Darya Firasti

अगत्यशील रस्टिक हॉलिडेज

कोकणातील सर्वोत्कृष्ट होमस्टे निवडायचा असेल तर नक्कीच तुरळ (संगमेश्वर) येथील रस्टिक हॉलिडेजचे नाव एक प्रबळ उमेदवार म्हणून डोळ्यासमोर येते. नितीन आणि शिल्पा करकरेंनी त्यांच्या पूर्वजांचा वारसा असलेलं त्यांचं २०० वर्षे जुने घर आणि आजूबाजूचा परिसर यात एक सुंदर ऍग्रो होम स्टे बांधला आहे. त्यांची दृष्टी आणि अगत्यशील स्वभाव या दोन्हीच्या मिलाफातून हा विलक्षण प्रकल्प साकारला आहे. संगमेश्वर भागात मागे बराच हिंडलो तेव्हा गोळवली येथे राई मध्ये राहिलो होतो पण रस्टिक हॉलिडेज ला जाण्याचा योग आला नव्हता. यावेळी फक्त निसर्गाच्या सान्निध्यात खा-प्या आणि झोपा काढा एवढाच उद्देश घेऊन तुरळला आलो होतो आणि त्या दृष्टीने रस्टिक हॉलिडेजची निवड अगदी योग्य ठरली. अर्थात मुंबई गोवा महामार्गाने वीजेची गाडी घेऊन ६५० किमी प्रवास करणे हे adventure होतेच आणि शिल्पा-नितीन करकरे आणि त्यांचे पाहुणे यांच्या बरोबर मारलेल्या विविध विषयांवरील गप्पांची जोडही या निवांत सुटीला मिळाली.

तुरळ हे संगमेश्वर तालुक्यातील गाव अगदी गर्द वनराईत वसलेलं आहे. मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे आणि आरवली पार केल्यानंतर आपण शास्त्री नदीच्या खोऱ्यात प्रवेश केलेला असतो.. चहूबाजूला साधारणपणे ३००-३५० मीटर म्हणजे १००० फूट उंच टेकड्या आणि २०० मीटर किंवा ६०० फूट उंचीवरील बशीत वसलेलं तुरळ गाव. सावर्डेहून संगमेश्वर च्या दिशेने जात असताना महामार्गाच्या उजव्या बाजूला तुरळ पोस्ट ऑफिस आहे. तिथे तुरळ धामापूर रस्त्याने सुमारे पाच-सहा किमी पश्चिमेला गेल्यावर करकरे बस स्टॉप येतो. तिथे डावीकडे जाणाऱ्या छोट्याशा रस्त्याने आपण दोन मिनिटांत रस्टिक हॉलिडे गाठतो.

शॉन आणि शायना हे दोन लॅब्राडोर, करकरे कुटुंब आणि रस्टिक हॉलिडेज चा अविभाज्य भाग आहेत. इथं पोहोचलात की अगदी पारंपरिक पद्धतीने तुमचे स्वागत शिल्पाताई करतात आणि त्यांच्या बरोबर नितीन दादा आणि शॉन-शायना सुद्धा असतात. या रस्त्याने दुसऱ्या दिवशी आम्ही संध्याकाळी चालायला गेलो तेव्हा आमच्या सोबतीला शायना ताई आल्या होत्या. करकरे कुटुंबाच्या दोनशेहून अधिक वर्षे जुन्या घराला लागूनच विष्णूचे मंदिर आहे. या ठिकाणी गोकुळाष्टमी साजरी करायला समस्त करकरे मंडळी एकत्र होतात. या उत्सवाची दोनशेवी जयंती नुकतीच पार पडली. संध्याकाळच्या वेळेला दिवेलागणीची परवचा म्हणणे ही इथली नित्यनेमाने होणारी गोष्ट.

इथं नव्याजुन्या गोष्टींचा उत्तम मिलाफ साधलेला आहे. अगदी प्रसन्न देवघर आणि विंटेज फर्निचरने सजलेला शेणाने सारवलेली जमीन असलेला मांडव जिथे विविध विषयांवर आले घातलेल्या कडक चहाबरोबर गप्पा मारण्याची मौज वेगळीच असते. असे अनुभव पंचतारांकित हॉटेल्समध्ये मिळत नाहीत.

तांदळाची लागवड, तिथेच पिकवलेल्या भाज्या, ताजी लिंब-मिरच्या आणि इतर अनेक मसाले असा इथल्या शेतीचा थाट! इथं कृषी विद्यापीठाने संशोधन केलेली अनेक seedsही वापरली जातात. सध्या त्यांनी रत्नागिरी-24 या बियाण्याची लागवड केली आहे त्यामुळे त्याचं पीक आल्यानंतर त्या भाताची चव कशी असेल हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक झालो. शिल्पाताई सुगरण आणि प्रयोगशील असल्याने इथल्या मेनूमध्ये नेहमीच वैविध्य असते. कोणत्याही दिवशी तोच pattern रिपीट होतोय असं म्हणता येत नाही आणि नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला आणि रात्रीच्या जेवणाला भरपूर वैविध्य असते. मेन्यू मधील विविध पदार्थ ठरवत असताना ते स्थानिक असावेत आणि त्यात थोडाफार प्रयोग करून काही improvisation आणावे असा त्यांचा जरूर प्रयत्न असतो.

