
आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरता आरमार अवश्यमेव करावे – या शब्दांत छत्रपती शिवरायांनी आरमाराचा संकल्प मांडला. सरखेल कान्होजी आंग्रेंच्या काळात मराठा आरमाराचा दरारा पश्चिम किनाऱ्यावर निर्माण झाला. खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग अशी जलदुर्गांची मालिका उभारून शिवरायांनी आरमाराची ताकद वाढवली. नदीच्या मुखावर जयगड, गोपाळगड, पूर्णगड, यशवंतगड असे किल्ले बांधले गेले आणि खाडीतून होणाऱ्या व्यापारी किंवा सामरिक हालचालींवर वचक बसला. छोट्या गलबतांच्या चपळाईने युरोपियन सागरी सत्तांना आव्हान देणाऱ्या मराठा आरमारात गुराब, पाल, शिबाड अशी मोठी जहाजे बांधली जाऊ लागली. इतकी मोठी जहाजे बांधायची तर त्यांची देखभाल करण्यासाठी व्यवस्था हवी. कोरडी गोदी हवी. सिंधुदुर्गाजवळ, कुलाबा किल्ल्याजवळ अशी गोदी असल्याचे तुरळक उल्लेख सापडतात. पण विजयदुर्ग किल्ल्याजवळ गिर्ये येथे वाघोटन नदीच्या आतल्या बाजूला अशा गोदीचे अवशेष आजही पाहता येतात. भरती-ओहोटीचा काळ इथं थांबलं तर या गोदीची रचना कशी होती, कार्यपद्धती कशी होती हे सहज लक्षात येते.

विजयदुर्ग किल्ल्यापासून साधारण दोन अडीच किलोमीटर अंतरावर गिर्ये गावाच्या खाडीकडील टोकाला ही गोदी आहे. खूण म्हणजे आंबा खरेदी विक्री केंद्राजवळून वाघोटन खाडीकडे उतरणारा रस्ता. गुगल मॅप वर Rameshwar Dockyard असे शोधले तर हे ठिकाण सहज सापडेल. गावात पोहोचले की १०० मीटर चालत जावे लागते.

गोदी साधारणतः ३५० मीटर लांब आणि २२५ मीटर रुंद आहे. जांभा दगडात इथं संरक्षक भिंत बांधून पाण्याच्या प्रवाहाला दिशा दिलेली आहे. भरती असताना जहाज आत आणायचे आणि ओहोटी लागली की दगड लावून पाणी अडवायचे. पाण्याची पातळी कमी झाली की जहाजाचा तळ उघडा पडतो आणि रंगरंगोटी किंवा इतर काही देखभाल करायची असेल ते करणे शक्य होते अशी ही रचना.

आंग्रेकालीन गोदीची क्षमता ३५० टन जहाजांची होती आणि पुढे सरदार आनंदराव धुळपांच्या कारकीर्दीत ही क्षमता वाढवून ५०० टन करण्यात आली असे इतिहासकार मानतात.

ही गोदी ३६९ कामगारांनी बांधली. समशेरजंग, फत्तेजंग अशा पालांची बांधणी या गोदीत झाली असं भगवान चिले सांगतात. तिथंच उत्खनन करताना एक प्रचंड मोठा नांगर सापडला जो आता नौदल संग्रहालयात आहे. इथं आजही प्रचंड मोठे दगडी नांगर पाहता येतात.

चौदाव्या ते सतराव्या शतकात चीनमध्ये शासक असलेल्या मिंग राजघराण्याच्या काळातील काही पोर्सेलीन भांड्यांचे अवशेषही इथं सापडले आहेत; हे सगळे उत्खनन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या संशोधकांनी केले आहे. कमांडर अजित गुपचुप यांनी डायव्हिंग करून विजयदुर्गाजवळची सागरी भिंतही शोधली.
संदर्भ –
१) रिसर्च पेपर – शील त्रिपाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी
२) कमांडर अजित गुपचूप
३) भगवान चिले
४) प्रा. प्र. के. घाणेकर
५) द. रा. केतकर