Darya Firasti

करमरकर शिल्प संग्रहालय

शिल्पकार पद्मश्री विनायक पांडुरंग करमरकर यांच्या अप्रतिम शिल्पांचे संग्रहालय अलिबाग आणि रेवसच्या मध्ये असलेल्या सासवणे गावात आहे. त्यांच्या स्नुषा सुनंदा करमरकर यांनी कुटुंबाच्या घरातच या शिल्पांचे नेटके संग्रहालय करून या कलाकाराच्या स्मृती जपल्या आहेत. लहानपणी गणपतीच्या मूर्ती घडवण्याच्या कौटुंबिक व्यवसायात सहभागी झालेल्या विनायक करमरकर यांनी घडवलेली शिल्पे ऑटो रॉटफील्ड या ब्रिटिश कलेक्टर च्या पाहण्यात आली आणि या प्रतिभावंत कलाकाराला मुंबईच्या प्रख्यात जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये शिकण्याची संधी मिळाली.

करमरकरांची शैली अतिशय वास्तवदर्शी होती आणि त्याला माणसाच्या निरीक्षणाची उत्तम जोड होती. वास्तवदर्शी शिल्पं घडवण्याच्या पलीकडेही जाऊन कलात्मक संकल्पनांचा वापर करत त्यांनी विविध कलाकृतींना आकार दिला. आपल्या शिल्पांमधून एक गोष्ट मांडण्याचा, व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शंखध्वनी, मत्स्यकन्या, हिरा कोळीण अशा त्यांच्या अनेक शिल्पांना विविध पुरस्कार मिळाले.

करमरकरांना लॉर्ड मेयो पदक मिळाले आणि त्यांच्या नावाची कीर्ती रवींद्रनाथ टागोरांपर्यंत जाऊन पोहोचली व त्यांना कलकत्त्याला बोलवण्यात आले. पुढे टाटांच्या मदतीने करमरकर लंडनला गेले आणि मग लंडन, इटली, फ्रांस, स्वित्झर्लंड अशा ठिकाणी युरोपियन मूर्तिकलेबद्दल प्रशिक्षण घेतल्यानंतर विनायकराव मुंबईला परतले आणि त्यांनी देवनार येथे स्टुडिओ उभारला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ही त्यांची खासियत होती.

करमरकर शिल्पालय

करमरकर शिल्पालयाच्या दारातच आपल्याला अगदी सजीव वाटतील अशी शिल्पे दिसतात. सासवणे गावात पोहोचल्यानंतर कोणीही करमकर शिल्पालयाची जागा दाखवू शकते. तिकीट फक्त दहा रुपये असून फोटो काढण्यासाठी अतिरिक्त दहा रुपये शुल्क आकारले जाते.

अंगणात अनेक प्राण्यांची, माणसांची शिल्पे पाहता येतात. त्यापैकी म्हशीचे शिल्प तर इतके वास्तवदर्शी आहे की कोणत्याही क्षणी ही म्हैस उभी राहणार की काय असे वाटते. १९६२ साली पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या या थोर कलाकाराची जवळजवळ २०० शिल्पे या ठिकाणी पाहता येतात.

म्हैस

शिल्पालयाच्या पहिल्या मजल्यावर अनेक व्यक्तिमत्वांची शिल्पे ओळीने रचून ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक शिल्पात कलेची, कारागिरीची जादू तर आहेच पण शिवाय प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव वैशिट्य विनायक पांडुरंग करमरकर यांनी मूर्ती घडवताना जागृत केलेले दिसते.

अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक शिल्पे पांडुरंग विनायक करमरकर यांनी घडवली. त्यापैकी काही या संग्रहालयात आपण पाहू शकतो. शिवाजी प्रिपरेटरी स्कूल पुणे येथे असलेले करमरकरांचे शिव शिल्प विशेष प्रसिद्ध झाले. रेवस किंवा मांडव्याहून अलिबागला जात असताना वाटेत सासवणे गाव लागते. अतिशय सुंदर समुद्र किनारा लाभलेल्या या गावात कोकणी घरात साकारले गेलेले हे संग्रहालय पाहायला जायलाच हवे. कोकणातील लोक आणि कला यांचे घट्ट नाते आहे. चित्रकला असो किंवा शिल्पकला इथल्या माणसाकडे त्यामधील प्रतिभा आहे. परंतु त्याला योग्य दिशा मिळेल, संधी मिळेल असा प्रयत्न शासनाकडून केला गेला पाहिजे. कलाशिक्षणाच्या बाबतीत कोकणात खूप काही केलं जाणे गरजेचे आहे.

2 comments

  1. पुरुषोत्तम

    इथे जाऊन ही माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद. पु. ल. देशपांडेंपासून अरूणा ढेरेंपर्यंत अनेकांच्या पुस्तकं, भाषणांमधे शिल्पकार करमरकर यांचा उल्लेख येतो. पण सामान्य जनतेला ते फार माहिती नव्हते. तुम्ही चांगलं काम करताय.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: