रायगड रत्नागिरी सीमेवर असलेली सावित्री नदी ओलांडून आपण बाणकोट वेळास येथे रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यात दाखल होतो. वेळास ओलांडून साखरी ची टेकडी उतरलो की भारजा नदीचे मुख दिसायला लागते. आणि माडाच्या बागांमध्ये लपलेलं एक प्रसन्न आणि टुमदार गाव नदीच्या पलीकडून आपल्याला खुणावत असते… हे गाव म्हणजे केळशी.. कदाचित ओहोटीच्या वेळेला पायी पलीकडे जाताही येत असेल किंवा स्थानिक मंडळी तरीतून जात असतील.. आपल्याला मात्र भारजा नदीच्या पात्राला लागून आधी पूर्वेकडे आणि मग मांदिवली ला भारजा नदीचा पूल ओलांडून असं एकंदर 17-18 किमी जायचं आहे.. इथं बांधला जाणारा पूल केळशीतील सुनामी टेकडी नष्ट करेल म्हणून वादग्रस्त झाला आणि कोर्टकचेरी ची प्रक्रिया पार पडून आता त्याची नवीन आराखणी निश्चित झाली आहे असे समजले.


केळशीला पोहोचल्यानंतर माझे आवडते मुक्कामाचे ठिकाण म्हणजे कोझी कॉटेज. दीपक विचारे साहेबांचं आणि संतोष महाजनांनी चालवलेलं कोझी कॉटेज म्हणजे एक प्रसन्न ठिकाण. शिवाय तिथं माझी वीजेवर चालणारी गाडी चार्ज करण्याची सोय आहे त्यामुळे माझी आणि गाडीची दोघांची पोटपूजा व्यवस्थित पार पडते आणि आम्ही दोघे पुढच्या प्रवासाला सिद्ध होतो. तिथे बाजूलाच केळशीतील एक उत्साही व्यक्तिमत्व वैभव वर्तक राहतात.. फोटोग्राफी आणि सैन्यातील शस्त्रसामग्री दोन्हींची प्रचंड आवड असलेला हा माणूस.. त्यांचं कौलारू घर म्हणजे चित्रात रेखावं तसं रुबाबदार आहे.. समोर महाजनांच्या घरी जाऊन शाकाहारी जेवण आणि मोदकांचा बेत केला की मुंबई ते केळशी या ७-८ तासांच्या प्रवासाचा शीण नाहीसा होतो.



भाजी पोळी भात आमटी आणि गरमागरम तूपासह मोदक असं मस्त भोजन करून मस्त ताणून द्यायची आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी explore करायला निघायचं हा इथला माझा शिरस्ता. कोणाच्या अध्यात न मध्यात असलेलं हे गाव आता पर्यटकांच्या यादीत प्रसिद्ध झालेलं आहे.. नाहीतर पूर्वी गावातील मंदिरांमध्ये चालणारे उत्सव सोडले तर वर्दळ कमीच होत असे. जर सावित्री आणि भारजा नदीवरील पूल पूर्ण झाले तर दिवेआगर-श्रीवर्धन-हरिहरेश्वर ला येणाऱ्या पर्यटकांना केळशी गाठणे सोपे होऊ शकेल. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटमधील माहितीप्रमाणे इथं फारशा ऐतिहासिक घटना घडलेल्या नाहीत.. डॉम जोआओ कॅस्ट्रो च्या १५३८ च्या नोंदीप्रमाणे हे मशिदींचे आणि मुस्लिम वस्तीचे गाव. डे ला वेला हा इटालियन प्रवासी इथं जवळ जहाज नांगरून थांबला होता.. पण मलबारी चाच्यांच्या भीतीने बंदरात आला नाही..

