गोवळकोंड्याची राणी तिच्या लवाजम्यास अरबस्तानाच्या प्रवासाला निघाली होती. वेंगुर्ले बंदरातून तिचे जहाज आजच्या येमेनमधील मोखा बंदराकडे निघणार होते.. तिच्या सोबत ४ हजार घोडदळ होते.. लांब दाढी राखलेले धनुष्यबाण धारी बलदंड सैनिक उत्तम दर्जाच्या इराणी घोड्यांवर स्वार होऊन निघाले होते. रोमन योद्ध्यांप्रमाणे या सैनिकांच्या कोटांच्या खांद्यावर सापाची चिन्हे होती… आणि कोटाला धातूची नक्षी होती… शिरस्त्राणे पॉलिश केलेली होती.. राणी आणि तिच्या सोबत असलेल्या राजसी महिला बंद पालख्यांतून प्रवास करत होत्या.. मागे काही उंट सुद्धा होते आणि एक केटल ड्रम वादक सफाईने वादन करत होता.. राणीच्या वास्तव्यासाठी खास शामियाना उभारला गेला होता. डच वखारीचा प्रमुख तिला भेटण्यासाठी शहराबाहेर २ लीग (सुमारे नऊ किमी) बाहेर आला. ती विविध भाषांमध्ये सफाईदारपणे तिच्या लेखनीसांना मजकूर सांगत होती. तिला तिच्या शिडांच्या होडीवर नेण्यासाठी एक शॅलाँप (एक प्रकारचे उथळ पाण्यात मालवाहतूक करणारे जहाज) तयार होते. कॅलिको नावाच्या सूती कापडाने तिची बोट भरलेली होती. वेंगुर्ले बंदराबद्दल १६६० सालची ही गोष्ट आपल्याला रत्नागिरी गॅझेटमध्ये वाचायला मिळते.

मिंगर्ला, फिंगर्ला अशा विविध नावांनी प्रचलित या बंदरात इसवीसन १६३८ च्या आसपास डचांनी वखार स्थापन केली. गोव्याची व्यापारी नाकेबंदी करणे हा या ठिकाणचा मुख्य उद्देश होता.. १६४१ साली इथली तटबंदी पूर्ण झालेली दिसते. मुबलक गहू आणि भात असल्याने या बंदराची डचांनी निवड केली. १६६० सालचे या बंदराचे वर्णन खूप रंजक आहे. अर्धा लीग (सव्वादोन किमी लांब) समुद्र किनारा.. उत्कृष्ट नागरी रस्ते. किनाऱ्याला लागून २०० फूट उंच डोंगर आणि रेडी पर्यंत परसलेल्या टेकड्या असा इथला भौगोलिक आराखडा. वरील चित्रात मेजर रॉबर्ट पूजे ने १८५० च्या आसपास प्रकाशित केलेले चित्र वेंगुर्ल्याची डच वखार कशी होती याची कल्पना देते.

सुमारे १९०९ च्या आसपास प्रकाशित झालेल्या या फोटोत वखारीचे बांधकाम शाबूत असलेले दिसते. आज मात्र हे ठिकाण पूर्णपणे मोडकळीस आले आहे. झाडोरा माजला आहे.. साप विंचू आहेत.. डोक्यावर बांधकाम कोसळण्याची भीती आहे.. एकेकाळी समृद्ध व्यापारी केंद्र असलेल्या या ठिकाणाला आलेली अवकळा पाहून दुःख वाटते. इथं एकेकाळी जपान, श्रीलंका, बटाव्हिया (जकार्ता) तसेच बंगाल हून व्यापारी जहाजे येत असत. सूरत, ओमूर्झ, मोखा, बसूरा अशा बंदरांशी वेंगुर्ले व्यापार करत होते. पुढं बेळगाव-धारवाडच्या ब्रिटिश छावण्यांशी संपर्कात असल्याने डचोत्तर काळातही वेंगुर्ला आपले महत्व टिकवून होते. इथले लोक उत्साही आणि उद्यमी आहेत.. ऊर्जेने भारलेले आहेत अशी ऐतिहासिक वर्णने आहेत. दक्षिण महाराष्ट्र ते मुंबई व्यापाराचेही हे केंद्र होते. कुडाळमार्गे घाटमाथ्याकडे जाणारे रस्ते होते. कापूस, मिरच्या, जाड कापड, तंबाखू, नारळ, सुपाऱ्या, काजू, कोकम अशी उत्पादने बंदरात येत. इथून तेल, मीठ निर्यात होत असे. लाल समुद्रातील अनेक बंदरांशी वेंगुर्ले संपर्कात होते. उत्कृष्ट दर्जाची वेलची आणि भात इथं मिळत असे. रेडीहून जपानला लोह-खनिज जात होते. सिलिकाचा व्यापार होता. अरबांनी याला तोमाषेक म्हंटले तर कोणी विंगॉर्ता तर पोर्तुगीजांनी बामदा ( बांद्याला जवळ बंदर) म्हंटले.

