
कधी कधी आपण एखाद्या पुस्तकात काही ठिकाणांबद्दल वाचतो, आणि मग असं वाटत राहतं की आपण तिथं कधी जाऊ शकू? ती जागा पाहण्याचा अनुभव कसा असेल? जसं वर्णन आपण वाचलं आहे तशीच ती जागा असेल का? आणि ही उत्सुकता आपण तिथं प्रत्यक्ष जाऊन त्या जागेला अनुभवत नाही तोवर वाढत राहते. २००६-०७ च्या सुमारास मी मोटरसायकल वरून श्रीवर्धन-हरिहरेश्वर भ्रमंती करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी प्र के घाणेकरांच्या पुस्तकात मी प्रथम बाणकोट किल्ल्याबद्दल वाचले होते. त्याआधी मुरुडचा जंजिरा, अलिबागचा कुलाबा किल्ला असे किनारी किल्ले पाहिलेले होते पण या जागा तशा पर्यटन नकाशावर तेव्हा लोकप्रिय झालेल्या जागा होत्या. सावित्री नदीचे पश्चिमेला अथांग होत जाणारे पात्र. नदीच्या मुखाशी उत्तर किनाऱ्यावर हरिहरेश्वरचा डोंगर तर दक्षिणेला एका टेकडीवर असलेला बाणकोट किल्ला आणि किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारे दृश्य यांचे वर्णन वाचून मनात बाणकोट पाहण्याची ओढ निर्माण झाली हे नक्की. मानसी सोमण आणि अमृता सोमण या ब्लॉगच्या प्रायोजक आहेत.

जांभा दगडात केलेलं तटबंदीचे बांधकाम आणि मुख्य दाराला असलेली महिरपी नक्षी किल्ल्यावर पोहोचताच लक्ष वेधून घेते. बाणकोट किल्ला म्हणजे आजच्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांची सीमा रेषा. एकेकाळी ती सिद्दी आणि मराठ्यांच्या राज्यांमधील सीमा होती. संध्याकाळच्या वेळेला बाणकोटाचे बुरुज या पिवळ्या नारिंगी झळाळीने न्हाऊन निघालेले दिसतात.