१६७० सालची ऑगीलबी ची नोंद सांगते की हे हे नदीकाठचे गाव आहे. माडांच्या दाटीत वसवलेली कौलारू घरांतील वस्ती, पाणीपुरवठ्यासाठी विहिरींची सोय आणि छोट्या नाल्यांतून सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था याचा उल्लेख सापडतो. त्या काळात छोट्या बोटी नदीतून काही मैल आत जाऊ शकत असत. इथले रामाचे आणि महालक्ष्मीचे देऊळ प्रसिद्ध असून चैत्राच्या (एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या) जत्रेत जवळपास २५ हजार लोक येत असे गॅझेट सांगते. गावातल्या पायवाटेने निवांत भटकण्यात मोठी मौज असते.

महाजनांच्या घरासमोरच श्रीरामाचे पेशवेकालीन मंदिर आहे. मंदिराला नवीन रंगरंगोटी केलेली असली तरीही मराठा वास्तुरचना पद्धतीतील अनेक सौंदर्यस्थळे आपण इथं नीट पाहू शकतो. तुळशी वृंदावन आणि तुळस दारातून आत शिरताच लक्ष वेधून घेते. गावातील उत्सव कीर्तनांचा युट्युबवर लाईव्ह वेबकास्ट तरुण मंडळी मोठ्या उत्साहाने करतात. हे मंदिर जोगांनी बांधले यापलीकडे मला देवळाची ऐतिहासिक माहिती मिळालेली नाही. कोणाला माहिती असल्यास नक्की chinmaye.bhave@gmail.com या ईमेलवर कळवा.


कोकणातील अनेक पेशवेकालीन मंदिरांप्रमाणेच इथेही लाकडी बांधकामाची विलक्षण रेखीव रचना पाहता येते. अशी मंदिरे जतन करणे, सांभाळणे हे सोपे नाही.. त्यासाठी ग्रामस्थांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळणे तर गरजेचे आहेच शिवाय इथल्या विविध प्रतिमांचे चित्रण आणि अभ्यास आवश्यक आहे.

हिंदू समाजात शैव-वैष्णव भेद होता अशी मांडणी करणारे बरेच आहेत.. या वादग्रस्त विधानाच्या ऐतिहासिकतेची सत्यता पडताळण्याची ही जागा नव्हे.. पण कोकणात शिवाच्या मंदिरात दशावतार आणि विष्णूच्या मंदिरात शंकराचे स्थान अगदी सहज पाहायला मिळतात.. आणि पंचायतन असेल तर अनेक देवतांना एकाच ठिकाणी पूजता येते. इथं शंकराचे मुखलिंग आहे हे विशेष. सदाशिवाचे हे रूप आपल्या वेगळेपणाला जपून आहे.

सकाळी लवकर अंघोळ करून इथं नमस्कार करायला यायचं आणि देवासमोर शांत चित्ताने बसून राहायचं. कधीतरी इथं उत्सवाच्या धामधुमीत यायचं आहे हे नक्की. लहान असताना आम्ही इथं माझ्या मामीच्या माहेरच्या मंडळींसोबत महालक्ष्मीच्या उत्सवाला आलो होतो.. वाड्यांमध्ये मनसोक्त क्रिकेट खेळलो होतो. पंगतीत बसून सुग्रास प्रसादाचे भोजन जेवलो होतो.. इथल्या रथयात्रेच्या गर्दीत दिवसभर हिंडलो होतो.. उत्सवाच्या जल्लोषाची मजा वेगळी पण रोजच्या दिवशी सकाळी इथं असणारी प्रसन्नताही जादुई असते. राम लक्ष्मण सीतेच्या संगमरवरी मूर्ती आणि त्यांना केलेले खूपच मोहक पोशाख आणि देवासमोर तेवणारी समई.. देवत्व अनुभवण्याचाच क्षण. केळशी हे मंदिरांचं गाव म्हंटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही.. इथल्या सिद्धिविनायक, कालभैरव आणि महालक्ष्मीची गोष्ट पुन्हा केव्हातरी.