मिश्र पिठाचे वडे, कांद्याची चटणी, साटोऱ्या, झुणका, सांदण, फणसाची भाजी, तांदळाची भाकरी, पानगी, सांजा, टोमॅटोचे सार असे अनेक पदार्थ आणि अगदी ताव मारून खाल्ले. घरच्या गायीच्या दुधापासून केलेलं श्रीखंड तर अगदी १०० पैकी १०० गुण द्यावं असं. कोकणात नाश्त्याला मऊभात खाण्याची पद्धत आहे.. त्यामुळे एक दिवस सकाळी पोह्यांच्या जोडीला मेतकूट घातलेला मऊ-भात आणि कुळथाचे पिठले असा झकास बेत होता. दक्षिण भारतातील अवियल ही भाजी तशी लोकप्रिय आहे. त्याच धाटणीचे स्ट्यू मी श्रीलंकेत खाल्ले होते. शिल्पाताईंनी त्याला संगमेश्वरी रूप देऊन केलेली भाजी माझ्यासाठी या सहलीचा हायलाईट म्हणता येईल. साटोऱ्या हा पदार्थ मला विशेष कधी आवडला नाही. इथं मात्र ताज्या खमंग कुरकुरीत साटोऱ्या मी साजूक तूप घालून छान एन्जॉय केल्या. तेल, मसाले यांचा कुठेही अवाजवी वापर न करता सगळेच पदार्थ केले होते. अगदी साधे कुळथाचे पिठले किंवा कढी सुद्धा किती चविष्ट करता येते याचा अनुभव इथं मिळाला.

रस्टिक या नावाला अगदी साजेशी अशी इथली कॉटेजेस आहेत. आम्ही एका माती-विटांच्या हॉर्नबिल नावाच्या कोटेजमध्ये राहिलो. समोरच हिरवेगार शेत आणि मावळतीकडे झुकणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी झळाळलेली हिरवळ असा देखावा पाहत गप्पा मारत बसावं असा इथला priceless अनुभव. इथल्या आतल्या डेकॉर बद्दल अधिक लिहीत नाही कारण ती अनुभव घेण्याची गोष्ट आहे. आता कालानुरूप लाकडी फॉल्स सिलिंग सारखे बदल केलेले असल्याने कोकणात नेहमी होतो तो कीड्यांचा-पालींचा त्रास इथं नाही.

कोकणातील मांजरी हा माझा सॉफ्ट कॉर्नर. सध्या इथं दोन दीड वर्षांच्या मांजरी आहेत. एक राखाडी आणि एक कॅलिको रंगांचा पॅटर्न असलेली. पाहुण्यांशी, शाईना-शॉन शी खेळणे.. शिकार करणे आणि नितीन दादांच्या खुर्चीवर पद्मासन घालून बसणे हा यांचा लाडका कार्यक्रम. काही म्हणा.. घरात मांजर असेल तर चैतन्याची कमतरता नसते. इथं आलेल्या एका लहानग्या पाहुण्या बरोबर या मांजरीची चांगली गट्टी झाली होती. कॅलिको मांजरीने तर त्याच्या मांडीत बसून भरपूर लाडही करून घेतले.

तुम्हाला पक्षी-निरीक्षण करण्याची आवड असेल तर रस्टिक हॉलिडेज च्या परिसरात दीडशे ते दोनशे पक्षी प्रजाती पाहिल्या गेल्या आहेत, त्यामुळे बर्डिंग साठीची मोठाली टेलेफोटो लेन्स, किंवा दुर्बीण घेऊन इथं आलात आणि नितीन दादांचे मार्गदर्शन घेऊन थोडं नियोजन केलंत तर तुम्हाला पक्षी निरीक्षणाचाही उत्तम अनुभव इथं मिळू शकतो. मर्लिन सारखी apps वापरून आपण पक्षी कसे ओळखायचे, त्यांच्या सवयी काय असतात याचे अनेक किस्से तुम्हाला नितीन दादा सांगतील. तुमचं नशीब चांगलं असेल तर इथं मलबार पाईड हॉर्नबिल म्हणजे धनेश हा रुबाबदार पक्षी दिसू शकेल. किंगफिशर किंवा खंड्याच्या दुर्मिळ जाती दिसतील.. पुढं करजुव्याच्या दिशेने जाताना भरपूर जंगल आहे.. भेकर, पाम सिवेट, कोल्हे, बिबट्या, गवे असे अनेक प्राणी त्या भागात अवचितपणे दर्शन देऊ शकतात.. त्याचीही मौज घ्यायला हवी.

या १०० एकरांच्या परिसरात फिरण्यासाठी जांभा दगडांची पायवाट बांधलेली आहे, त्यावरून भटकंती करता करता विविध फुलझाडे लक्ष वेधून घेतात. विविध जातीचे बेडूक आम्ही पाहिले.. कोळ्यांनी जाळी विणून केलेली नक्षी सुद्धा पाहिली.