बिजापूर दरबारकडून इथं जोहान वॅन ट्विस्ट नामक अधिकाऱ्याने १६३८ मध्ये परवानगी मिळवली व हे केंद्र सुरु झाले. इशरत आलम नामक इतिहासकार सांगतो की छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी ६ लक्ष पौंड तांबे डचांकडून घेतले होते. सुमारे १६८२ ला इथून डचांची गच्छंती झाली आणि १६९२ च्या आसपास वखार पूर्णतः बंद झाली. पुढं आर्थर क्रॉफर्ड रत्नागिरीचा उप-जिल्हाधिकारी आणि मॅजिस्ट्रेट झाला तेव्हा इथं इसवीसन १८७६ मध्ये नगरपालिका स्थापित झाली. १९५१ मध्ये वेंगुर्ल्याची लोकसंख्या सुमारे २२ हजार होती त्यापैकी ६ हजार शेतकरी, २ हजार व्यापारी आणि १२०० वाहतूकदार होते.. १९५६-५७ च्या आसपास वेंगुर्ले नगरपालिका २ लाख रुपये खर्च करत होती. शाळा, नगरवाचनालय, लहान मुलांची बाग अशा अनेक नागरी सुविधा निर्माण केल्या गेल्या. टेकडीवर प्रवासी बंगला बांधला गेला.

१६६४ च्या आसपास छत्रपती शिवरायांनी वेंगुर्ल्याला ठाणे उभारले असे टॅव्हर्निए सांगतो. शिवचरित्र वाचत असताना वेंगुर्ल्याचे अनेक उल्लेख येतात. ५ मे १६६० च्या पत्रात अफझल खान एक क्रूर सेनापती असल्याने त्याच्या मृत्यूचे फारसे दुःख कोणाला झाले नाही असे डच सांगतात. पुढं सिद्दी जौहर सलाबत खानाच्या १६ ते २० हजार घोडदळ आणि ३५ ते ४० हजार पायदळाचा मराठ्यांशी मुकाबला झाल्याची नोंद आहे. इसवीसन १६६४ चे वर्ष वेंगुर्ल्यासाठी धामधुमीचे ठरले असे ऐतिहासिक नोंदींवरून दिसते. २५ जुलै १६६४च्या पत्रात पीटर वॅन सान्तवेलिस्ट ने शहाजी राजेंच्या अपघाती मृत्यूचा उल्लेख केला आहे. त्या काळात विविध युरोपियन लोकांना तोफखान्यावर सहज नोकरी मिळत असे असं दिसतं. राजापूरवर शिवरायांनी एक हजार घोडदळ आणि तीन हजार पायदळ घेऊन आक्रमण केलेले दिसते. शाईस्तेखानाचा पराभव केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुडाळ घेतले तेव्हा त्यांच्याकडे ४ हजार घोडदळ आणि १० हजार पायदळ होते अशी डच नोंद करतात. मार्च १६६४ मध्ये बंदी बेगम मक्केला गेली तेव्हा राहुजी सोमनाथने पाटगाव पासून वेंगुर्ले पर्यंत तिला संरक्षण म्हणून १५० पायदळ आणि ५० घोडदळ दिले होते असे डच पत्रव्यवहार सांगतो.

