Darya Firasti

राजापूर ची वखार

राजापूर हे कोकणातील अनेक ऐतिहासिक बंदरांपैकी एक.. टॉलेमीच्या ग्रंथात त्याला Turannosboas असे नाव दिलेले आढळते.. मंडेल्सलो नामक लेखकाने इसवीसन १६३८ मध्ये याचा उल्लेख सर्वोत्कृष्ट दर्यावर्दी नगर असा केला आहे. कॉर्टेन्स असोसिएशन आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे इथं व्यापार सुरु झाला. इंग्लिशांना मिरी-वेलदोड्याचा व्यवसाय करण्यासाठी डचांपासून संरक्षण असलेले हे बंदर उपयुक्त वाटले. नदीच्या दोन्ही बाजूला असलेली जांभा दगडाची शिखरे आणि वादळ वारा असेल तेव्हा जहाजांना आश्रय घेण्यासाठी मुबलक उपलब्ध असलेल्या छोट्या खाड्या असे या बंदराचे वर्णन रत्नागिरी गॅझेटमध्ये आहे, त्यापैकी तुळसुंदेची खाडी जास्त उपयुक्त आहे असा उल्लेख आढळतो. आज मात्र आतवर जहाजे नेता येत नाहीत. राजापूर शहरापासून तीन मैलांवर जहाजे थांबतात असे विसाव्या शतकातील नोंद सांगते. राजापूर हून जैतापूरला जाणारी नदी म्हणजे अर्जुना नदी.. नाटेचा यशवंतगड याच नदीकाठी आहे.. पूर्वी मोठी जहाजे माल जैतापूरला उतरवत असत.. काहीजण अर्जुना नदीला राजापूर नदी म्हणतात तर काही जैतापूर नदीही म्हणतात. फ्रेंच, डच आणि इंग्लिश वखारींनी इथला व्यापारउदीम समृद्ध केला.. त्यापैकी इंग्लिशांची वखार अधिक गजबजलेली होती. अरबांशी इथून थेट व्यापार होत असे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील राजापूर, लाल समुद्रातील मोखा आणि पर्शियन आखातातील बसरा येथील वखारी सूरत डिव्हिजनच्या अधिपत्याखाली देण्यात आल्या

ब्रिटिश वखारीच्या जागी शाळा आणि मग सरकारी कार्यालये केली गेली. आजही नदीकाठी ही वास्तू पाहता येते. इथली डच वखार इंग्लिशांनी १६९९ ला घेतली आणि १७०७ पर्यंत चालवली. इथून आफ्रिकेतील झांझिबारशी व्यापार होत असे.. गूळ, नारळ, सुपाऱ्या, सूती कापड, तंबाखू, हळद, मिरची, तेल, तूप, आंबे ही इथली मुख्य उत्पादने होती. १७१०-२० मध्ये इथं उत्कृष्ट दर्जाचे मस्लिन चे कापड मिळत असे हॅमिल्टन सांगतो. मुंबई आणि घाट या दोन्ही प्रांतांशी तसेच चिपळूणशी राजापूर चा व्यापारी संपर्क होता. ऑक्टोबर ते मे या काळात इथली व्यापारी पेठ गजबजत असे.

डोंगरांच्या कुशीत असलेल्या या नगरातील अरुंद रस्ते, पुरातन घरे इथलं जुनेपण जपून आहेत. नदीच्या काठाजवळ असलेल्या टेकाडावर वसलेली इंग्लिश वखार आज अवशेषरूपात पाहता येते. इथला खंदक जवळपास बुजलेला असून काही तोफा आणि २ दगडी बुरुज आजही दिसतात. वखारीत एक चौकोनी विहीर सुद्धा आहे. आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या या ठिकाणी १६४८ ते १७०७-०८ या काळात ही वखार वापरात होती. कॅप्टन हॅमिल्टन नामक अधिकारी इथं फॅक्टर होता.. त्याचा पुतण्या सर जॉन चाईल्ड ने काकाचा भ्रष्टाचार उघडकीस आणला आणि वयाच्या फक्त चोविसाव्या वर्षी फॅक्टरचे पद मिळवले. इंग्लिशांनी पुढील दहा बारा वर्षात इथं चांगलाच जम बसवला.

