
अलिबाग शहरात बेने इस्राएल समाजाची जवळजवळ १०० कुटुंबे राहत असत. पुढे १९५० नंतर ही संख्या कमी होऊन फक्त ७ वर आली. अलिबागच्या कोळीवाडा परिसरात मेगन अबोथ सिनेगॉग नावाचे हे ज्यू मंदिर आहे. हे मंदिर इसवीसन १८४८ च्या सुमारास बांधले गेले आणि आणि पुढे १९१० साली याचा जीर्णोद्धार केला गेला. निवृत्त ज्यू लोकांसाठी हे बांधले गेले असे सांगितले जाते.

अलिबागच्या या परिसराला इस्राएल आळी असे नाव आहे. कोची मधील यहुदी गुरु शेलोमो सालेम शूराबी यांच्या मार्गदर्शनाखाली हे बांधकाम १८४८ मध्ये झाले आणि १९१० ची बांधणी लोकवर्गणीतून केली गेली. सॅम्युएल सॉलोमन माझगावकर यांनी वास्तुरचनेत मदत केली तर मोझेस सॅम्युएल वाकरुळकर यांनी बांधकामाचे पर्यवेक्षण केले हे तिथं लावलेल्या पाट्यांवरून लक्षात येते. सॉलोमन आरोन चारीकर वडीये यांनी सर्वेक्षण केले तर हानाबाई शापूरकर यांनी सभोवताली भिंत बांधण्यासाठी दान दिले.

डोरिक पद्धतीचे स्तंभ असलेल्या या बांधकामावर पोर्तुगीज शैलीचा प्रभाव जाणवतो. बांधकामाची सौंदर्यशैली निओ क्लासिकल धाटणीची आहे. पहिल्या मजल्यावर असलेल्या छज्जावरून महिलांना दर्शनाची सोय केली गेली. मी जेव्हा या ठिकाणी जानेवारी २०१८ मध्ये गेलो तेव्हा तिथं कुलूप लावलेले असल्याने बांधकाम आतून पाहता आले नाही. इस्राएल हून आलेल्या एका कुटुंबाची भेट घेण्याचा योग तेव्हा आला.
संदर्भ –
१. ज्यूईश हेरिटेज ऑफ डेक्कन – केनेथ रॉबिन्स आणि पुष्कर सोहोनी
२. इवोल्युशन ऑफ बेने इस्राएल अँड सिनेगॉग्स – इरिन जुडाह ( टिपणनोंदी – दीप्ती बापट)