आमच्या या दर्याफिरस्ती प्रकल्पामध्ये बाणकोट किल्ल्याचे स्थान अगदी खास आहे. कारण इथं फील्डवर्क करत असताना घडलेली एक घटना. रेवस ते तेरेखोल या संपूर्ण किनारपट्टीचे चित्रण करत असताना हे मधलेच एक ठिकाण राहून गेले होते. कारण ४ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी दिवस संपता संपता घडलेला एक प्रसंग. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. हरिहरेश्वर किनाऱ्यावर चित्रण झाले होते. मंदिराचेही व्यवस्थित शूट पूर्ण झाले होते. प्रदक्षिणा मार्गात असलेल्या खडकांवरही काही चांगली दृश्ये मला मिळाली होती. बागमांडला ते वेश्वी हे अंतर बोटीनं पार केलं तेव्हा सावित्री नदीचे पात्र शांत होते आणि आकाश सुद्धा निळं निरभ्र दिसत होतं. २०१८ च्या ट्रीपमध्ये मी बाणकोट किल्ल्याचे फोटो आणि व्हिडीओ घेतले होते त्यामुळे तिथं फक्त ड्रोनने काही व्हिडीओ घेणे बाकी होते. जेमतेम २० मिनिटांचे काम होते फक्त. मी किल्ल्याच्या पश्चिम बाजूला उतारावर उभा राहिलो आणि ड्रोन लाँच केले. सुमारे २५० फूट उंचीवरून मला काही चांगले फोटो मिळाले. किल्ल्यात पुरातत्व विभागाचं संवर्धन काम सुरु होतं (२०२० ला सुद्धा काम पूर्ण संपलेलं नाही) त्यामुळे आत बरंच सामान पडलेलं दिसलं. फोटो काही मनासारखे येत नव्हते म्हणून विचार केला की आता ड्रोन उतरवू आणि पुढच्या खेपेला हे काम पूर्ण करू. मी ड्रोन कडे पाहिलं तेव्हा ऊन असल्याने मला ते नीट दिसेना. ड्रोन ची दिशा कुठं रोखलेली आहे हे समजेना म्हणून स्क्रीनमध्ये पाहू लागलो. तेवढ्यात ड्रोनच्या इंजिनचा विचित्र आवाज आला आणि मी काही प्रतिक्रिया देणार तेवढ्यात ते मला कोसळताना दिसले. आणि पांढरे पोट असलेला समुद्र किनाऱ्यावरील गरुड मला तिथून झेपावताना दिसला. २५० फूट उंचीवरून सरळ कोसळल्याने ड्रोन क्रॅश होऊन कायमचेच नादुरुस्त झाले. हे महागडे साधन वापरण्याचा माझा हा फक्त तिसरा दिवस होता. ड्रोनचे तुकडे गोळा करून निराश होऊन मी गाडीत बसलो आणि डोंगर उतरून सावित्री नदीच्या मुखाशी सूर्यास्त पाहत एकटाच बसलो. बहुतेक परिसरात त्या गरुडाचे घरटे असावे. मार्च-एप्रिल हा या गरुडांचा विणीचा हंगाम असतो त्यामुळे कदाचित घरट्यात अंडी किंवा पिल्लेही असू शकतील आणि आक्रमक गरुडाने शिकार म्हणून किंवा संरक्षण म्हणून माझ्या ड्रोन वर हल्ला केला असेल. त्यानंतर मी एक आठवडाभर कोकणात शूट सुरूच ठेवले पण लगेच ड्रोन विकत घेणे शक्य नव्हते आणि तिसऱ्याच दिवशी हे घडलं त्यामुळे नैराश्य सुद्धा फारच आलं होतं. पण दर्या फिरस्तीला मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे पुन्हा ड्रोन घेणं शक्य झालं आणि हल्लीच मार्च २०२० ला बाणकोटचे शूटही निर्वेध पार पडले. आता पुन्हा एकदा इथं सकाळच्या वेळेला फोटोग्राफी करायला यायचे आहे हे नक्की.
हा किल्ला आकाराने छोटासाच आहे. गडफेरी अगदी पंधरा मिनिटांत पूर्ण होऊ शकते. याचा अर्थ किल्ला घाईने उरकावा असा मात्र नाही. किल्ले बांधणीतील अनेक बारकावे इथं आपण पाहू शकतो. दोन बुरुजांच्यामध्ये असलेल्या दारातून आपण आत आलो की डावीकडे तटावर चढून जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. उत्तरेच्या बाजूने बाणकोट, वेळास, हरिहरेश्वर, सावित्री नदीचे मुख, बांधणी सुरु असलेल्या नवीन पुलाचे खांब असा विस्तृत आसमंत नजरेत येतो. इथून समुद्राची अथांगता अनुभवायची असेल तर मात्र कितीही वेळ कमी पडेल.


किल्ल्यात शिरताना आपल्याला देवडी दिसते आणि उजवीकडील देवडीत हौद कसले असा प्रश्न पडतो. या ठिकाणाची पहिली ऐतिहासिक नोंद ही प्लिनी नामक ग्रीक लेखकाच्या ग्रंथात मंदगोरा किंवा मंदारगिरी या नावाने केलेली दिसते. काही तज्ज्ञांच्या मते प्लिनीने मंदगोरा म्हणून वर्णन केलेलं ठिकाण मंडणगड किंवा म्हाप्रळ येथील खाडीचा भाग असू शकते (संदर्भ – हिस्ट्री ऑफ कोकण – अलेक्झांडर कैद नरिन पृष्ठ क्रमांक २)

इथं मी २०१८ मध्ये अनुभवलेली एक खास गोष्ट म्हणजे वायर टेल्ड स्वैलो नावाच्या पक्षांचा प्रचंड मोठा थवा. किल्ल्याच्या दारासमोर विजेच्या तारांवर आपण संध्याकाळच्या चहाला जसे निवांतपणे बसतो तसे बसलेले हे शेकडो पक्षी पाहून मला मजाच वाटली. कारण एरवी हे इतके चंचलपणे उडत असतात की त्यांना कॅमेऱ्यात टिपणे अशक्य व्हावे.