१ मे १६६४ रोजी शिवरायांनी कुडाळ मोहीम हातात घेतली. त्यांच्याकडे १० हजार पायदळ, ५-६ हजार घोडदळ, ७-८ हजार मजूर, ४-५ हजार खेचरे होती. २९ ऑक्टोबरला डच रेसिडेंटने शिवरायांकडं संरक्षण मागितले. विजापूरच्या वतीने खवासखान आणि बाजी घोरपडे मराठ्यांना रोखण्यासाठी तैनात झाले होते. सावंतवाडीच्या लखम सावंताने १२ हजार पायदळाची कुमक या दोहोंना पुरवली होती. मराठ्यांनी घाटरस्ते तोडून विजापूर फौजांना अडथळे निर्माण केले. खवास खानाचे स्वतःचे दहा हजार घोडदळ आणि बाजी घोरपडेचे १५०० घोडदळ येऊन मिळाले. २२ जानेवारी १६६५ च्या डच पत्राप्रमाणे शिवरायांनी शत्रू सैन्यावर ते एकत्र होण्याआधीच घाव घातला. बालाघाट येथे बाजी घोरपड्याशी झुंज झाली आणि शिवरायांनी त्याच्यासकट २०० माणसे मारली. ३०० घोडेस्वारांनी पलायन केले तर खवासखानासाठी आणलेला खजिना महाराजांनी जप्त केला. खवास खान आणि मराठ्यांच्या लढाईच्या वर्णनात शस्त्रास्त्रांच्या वापराचे रोचक वर्णन आहे.. खवास खान आणि मराठ्यांनी एकमेकांवर रॉकेट हल्ले केले..(रॉकेटरी चा जनक मानला गेलेल्या टिपू सुलतानाच्या बऱ्याच आधीची ही घटना आहे) लखम सावंतावरील हल्ल्यात मराठ्यांनी मस्केट चा प्रभावी वापर केला.. तर नेतोजी (नेतोजी पालकर?) कडील कार्बाईन (घोडदळाकडे असलेल्या छोट्या हलक्या बंदुका) ने खवास खानाचे अधिकारी टिपले असे डच नोंदी सांगतात. पराभवानंतर लखम सावंत गोव्यातील बार्देश ला पळाला तर कुडाळची देशमुखी शिवरायांनी कृष्णा सावंताकडे सोपवली. २२ जानेवारी १६६५ च्या लिंडर्ट लेनार्ट च्या डच ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नर ला पाठवलेल्या पत्रात मराठ्यांनी बड्या बेगमेचे जहाज जप्त करून खारेपाटण ला नेले आणि सामान घेरियात (विजयदुर्गावर) नेले अशी नोंद आढळते. १७ डिसेंबर चे पत्र सांगते की शिवाजीकडे (छत्रपती शिवरायांकडे) ४० फ्रिगेट असून खारेपाटण व राजापूर नदीच्या भागात ६० फ्रिगेट बांधल्या जात आहेत आणि वेंगुर्ल्याजवळ मोठा हल्ला नियोजित आहे. हर्णेजवळ बांधल्या जात असलेल्या जलदुर्गाचाही (सुवर्णदुर्ग) उल्लेख याच पत्रात आहे. अब्राहम ले फेबर नावाचा डच ईस्ट इंडिया कंपनीचा माणूस शिवरायांच्या राज्याभिषेकाचे वर्णन १३ ऑक्टोबर १६७५ च्या पत्रात करतो.. तो स्वतः मात्र तिथं उपस्थित नव्हता. १६७३ मध्ये डच मुंबईवर हल्ला करणार असल्याची आवई उठली होती त्याचेही उल्लेख आहेत.

