पोहता न येणारा, पाण्याची प्रचंड भीती असणारा मी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवती किनाऱ्यापासून पाण्यात जवळपास 10 किमी दूर असलेलं एक गूढ रम्य ठिकाण. या ठिकाणाबद्दल मी प्रथम वाचलं ते दहा बारा वर्षांपूर्वी पराग पिंपळेंनी प्रकाशित केलेल्या साद सागराची पुस्तकात. पक्षांचे आश्रय स्थान असलेलं बर्न्ट रॉक्स बेट आणि तिथं दोन बेटांवर असलेली पोर्तुगीज कालीन आणि इंग्लिश कालीन दीपगृहे. कोकण किनारपट्टी झोडपून काढणाऱ्या मान्सूनमध्येही इथं राहून दीपगृह सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आठवणी आणि गहिऱ्या निळ्या पाण्यात पाय रोवून उभा हा द्वीपसमूह.

आमच्या भेटीचा योग यायला एक दशक जावे लागले. हाडाच्या भटक्या मंडळींना अशा ठिकाणांचं एक गूढ आकर्षण असतंच. एप्रिल 2022 मध्ये मी रेवस ते तेरेखोल भ्रमंती केली तेव्हा एक दिवस या प्रवासासाठीच राखून ठेवला होता. जलपर्यटनाचा हंगाम संपत आलेला असल्याने स्कुबा डायव्हिंग ला निवती बंदरातून जाणाऱ्या मंडळींची विशेष गर्दी नव्हती. मला कोणीतरी प्रशिक्षित आणि सुरक्षेच्या बाबतीत काटेकोर असलेला नावाडी हवा होता. कुडाळच्या सारंग साहेबांनी उमेश भगत शी ओळख करून दिली आणि त्याच्या बोटीने ही वारी करून यायचे मी निश्चित केले.

या बेटांचा उल्लेख अनेक इतिहासकारांनी केला आहे.. मग टॉलेमी असो.. पेरिप्लस असो.. व्हिन्सेंट चा कॉमर्स ऑफ थे एनशियंट असो.. या बेटांचे वर्णन सापडते.. बर्न्ट आयलंड असा उल्लेख आपल्याला सापडतो.. कदाचित इथं पाणी नाही आणि झाडी नाही म्हणूनही असेल. 1540 साली डोम जोआओ कॅस्ट्रो ने Ilheos Queimados या नावाने हे ठिकाण दाखवले आहे.

अनेक बेटांचा हा समूह असून त्यातील 10 बेटे मोठी आहेत पण ही अगदी बोडकी ठिकाणे आहेत .. इथं वृक्ष हिरवळ काहीही नाही.. गोडे पाणी नाही.. मालवणी लोकांचे इथं नियंत्रण आहे असे वर्णन कॅस्ट्रो ने केले आहे. वेंगुर्ल्याच्या वायव्य दिशेला समुद्रात 9 मैल किंवा 15 किमी अंतरावर ही बेटे आहेत. बेटांच्या या समूहाचा पूर्व-पश्चिम विस्तार 2 किमी तर उत्तर-दक्षिण विस्तार 5 किमी आहे. खडकांची जडणघडण क्वार्ट्झ आणि मायका ने झाली आहे असा कयास अभ्यासक मांडतात. या बेटावरील सर्वात उंच ठिकाण फूट उंच आहे अशी नोंद गॅझेटमध्ये सापडते.. हे ठिकाण म्हणजे नवीन द्वीपगृह असलेले बेट असा माझा अंदाज आहे.

12 एप्रिल 2022 .. सकाळी ओहोटीची वेळ पाहून जाऊ असं मला उमेश भगतने सांगितलं होतं. मी निवती बंदरात पोहोचलो तेव्हा सकाळची लगबग सुरु होती.. ताजे मासे इथून बाजारपेठेत न्यायला गाड्या आल्या होत्या.. मी आणि उमेश सकाळी नऊ च्या सुमारास निघालो असू. आज समुद्र अगदी शांत होता.. पूर्व दिशेला डोंगरांच्या वर आता सूर्यनारायण आला होता आणि टेकड्यांचे माथे सोनसळी उन्हात न्हाले होते. पश्चिम क्षितिजावर गहिऱ्या सागराचा विस्तीर्ण पसारा आणि त्या शांत वातावरणात कर्कश वाटणारा आमच्या बोटीच्या इंजिनाचा आवाज

तापमापक 28 डिग्री सेल्शियस दाखवत होता.. पण बहुतेक थंड वाऱ्यामुळे उकाडा जाणवत नव्हता. माझ्याजवळ असलेल्या जीपीएस वर एकूण 10 किमी अंतर दिसत होते आणि 50-51 मिनिटांत आम्ही हा प्रवास पूर्ण केला. आमची बोट या द्वीपसमूहाजवळ पोहोचली तेव्हा सगळ्यात आधी मला दिसलं इथलं बर्ड आयलंड. इथल्या गुहांमध्ये पाकोळ्यांनी बांधलेली घरटी चोरून त्यांची तस्करी करण्याचे प्रकार झाले होते आणि यात अगदी केरळपासून इथं आलेले तस्कर पकडले गेले होते. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून इथं संवर्धनाचे बरेच काम झाले आहे.

या पक्षांचे इंग्लिश नाव इंडियन स्विफ्टलेट आहे. हे पक्षी आपल्या लाळेने घरटी बांधतात ज्यांना बाजारात मागणी असते. इथल्या बांद्रा रॉक्स नावाच्या गुहेत अनेक घरटी होती. मॅडसन आणि हुमायून अब्दुल अली वगैरेंनी फील्डवर्क केले आहे. एप्रिल 2001 ला ही घरटी पळवण्यासाठी बांधलेल्या पराती पकडल्या गेल्या आणि तस्करांना वन विभागाने अटक केली.