किल्ल्याच्या पश्चिम तटावरून खाली किनाऱ्याच्या दिशेने पहिले की एक स्तंभ आणि एक त्रिकोणी बांधकाम दिसते. स्थानिकांना विचारलं तर त्यांना हे काय आहे हे नीटसं ठाऊक नसतं. राजा-राणी पॉईंट वगैरे काहीतरी मोघम उत्तर मिळते. तिथं उतरून जायला पायवाट दिसते. जवळ जाऊन पाहिलं की त्या त्रिकोणी स्मारकातून काढलेला एक श्रद्धांजलीपर कोरीव लेख आपल्याला दिसतो. ब्रिटिश रेसिडेंट चार्ल्स मॅलेटचा मुलगा आर्थर मॅलेट याची पत्नी सोफिया आणि मुलगी ऍलन हेरीयेट यांच्या स्मरणार्थ बांधलेलं हे स्थळ आहे. मुंबईहून महाबळेश्वरला जाताना तेव्हा मुंबई ते बाणकोट हा प्रवास समुद्रातून आणि नंतर सावित्री नदीच्या पात्रातून महाडच्या दिशेने जावे लागत होते. १८५५ साली आर्थर मॅलेट त्याची २५ वर्षांची पत्नी आणि ३२ दिवसांची मुलगी हा प्रवास करत होते. बाणकोट खाडीत या बोटीला जलसमाधी मिळाली आणि या दोघींसह १३ खलाशी सुद्धा मारले गेले. हे ठिकाणही आवर्जून पाहण्यासारखे आहे.

सावित्री नदीच्या दोन्ही तीरांना असलेली डोंगरांची मालिका डोळ्यांना निववणाऱ्या हिरवळीने भरलेली असते. कुठं या हिरवळीतून एखादं कौलारू घर, एखाद्या मंदिराचा कळस किंवा मशिदीचा मिनार डोकावताना दिसतो. नदीचे पात्र एखाद्या पैठणीचा रंग असावा तितक्या मोहक निळ्या रंगाचा साज ल्यायलेलं दिसतं. सकाळी किंवा संध्याकाळी मावळतीच्या वेळेआधी या पाण्यावर सोनेरी सूर्य किरणे जरीचा आभास निर्माण करतात.

महाबळेश्वर ला उगम पावणारी सावित्री नदी पोलादपूर पर्यंत सह्याद्रीच्या ओंजळीतून खळखळत येते आणि पुढं तिचं पात्र शांत विस्तीर्ण होत जातं. सुमारे १००-११० किलोमीटरचा प्रवास ही नदी करते आणि हरिहरेश्वराला नमन करत समुद्राला जाऊन मिळते. आंबेत पुलावरून जाताना हा प्रदेश पुन्हा एकदा पाहायला मिळाला. या नदीतून बोटीने हिंडणे जर शक्य असेल तर नदीतून एक वेगळं विश्व लोकांना अनुभवता येईल. बागमांडला ते वेश्वी या फेरीच्या प्रवासात याची झलक आपण जेमेतेम ५-१० मिनिटे पाहू शकतो.

