायला सर्वात योग्य जागा म्हणजे किल्ले निवतीचा उत्तरेकडे असलेला बुरुज.

गोड मालवणी बोली, तितकेच गोड शहाळ्याचे पाणी, खारा पण थंड सागर वारा, नितळ निळाईचे विविध अविष्कार दाखवणारा समुद्र, नारळ पोफळीच्या हिरव्यागार बागांनी स्वच्छ सफेद वाळू बरोबर केलेली रंगसंगत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षेपी दृष्टीने आणि दृढनिश्चयाने रचलेला इतिहास या सगळ्यांच्या मिश्रणातून घडलं आहे कोकण. एखाद्या शांत सकाळी किंवा धीरगंभीर संध्याकाळी किल्ले निवतीच्या माथ्यावरून कोकणचा अद्भुत अविष्कार अनुभवायला मिळणं अविस्मरणीयच.

निवती गावातून छोटा गाडीरस्ता माथ्याकडे येतो. चढ पार केला की दक्षिणेकडे दिसतो निवतीचा अस्पर्श सागरतीर आणि त्यावरील खडकांची नक्षी. इथल्या उंच खडकाळ भागाला स्थानिक लोक जुनागड असे म्हणतात.

गाडीवाटे च्या डाव्या बाजूला एक छोटीशी पायवाट वर चढते. तुटलेल्या दगडी पायऱ्यांच्या वाटेने खंदक पार करून आपण किल्ल्याच्या मुख्य भागात येतो. पावसाळ्यात इथं गवत माजते आणि करवंदाच्या झाडांच्या फांद्या रानमेव्याने लगडलेल्या असतात.
किल्ल्यावर विविध बांधकामांचे अवशेष आपण पाहू शकतो. जांभा दगडातील या रचना सतराव्या शतकातील असाव्यात असे अभ्यासक मानतात. शिवरायांनी सिंधुदुर्ग बांधल्यावर लगेचच किल्ले निवती सुद्धा बांधून घेतला असा इतिहासकारांचा कयास आहे. किल्ला लहानच असला तरीही पश्चिमेला अथांग सागराचे अवर्णनीय दृश्य पाहायला तासभर बसलं तरीही मनाचं समाधान होत नाही. इथं समुद्रातून वर आलेले खडक हे ग्रॅनाईटचे असावेत असं मला वाटतं. पण यावर तज्ज्ञ लोकच प्रकाश टाकू शकतील.

१७४८ च्या आधी हा किल्ला सावंतवाडीच्या राजाकडे होता अशी माहिती पिसुर्लेकर पोर्तुगीज कागदपत्रांच्या हवाल्याने देतात. सावंतवाडी संस्थानचा इतिहास या पुस्तकातील नोंदीनुसार १७०९ साली गादीवर आलेल्या फोंड सावंताने निवती किल्ला बांधला असा दावा केला गेला आहे. १७४८ साली इस्लामखान नावाच्या सेनापतीने पोर्तुगीजांच्या वतीने हल्ला करून निवती किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७५४ मध्ये सावंत आणि पोर्तुगीज यांच्यात तह होऊन किल्ला पुन्हा सावंतवाडी संस्थानाकडे आला. १७८८ च्या सुमारास कोल्हापूरकरांनी हा किल्ला जिंकला. १८०६ च्या आसपास चंद्रोबा सुभेदार या सावंतवाडीच्या सरदाराने किल्ला कोल्हापूरकरांकडून जिंकून घेतला. कॅप्टन कीर नावाच्या इंग्लिश अधिकाऱ्याने ३ फेब्रुवारी १८१९ रोजी किल्ले निवती इंग्लिश साम्राज्यासाठी हस्तगत केला.

इथून दूर समुद्रात दिसणारे एक खास दृश्य म्हणजे वेंगुर्ला रॉक्स किंवा बर्न्ट आयलंड या नावाने ओळखला जाणारा द्वीपसमूह. यावर १८३० आणि १९३० साली बांधलेली दीपगृहे आहेत. इथं जाण्यासाठी वेंगुर्ला बंदरातून खास होडी ठरवावी लागते. दर्या फिरस्तीच्या प्रवासात हे एकमेव ठिकाण असे उरले आहे जिथं मी अजून पोहोचलो नाही. लवकरच हा योग घडून यावा ही उत्सुकता आहेच. कोकणातील किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, लेणी यांची गोष्ट आम्ही दर्या फिरस्ती ब्लॉगच्या माध्यमातून सांगत आहोत. या चित्र भ्रमंतीत सहभागी होण्यासाठी ब्लॉगला भेट देत रहा.