स्पायडर फ्लॉवर (Cleoserrata Speciosa) आणि लार्क डेझी (Centratherum punctatum) ही फुले मला फोटो सर्च वापरून ओळखता आली. आम्ही टाटा नेक्सन ईव्ही ही वीजेची गाडी घेऊन हिंडत असतो त्यामुळे जिथं राहू तिथं गाडीच्या भोजनाची सोय होईल का हेही आमच्यासाठी महत्वाचे असते. सुदैवाने गेल्या वर्षभरात कोकणातील फास्ट चार्जर्सची संख्या बरीच वाढली आहे. पण मुक्कामाच्या ठिकाणी वॉल चार्जर असेल तर मग तिथल्या तिथं हिंडताना किंवा परतीच्या प्रवासाला सुरुवात करताना कोणतीही अडचण येत नाही. रस्टिक हॉलिडेज चे ईव्ही वापरणारे आम्ही पहिले पाहुणे.

आमच्या गाडीला एसी स्लो चार्ज करण्यासाठी १५ एम्पियर क्षमतेचा प्लग पॉईंट आणि व्यवस्थित अर्थिंग एवढीच गरज असते. कोकणात पावसाळ्यात रात्री कधीही वादळ-पाऊस सुरु होतो त्यामुळे चार्जर केबल प्लॅस्टिकने किंवा इतर कोणत्याही पद्धतीने झाकता येणे आवश्यक असते. नितीन दादा हरहुन्नरी असल्याने त्यांनी तिथल्या तिथे आवश्यक ते इलेक्ट्रिकल काम करून आमची गाडी पूर्ण १००% चार्ज होईल अशी सोय करून दिली. येणाऱ्या काळात पार्किंग पर्यंत इलेक्ट्रिकल केबल टाकून सोय करण्याचा त्यांचा संकल्प आहे.

नितीन दादा आणि शिल्पा ताई पंचक्रोशीतील मंडळींसाठी अनेक उपक्रम राबवतात. इथं त्यांचा सुतारकामाचा वर्कशॉप आहे ज्यात अतिशय सुंदर उपयुक्त वस्तू बनवल्या जातात. कोकणातील खाद्यपदार्थ, सरबते, लोणची, धान्ये, कडधान्ये हे सगळेही तुम्हाला इथं घेता येईल. जी ए कुलकर्णी, पु ल देशपांडे किंवा जिम कॉर्बेटच्या शिकारकथा वाचत तुम्ही इथं लोळत पडू शकता.. किंवा रीडर्स डायजेस्टच्या मोठ्या संग्रहातून काही इंटरेस्टिंग सापडतंय का पाहू शकता. कोकणात अनुभवसमृद्ध डोळस पर्यटन करायचं असेल तर हॉटेल्स पेक्षा अशा होम स्टे ची निवड करणे केव्हाही चांगले. अगदी प्राथमिक सुविधा असलेले झोपण्याची अंघोळीची स्वच्छ व्यवस्था असलेले होमस्टे तर कोकणात आहेतच.. पण असे नैसर्गिक-सांस्कृतिक अनुभव देणारे प्रीमियम होम स्टे सुद्धा आता कोकणात येत आहेत. गर्द वनराई आणि विविध वारसास्थळे यांचा वरदहस्त लाभलेल्या संगमेश्वर तालुक्यात रस्टिक हॉलिडेज सारख्या प्रकल्पांची निर्विवादपणे गरज आहे आणि त्या दृष्टीने हे ठिकाण मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.

रस्टिक हॉलिडेजच्या आसपास विविध ठिकाणे पाहण्याजोगी आहेत.. कर्णेश्वर मंदिराचे स्थापत्यसौंदर्य थक्क करणारे आहे. राजवाडीचा सोमेश्वर किंवा बुरंबाडचा आमणायेश्वर हे पेशवेकालीन स्थापत्याचे उत्तम नमुने पाहता येतात. मावळंगे या गावातील थोडेसे आडबाजूला असलेले योग-नरसिंहाचे शिल्प शिलाहारकालीन कलेचा वारसा जपते तर करजुवे येथे तीन तालुक्यांच्या संगमावर कोकणातील बॅकवॉटर्सचे अद्भुत सौंदर्य पाहता येते. कोकणातील अशा भ्रमंतीच्या माहितीसाठी दर्या फिरस्तीला भेट देत राहा आणि आपल्या स्नेह्यांना आणि आप्तेष्टांनाही सांगा. रस्टिक हॉलिडेज बद्दल अधिक माहितीसाठी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकता.

संध्याकाळी तिथं निवांत बसलेलं असताना व्हाट्सअप वर आरती प्रभूंच्या शून्य शृंगारतेतील समर्पक ओळी रत्नागिरीच्या ठाकूरदेसाई सरांनी पाठवल्या..

आतां रात काजव्यांची माळावर झुरे,
भोळी निर्झरी मधेंच बरळत झरे.

धुके फेसाळ पांढरे दर्वळून दंवे
शून्य शृंगारते आतां होत हळदिवें.

Leave a comment