
खत प्रकल्पामुळे प्रसिद्ध असलेल्या थळ गावातील बंदरातूनच खांदेरी आणि उंदेरी किल्ले पाहण्यासाठी नाव मिळते. याच गावात खूबलढा नावाचा चार बुरुजांचा छोटासा किल्ला होता. आज या किल्ल्याचे बांधकाम कुठेही दिसत नाही. थळ बंदराकडे जाताना मात्र या किल्ल्याच्या बुरुजाचा पाया आणि इतर अवशेष आपल्याला दिसू शकतात. इथं परिसरात मासेमार बांधवांची लगबग सुरु असते. जाळी स्वच्छ करणे, त्यांची डागडुजी करणे, मासोळी वाळायला ठेवणे अशी कामे सुरु असतात.

बंदरात आलेले ताजे मासे इथं बैलगाडीवर लादण्यात येतात आणि मग पुढे ते बाजारपेठेपर्यंत गेले की मालवाहतूक करणाऱ्या वाहनात भरून मुंबई आणि इतर बाजारपेठांना पाठवले जातात. बंदरात आत गेलेल्या खाडीतून सकाळच्या वेळी होड्या बाहेर येताना पाहणे रोमांचक असते. कोळी बांधवांचे फोटो काढण्याची तुम्हाला इच्छा झाली तरीही परवानगी घेतल्याशिवाय कोणाचाही फोटो काढू नये. खांदेरी-उंदेरी किल्ल्यांचे सामरिक महत्त्व लक्षात घेता या किल्ल्यांना रसद पुरवण्याच्या दृष्टीने थळ गाव अतिशय महत्त्वाचे होते आणि त्यामुळेच या छोटेखानी किल्ल्यालाही महत्व प्राप्त झाले.
खूबलढा किल्ला जिंकण्यासाठी सिद्दी व मराठ्यांच्यामध्ये अनेकदा तुंबळ लढाया झाल्या. १७४९ मध्ये हा किल्ला सिद्दीने जिंकला तर पुढच्या वर्षी मानाजी आंग्रे यांनी जोर करून पुन्हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आणला. या लढाईत मानाजींना गोळी लागली आणि सिद्दीची २०० माणसे मारली जाऊन किल्ल्यावर भगवे निशाण फडकले असे राणोजी बलकवडेंच्या पत्रातून लक्षात येते. खांदेरी मोहीम आखून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या बेटावर किल्ला उभारण्याचे ठरवले तेव्हा खुबलढ्याने रसद पुरवण्याच्या बाबतीत महत्त्वाची कामगिरी बजावली.
छान
Reblogged this on गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही.
Kanakdurg chi suddha hich awastha😭