नदीच्या मुखाशी वेळासच्या किनाऱ्याला सुरुवात होते. पूर्वी पुलाचे बांधकाम सुरु झालेले नव्हते तेव्हा हे ठिकाण जास्त मोकळे दिसत असे. समुद्राची भरती ओहोटी आणि नदीचे वाहत येणारे पाणी यांचा संवाद इतकी वेगवेगळी दृश्ये, रंग यांची अनुभूती देतो की इथं शांतपणे बसून राहावे असेच वाटत राहते. मला वाटतं रात्रीच्या वेळी अवकाशातील चमकत्या ग्रहताऱ्यांची फोटोग्राफी करण्यासाठी हे ठिकाण फारच उत्तम असेल. कधीतरी हा अनुभव घेण्यासाठीही इथं यायला हवं. इथं एक पाणकोट बुरुज आहे. अनेकदा लोक यालाच बाणकोट म्हणतात. हे बांधकाम सिद्दीने केलं अशी नोंद दस्तऐवज सांगतात. साधारणतः खाडीच्या किनारी असलेल्या जलदुर्गाच्या बाबतीत अगदी पाण्याला लागून असलेली तटबंदी अनेक ठिकाणी दिसते. जयगडला लांबलचक तटबंदी शास्त्री नदीच्या पात्राला लागून आहे. नाटेचा यशवंतगड, देवगड या किल्ल्यांना अशी तटबंदी आहे. इथला बुरुज मात्र टेकडीवरील किल्ल्याला जोडलेला नसून एक स्वतंत्र बंदोबस्ताची चौकी असावी असं दिसतं.

किल्ल्याच्या आत मारुतीचे स्थान आहे आणि उजवीकडे चोर दरवाजातून बाहेरच्या कोटात जाता येते. तिथं आता एक पडीक विहीर आहे. किल्ल्याच्या या भागातून तटबंदीच्या बाहेर एका छोट्याशा चोर दरवाजातून पडता येते.
चिनी प्रवासी ह्युएन-एत-त्संग इथं इसवीसन ६४० साली उतरल्याचे इतिहासकार सांगतात. १५४८ साली पोर्तुगीजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. पुढे कान्होजी आंग्रेंनी हा किल्ला जिंकला आणि त्याला हिम्मतगड असे नाव दिले. पुढील ५५ वर्षे किल्ला आंग्रेंच्या आरमाराकडे होता. १७५५ साली तुळाजी आंग्रे विरुद्ध पेशवे आणि इंग्लिशांनी उघडलेल्या आघाडीने कोमोडोर जेम्सच्या नेतृत्वाखाली हा किल्ला जिंकला व तो इंग्लिशांच्या ताब्यात आला व त्याचे फोर्ट व्हिक्टोरिया असे नामकरण झाले. किल्ल्याच्या दारातच आपण एक ब्रिटिश बनावटीची तोफही पाहू शकतो.

बाणकोट बंदर व्यापाराच्या दृष्टीने विकसित करण्याचा इंग्लिशांचा विचार होता पण ते जमून आले नाही आणि किल्ला पुन्हा मराठेशाहीत आला. १८२२ साली जिल्हा मुख्यालय रत्नागिरीला हलवण्यात आले आणि तिथं बांधलेली मामलतदाराची कचेरी १८३७ साली मंडणगडला पाठवले गेले. बाणकोटजवळ असलेले वेळास गाव ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे याबद्दलचा दर्याफिरस्ती ब्लॉग नक्की वाचा. वेळास हे नाना फडणवीस यांचे मूळ गाव. गावात रामेश्वर आणि कालभैरवाचे सुंदर मंदिर आहे. बाणकोटला हरिहरेश्वर जवळील बागमांडला हून फेरीने सावित्री नदी ओलांडून पोहोचता येते. माणगावहून आंबेत पूल मंडणगड मार्गेही बाणकोटला पोहोचणे शक्य आहे. बाणकोट मुंबईहून माणगाव-आंबेत मार्गे २२२ किमी अंतरावर आहे तर पुणे-ताम्हिणी-बाणकोट हे अंतर १९६ किमी आहे. मार्च महिन्यात कासव महोत्सवाला जोडून इथं येऊ शकता.
मानसी सोमण आणि अमृता सोमण या ब्लॉगच्या प्रायोजक आहेत.
Pingback: कासवांचे गाव वेळास | Darya Firasti