१६७५ मध्ये मुघल आणि डचांच्या संघर्षात वेंगुर्ल्यात मोठी जाळपोळ झाली. १६८३ साली शहजादा मुहम्मद अकबर इराणला जाण्यासाठी वेंगुर्ले बंदरात आला आणि त्याचा बदला म्हणून मुघलांनी १६८४ मध्ये वेंगुर्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी वखारीच्या खिडक्यांतून डच सैनिकांनी चिवट प्रतिकार केला. हल्ला करायला आलेला शहजादा मुअज्जम ४० हजार फौजेनिशी अहमदनगरला परतला पण या हल्ल्यानंतर वेंगुर्ले बंदराचे महत्व कमी होत गेले. १६९६ साली इथं जवळच वेंगुर्ला रॉक्स बेटांपाशी ७ डच आणि ५ फ्रेंच जहाजांची आरमारी लढाई झाली. त्यानंतर वाडीच्या खेम सावंतने ७-८ हजार सैन्य अन दोन गुराबे वापरून हल्ला केला व वखार काबीज केली असे हॅमिल्टन सांगतो. १७०३ मध्ये इथं आंग्रेनी हल्ला केला होता. १७३८ मध्ये संभाजी आंग्रेंच्या आरमाराशी डचांचे युद्ध होऊन तीन डच जहाजे बुडाली यावर एक सविस्तर ब्लॉग निखिल बेल्लारीकर यांच्या पेपरच्या आधारे करूच. पुढे इसवीसन १७६६ मध्ये २ लक्ष रुपये गोळा करून रेडी मुक्त करण्यासाठी वेंगुर्ल्याचा महसूल वाडीच्या सावंतांनी ब्रिटिशांकडे गहाण ठेवला. १७७२ ला इथं छोटी ब्रिटिश वखार स्थापन झाली. १७७९ ला करार संपल्यावर ब्रिटिशांनी वेंगुर्ल्याचा ताबा न दिल्याने सावंतांनी पुन्हा हल्ला केला. १८१२ साली वेंगुर्ले इंग्लिश राणीकडे गेले. या तहान्वये फक्त निवती बंदर सावंतांकडे उरले पण तिथेही काही आरमारी फौज उभी राहू नये याकरिता ब्रिटिश चौकी उभी करण्यात आली. पोर्तुगीजांच्या धर्मांतर धोरणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेक शेणवी गोव्याहून वेंगुर्ल्याला आले अशी नोंद अलेक्झांडर नेर्नने केली आहे.

पुढं १९ व्या शतकात इथं नगरपालिका आली हे आपण आधी पाहिले. १०३ सरकारी शाळा रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी आल्या. वेंगुर्ले वृत्त, वेंगुर्ले न्यूज अशी नियतकालिके इथं प्रकाशित होऊ लागली (१८५९-६०) रत्नागिरी जिल्ह्यात बाणकोट, रत्नागिरी, वेंगुर्ले येथे लष्करी ठाणी उभी केली गेली आणि दापोली येथे मुख्य कॅम्प उभारला गेला. जुनी चर्चेस, सेंट ल्यूक हॉस्पिटल अशा इमारती आजही तिथं पाहता येतील. ही सगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता आणि वेंगुर्ल्याचे पर्यटनाच्या क्षेत्रातील महत्त्व लक्षात घेता या वखारीचे संवर्धन करण्याची निकड आहे. इंदिरा गांधींच्या काळात इथं डच सरकारच्या मदतीने तसे करण्याचा विचार झाला होता असे वाचले. सुनील गावस्कर वेंगुर्ल्याचे आणि मंगेश पाडगावकरांचा जन्मही इथलाच. इथल्या पर्यटन व्यवस्थेला विशेष लक्ष पुरवून विकसित करायला हवे.
तिथल्या भग्न अवशेषांतून हिंडता हिंडता भर दुपारीही जगाशी संपर्क तुटल्याचे भाव मनात दाटले होते. कविवर्य बा. भ. बोरकरांच्या मुशाफिरा मधील ओळी आठवल्या
आसपास ना कुणी
भय भरे उगी मनीं
एक रात्र होऊ या परस्परांस आसरा
या इथे वडातळी
पाय टाकुनी जळी
जागुनी वंदू कितीक काल गुंफुनी करा
शीणभाग घालवू
अन विकल्प मालवू
प्रीतीची निगूढता निशेत आणू या भरा
आपुले झरे मुके
करू जुळून बोलके
गात गात विस्तरून भेट देऊ सागरा
वखारीतून बाहेर आलो आणि गाडीत बसलो.. वेंगुर्ल्याच्या उत्तरेला असलेल्या अडीचशे फुटी टेकडीवर जाऊन तिथल्या दीपगृहावरून सूर्यास्त पाहायला निघालो.. ती गोष्ट पुन्हा केव्हातरी.
अत्यंत माहितीपूर्ण लेख, पोस्ट कर्त्याचे मनापासून आभार !