नवीन दीपगृह हे या बेटांपैकी सगळ्यात उंच टेकाडावर आहे. याची स्थापना 1930 च्या आसपास झाली. दर वीस सेकंदांनी दोन पांढरे फ्लॅश असे या दीपगृहाचे टायमिंग आहे आणि लाल पांढऱ्या पट्ट्यांनी ते रंगवले आहे. 100 वॉटचे दिवे इथं वापरतात आणि ऊर्जा सोलर व बॅटरीद्वारे पुरवली जाते. इथं जनरेटरची सुद्धा सोय आहे. बेटावर दीपगृह कर्मचाऱ्यांची राहण्याची सोयही आहे.

20 मीटर उंच हे लोखंडी दीपगृह 1931 साली जॉन ऑस्वाल्डने सुरु केले. याची निर्मिती फ्रांस येथील बार्बीए बर्नार्ड ए तुरें येथे झाली. याआधी इथं पश्चिमेकडील बेटावर बांधलेले 1870 सालचे दीपगृह वापरात होते. इथं वेळेत दिवे न पोहोचल्याने आगीचा जाळ करून बोटींना इशारा देण्याची व्यवस्था होती. आता मात्र हे जुने दीपगृह समुद्रात एकाकी पडले आहे असे वाटते.

पण धक्कादायक गोष्ट अशी की इथं पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे कारण मध्यंतरी जुन्या दीपगृहाच्या बेटावर काही दारुड्या लोकांनी जाऊन धिंगाणा घातला आणि मग पोलीस बोलवून त्यांना तिथून काढावे लागले. आता सागरी पोलीस इथं गस्त घालतात. दुर्दैवाने असल्या बेजबाबदार आणि बेमुर्वतखोर लोकांच्या वागण्याने सामान्य आणि नियम पाळणाऱ्या पर्यटकांनाही सरसकट बंधने पाळावी लागतात.

परत येताना भरती सुरु झाली होती… भरतीच्या लाटांवर स्वर होऊनच आम्ही निवती बंदराकडे निघालो होतो.. अजूनही समुद्र तसा शांतच होता… रात्री मासेमारी करून परतलेल्या आणि नांगरून ठेवलेल्या बोटी दिसल्या. उमेश भगतने (+91 94212 38735) लाईफ जॅकेट ची सोय केली होती आणि बोटही खूप नीट नेली त्यामुळे पुढच्या वेळी त्याच्या टीम बरोबर स्कुबा डायव्हिंग ची हिम्मत करून मी जाईन हे नक्की. पॅडी सारख्या नामवंत संस्थेचे प्रशिक्षण घेतलेली मंडळी इथं आहेत त्यामुळे सुरक्षिततेची चिंता नाही. मी तिथं गेलो त्यानंतर काही दिवसांनी तारकर्लीला अपघात झाला आणि कोकणला बदनाम करणाऱ्या पोस्टचे पेव फुटले होते. त्याबद्दल माझी भूमिका पुढीलप्रमाणे –
तारकर्लीच्या घटनेची मला स्थानिक स्कुबा डायव्हिंग ऑपरेटर कडून मिळालेली माहिती अशी –
मे महिन्यात 15 तारखेनंतर वॉटर स्पोर्ट्स करणे धोकादायक आहे पण तरीही अनेक ठिकाणी हे प्रकार सुरूच राहतात. सदर घटनेत बोट किनाऱ्याला लावत असताना लाटांच्या जोराने उलटली आणि कदाचित बुडण्यापेक्षा चिरडण्याच्या प्रक्रियेने जीवितहानी झाली असावी. याला जबाबदार कोण?
1. निसर्गाच्या ताकदीचा आदर न करता अयोग्य वेळी अशा सेवा देणारे लोक
2. त्यांच्यावर अपेक्षित अंकुश न ठेवणारा अधिकारी वर्ग
3. विनाप्रशिक्षण आणि विना परवाना या क्षेत्रात घुसलेले आणि पर्यटकांची जबाबदारी घेणारे लोक
4. रस्त्यात शेंगदाणे विकत घ्यावे त्याप्रमाणे जो कोणी स्कुबा डायव्हिंग, बोटिंग ला या म्हणेल त्याच्या मागे कोणतीही चौकशी न करता जाणारे पर्यटक, जे अनेकदा बोटमध्ये चालणे सेल्फी साठी वाकणे, हुल्लडबाजी करणे असले प्रकार करून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत असतात
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुरक्षितता आणि जीवाला किंमत या बाबतीत आपल्या समाजात मुरलेली बेदरकार बेफिकीर भावना. इथं हेल्मेटसक्ती कशी चूक यावर 756 कारणे देतील, कार्पेन्टर/ कडीया कधी मास्क किंवा कानांचे संरक्षण करायला इयर मफ वापरणार नाहीत, पॅरासिलिंग चे दोरखंड दरवर्षी बदलणार नाहीत, जिथं तांत्रिक प्रस्तरारोहण करावे लागते तिथं अननुभवी लोकांना अपुरी साधने घेऊन नेणे, हायवेवर रस्त्याच्या उलट बाजूने भरधाव ट्रक नेणे असल्या गोष्टी क्षुल्लकपणे केल्या जातात.. एकदा रेल्वे पोलिसाने जीवावर उदार होऊन कोणाला वाचवल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आणि मग तसेच व्हिडीओ पुन्हा पुन्हा व्हायरल होतात.. कुठं सेल्फी घेता घेता नदीत बुडून कुटुंब संपते!
बेशिस्त बेफिकीर वागणे म्हणजे adventure नव्हे हे आपल्याला कधी समजणार कुणास ठाऊक