अफझल खान प्रकरणानंतर दोरोजीने इथं हल्ला केला होता.. तेव्हा रुस्तमेजमान ब्रिटिश एजंटचे जंक प्रकारचे जहाज घेऊन पलायन करू शकला.. चिडलेल्या मराठ्यांनी बाघजी आणि बालाजी या एजंटांना पकडले आणि गिफर्ड नामक इंग्लिश अधिकाऱ्यालाही जेरबंद करून नंतर (बहुतेक खंडणी मिळाल्यावर) सोडले. तेव्हा हेन्री रिव्हिन्गटन ने शिवरायांना लिहिलेल्या १३ फेब्रुवारी १६६० च्या पत्रात त्यांचा जनरल ऑफ द हिंदू फोर्सेस असा उल्लेख केलेला दिसतो… सुरत कौन्सिलने त्यांच्या निर्देशक बोर्डाला ४ एप्रिल १६६० रोजी पाठवलेल्या पत्रातही शिवरायांचा उल्लेख दक्षिणेतील आदिलशहाच्या विरोधात उभा ठाकलेला ताकदवान हिंदू योद्धा असा उल्लेख करतात…. पुढे हेन्री रिव्हिन्गटन यानेच सलाबत जंग सिद्दी जौहर ला पन्हाळ्याच्या वेढ्यात इंग्लिश निशाण फडकवून तोफा, ग्रेनेड इत्यादी पुरवले व मनुष्यबळही दिले. ४ एप्रिल १६६० ला गिफर्ड, वेलजी अणुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरला गेले.. सोबत त्यांनी राजापूरला असलेला कंपनीचा तोपची विल्यम मिंघमला घेतले होते. एक मॉर्टर तोफ आणि ५० ग्रेनेड घेऊन सिद्दीला एक डेमो देण्यात आला. अली नाम्यात फिरंग्यांनी आदिलशाहीच्या वतीने पन्हाळा किल्ल्यावर भडीमार केला अशी नोंद आहे. सिद्दी जौहरने हे सामान विकत घेण्याची तयारी दर्शवल्यानंतर इंग्लिशांची संख्या वाढत गेली.. मे महिन्यात रिचर्ड टेलर आणि रोलँड गारवे तर जून महिन्यात रिचर्ड नेपियर पन्हाळ्याला गेलेला दिसतो. ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोल्हापूर ते पन्हाळा भागात यांचे येणे जाणे सतत सुरु होते.

नंतर शिवरायांनी राजापूरच्या वखारीवर हल्ला चढवून इंग्लिशांना शासन केले (मार्च १६६१) रिव्हिन्गटन, रॅन्डल्फ आणि रिचर्ड टेलर बंधू व गिफर्ड आधी वासोटा आणि नंतर सोनगडाच्या कैदेत खितपत पडले. अटकेत पडलेल्या मंडळींमध्ये रॉबर्ट वॉर्ड नावाचा एक सर्जनही होता. नंतर हे प्रकरण स्थानिक इंग्लिशांनी परवानगी शिवाय केले असे सांगून इंग्लिशांनी नुकसानभरपाई मागण्याचा प्रयत्नही केला. शिवरायांनी त्यांना या प्रकरणात बरेच झुलवत ठेवले असे इतिहासकार सांगतात. गजानन भास्कर मेहेंदळेंच्या शिवचरित्रात ही पूर्ण हकीकत ससंदर्भ वाचता येईल…. उंबरखिंडीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी फेब्रुवारी ते एप्रिल १६६१ मध्ये तळकोकणात मोहीम काढली.. डच पत्राप्रमाणे एक हजार घोडदळ आणि ३ हजार पायदळाच्या मदतीने राजापूर काबीज झाले. चिपळूण, संगमेश्वर, पालवणी, राजापूर अशी ठिकाणे जिंकत महाराजांचे सैन्य दक्षिण कोकणात पसरले. राजापूरची वखार खणून काढली गेली. ७ इंग्लिशांना अटक झाली.. इराणी, अरब व्यापाऱ्यांनाही खंडणीसाठी पकडले गेले. इथून २३ ते २४ हजार होनांची संपत्ती महाराजांना प्राप्त झाली आणि इंग्लिशांना मराठ्यांनी राजकीय शत्रूला लष्करी मदत पुरवल्याबद्दल अद्दलही घडवली. शिवभारत सांगते की यावेळी छत्रपती शिवरायांचे दंडा-राजपुरी ते खारेपाटण नियंत्रण निर्माण झाले.

