दाभोळ एक प्राचीन शहर.. एक ऐतिहासिक व्यापारी पेठ.. या परिसराचे वर्णन गो. नी. दांडेकरांनी खूप सुंदर केले आहे. अण्णांच्या घरावरून पुढं निघावं तर जांभ्या दगडांनी बांधून काढलेली उभी पाखाडी लागते. तिने डोंगर चढून जावं म्हणजे आपण दाल्भ्येश्वराच्या मंदिराजवळ पोहोचतो.. किती प्राचीन आहे हे मंदिर? कुणास कळे! पण हे ग्रामदैवत म्हणजे गाव रचलं जाण्याच्या पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. इथं दर्शनासाठी स्वतः शिवाजी राजे येऊन गेल्याची नोंद आहे. इतकं पवित्र हे ठिकाण आहे..

गोनीदांनी वर्णन केलेली जांभा दगडाची पाखाडी तशीच आहे फक्त आता आमराईतून मंदिराजवळ जाणारा डांबरी रस्ताही तिथं झाला आहे. दालभ्य ऋषींचे हे स्थान म्हणून दाभोळ असे नाव या नगराला पडले असे मानले जाते. ११व्या शतकात हे शहर जैन राजाच्या अधिपत्याखाली होते अशी नोंद गॅझेटमध्ये दिसते. इसवीसन १६५७-५८ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी सावित्री नदीच्या उत्तरेकडील कोकण प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. पुढं फेब्रुवारी ते एप्रिल १६६१ या काळात त्यांनी उंबरखिंडीत कारतलबखानाला नमवल्यानंतर दक्षिण कोकणाकडे मोर्चा वळवला. नेतोजी पालकरांकडे उत्तर कोकणची व्यवस्था लावून दिली आणि मग शिवभारत सांगते त्याप्रमाणे १५ हजारांची फौज घेऊन दाभोळ, चिपळूण, संगमेश्वर, पालवणी जिंकले. दाभोळच्या संरक्षणासाठी २००० फौज तैनात केली आणि मंडणगडला ठाणे उभे केले. प्रभावळीच्या जसवंतराव सुर्वेला नामोहरम केले. औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना १६५७ साली लिहिलेल्या पात्रात आदिलशाही दाभोळ जिंकून त्यावर शासन प्रस्थापित करण्याची मुभा दिलेले दिसते. पुढं राघो बल्लाळ नामक सरदार शिवरायांनी दाभोळला नेमला होता असा खुलासा पोर्तुगीज कागदपत्रांतून होतो. १६६१ च्याच आसपास छत्रपती शिवराय इथं दर्शनाला आले असावेत.

अण्णा शिरगावकरांच्या पुस्तकात या मंदिराबद्दल एक फारच रंजक आणि माहितीपर साधनाचा उल्लेख आहे. हा कागद पेशवा माधवरावाच्या काळातील असावा. त्यात उल्लेख आहे की इथल्या धामधूमीत पडझड झालेली वस्ती आणि स्वयंभू देवस्थान श्री शिवस्पर्शाने पावन दाल्भ्येश्वर मंदिर आणि नगर या दोहोंचा जीर्णोद्धार केला जावा. हा अर्ज रामजी हरी बिवलकराने १७६४ साली माधवराव पेशव्याकडे केला. त्यानंतर दाभोळ पुन्हा वसवण्याचा प्रयत्न केला गेला. रामजी हरी बिवलकराचा भाऊ केसो हरी बिवलकराने १७८२ साली मंदिराचा जीर्णोद्धार केला असे दिसते.
टाळदेव आणि | तारकेश्वर तो | कार्तिक सोमेश | सप्तेश्वर |३२||
कुटकेश्वर जो | सागराच्या तीरी | कर्णेश आणिक | क-हाटेश ||३३||
सप्तकोटीश्वर | कोटीतीर्थ तसे | पाताळी जो स्थित | हृदकेश |३४||
दाभोळ नगरा | दाल्भ्येश्वर स्थित | शुक्लतीर्थी भैरव | हरिहर ||३५||
परिसरातील देवस्थानांचे वर्णन व्याडेश्वर माहात्म्य ग्रंथात आहे. त्याचे अभंग रूप पुण्याचे डॉक्टर गिरीश मोडक यांनी केले आहे. त्यातील दाभोळच्या शिवालयाचा उल्लेख मला विशेष भावला. इथं जवळच चंडिका देवीचे गूढ रम्य मंदिर आहे. त्याची गोष्ट लवकरच दर्या फिरस्तीच्या ब्लॉगमध्ये घेऊन येईन.