१६६८ च्या आसपास शिवरायांनी इथं अजून एक हल्ला केला आणि नंतर फ्रेंचांना जागा दिली असे दिसते. १६७४ मध्ये ओरिएंट सन नावाचे फ्रेंच जहाज राजापूरला आले आणि तिथं शिवरायांनी ८८ तोफा आणि २००० माउंड (वजनाचे परिमाण) म्हणजे साधारण८ टन शिसे घेतले. पुढं इंग्लिशांनी सप्टेंबर १६७९ मध्ये राजापूर वखार बंद करण्याचा निर्णय घेतला आणि १६८० मध्ये वखार बंद केली गेली.. नुकसान भरपाई मिळेल या आशेत १६८० चे वर्ष गेले.. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्लिश लोक जंजिऱ्याच्या सिद्दीला आश्रय देतात म्हणून कोणतीही रक्कम देण्यास नकार दिला. औरंगजेबाचा लाडका राजपुत्र मुहम्मद अकबर जो बंडखोर होऊन छत्रपती संभाजीराजेंना मिळाला होता तो विशेष काही करू शकला नाही आणि नंतर १६८६ मध्ये त्याला राजापूर येथे इंग्लिश कप्तान असलेले एक जहाज मिळाले ज्याने तो १६८९ मध्ये इराणला गेला. १७०२ साली इंग्लिश वखार परत सुरु झाली आणि १७१० च्या सुमारास पुन्हा बंद पडली, नंतर कान्होजी आंग्रेनी १७१३ ला राजापूर वर नियंत्रण प्रस्थापित केले. १८१९ च्या नोंदीप्रमाणे राजापूर हे एक सुबत्ता असलेले नगर होते असे दिसते.. नदीची उपयुक्तता आता कमी झाल्याने छोट्या होड्यांवर जहाजांतील सामान लादून बंदरात आणणे स्वस्त पडत असे. १८३४ च्या आसपास दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकला मुंबईशी जोडणारा व्यापार इथून होत असे. राजापूरहून लोखंड, खजूर, सुकामेवा निर्यात होत होते तर कापड, मिरी, लोणी आयात. कॅप्टन किड नामक प्रसिद्ध इंग्लिश चाचाही राजापूर बंदराच्या आश्रयाला आला होता आणि मुंबईचे एक ब्रिटिश जहाज त्याने लुटले अशी गॅझेटमध्ये नोंद सापडते.

राजापूर शहरात धूतपापेश्वराचे अतिशय सुंदर देवस्थान आहे.. काही मुस्लिम बांधकामेही आहेत आणि दोन ऐतिहासिक पूल आहेत. त्यापैकी वखारीजवळ असलेला पूल म्हणजे साडेतीनशे वर्षे जुना शिवकालीन पूल. दुसरा पूल हा अर्जुना नदीवरील मोठा पूल आहे. स्पॅन ड्रिल आर्चेस ची रचना असलेला हा पूल स्थापत्यशास्त्रीय दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. १९३५ साली बांधकाम सुरु झालेला हा पूल १९४० साली पूर्ण झाला. आता त्याला समांतर असा चौपदरी पूल झाल्याने गोवा महामार्गावरील वाहतूक जलद झाली आहे. या परिसरात राजापूरच्या गंगेचे दर्शन घ्यायला आपण नक्की कधीतरी येऊच.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: