Darya Firasti

निसर्गाच्या कुशीतले करजुवे

करजुवे गाव तसे कोणत्याही हमरस्त्यावर नाही.. पण मुद्दाम जाऊन पाहायला हवे असे हे ठिकाण.. इथं काही विशेष वेगळे पर्यटन स्थळ आहे का? तर नाही.. पण भौगोलिकदृष्ट्या विलक्षण ठिकाणी वसलेले हे गाव अनुभवणे म्हणजे निसर्गसंपदेने नटलेल्या नीरव शांततेत स्वतःचे अस्तित्व हरवून बसणे. आशुतोष बापटांच्या संगमेश्वर वरील पुस्तकात या गावचे सुंदर वर्णन वाचले होते. कधीतरी तिथं जायचं हे नक्की केलं होतं. कापसी नदी, गड नदी (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड नदी वेगळी) आणि बाव नदीच्या संगमावर वसलेलं हे ठिकाण.. इथं तिसंगवाडीला हे तीन प्रवाह एकत्र येऊन जयगड किंवा शास्त्री नदी बनते

या जागेची अजून एक विशेष गंमत म्हणजे या संगमाच्या चार दिशांना रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुके आहेत.. गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर आणि चिपळूण हे ते चार तालुके … त्यांच्या सीमारेखा इथंच कुठेतरी एकत्र येत असाव्यात. २००९च्या आसपास प्रथमच मी पुणे-दापोली-रत्नागिरी-विजयदुर्ग-मालवण-वेंगुर्ला-तेरेखोल असा प्रवास होंडा युनिकॉर्न मोटरसायकल वर केला होता. तेव्हा तवसाळ-जयगड फेरी सेवा सुरु झालेली नव्हती त्यामुळे राई-भातगाव पुलाने मी जयगड मार्गे गणपतीपुळे गाठले होते. गुहागर ओलांडले तेव्हा अंधार पडायला लागला होता.. मिट्ट काळोखात रानातून केलेला तो ५० किमी प्रवास मी कधीही विसरू शकत नाही.. एक माणूस नजरेला पडलं नाही.. मोटरसायकल च्या दिव्याच्या झोतात लंगूर, हरीण, कोल्हे दिसले तेवढीच काय ती सोबत

लॉकडाउन्स ची कैद संपली आणि भ्रमंती सुरु झाली तेव्हा २०२१ च्या पावसाळ्यात बुधल-गुहागर-वेळणेश्वर-हेदवी परिसरात डॉक्युमेंटेशन करायला गेलो होतो. परत येताना ठरवलं की राई-भातगाव पूलमार्गे संगमेश्वर च्या दिशेने प्रवास करायचा, करजुवे गाठायचं आणि मग मावळंगे-तुरळ असा प्रवास करत, शक्य झालं तर बुरंबाड, आंबव,आरवली अशी ठिकाणे करत गोवा महामार्ग गाठायचा. वेळणेश्वर ला मुक्काम होता गोपाळकृष्ण गोखल्यांच्या घरी. मुंबईत अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेला त्यांचा मुलगा उन्मेष अतिशय छान फोटोग्राफी करतो.. त्याच्याशी गप्पाही झाल्या.. शेवटच्या दिवशी मस्त गरमागरम चहा घेऊन आम्ही निघालो ते शीर च्या दिशेने.. तिथं वाटेत अबलोली मार्गावर हिरवीगार शेते दोहो बाजूंना दिसत होती.

जामसुत गावातून शीर कडे जाताना उजव्या बाजूला एक छोटासा फाटा येतो, तिथं वळून वाडीत शिरले की काही घरे दिसतात. गुगल मॅप वर लक्ष्मी-नारायण (Laxmi narayan) किंवा सागर काटदरे सर्च केल्यास हे ठिकाण सापडते. काटदरे मंडळींच्या या घरांमध्ये दोन खासगी मंदिरे आहेत ज्यात अतिशय सुंदर कोरीवकाम असलेल्या लक्ष्मी-केशवाच्या दोन मूर्ती आहेत. त्यांना मोठा आणि धाकला लक्ष्मीकेशव म्हणतात. त्याबद्दल सविस्तर पुन्हा कधीतरी.

गावातून पुढं राई भातगावच्या दिशेने निघालो आणि काही किलोमीटर अंतर पार झाल्यावर डाव्या बाजूला खळाळत्या प्रवाहाचा आवाज ऐकू येऊ लागला. ही कापसी नदी जी पुढे करजुवे तिसंगवाडी जवळ शास्त्री नदीला जाऊन मिळते. गुहागर तालुक्यातील खांबेवाडीजवळ उगम पावणारी ही नदी डोंगराच्या उतारावरून आग्नेयेस वाहत, एका दरीला चैतन्याने समृद्ध करत गड नदीला जाऊन मिळते.

अबलोली मार्गाने राई-भातगाव चा पूल ओलांडून डेन, फुणगुस अशी गावे ओलांडत आपण बाव नदीवरील पुलावर येतो. इथं नदीचे पात्र बरेच रुंद आहे. अलीकडं उजव्या बाजूला एक फाटा आपल्याला आनंदाचे शेत किंवा Farm of Happiness या कृषी पर्यटन प्रकल्पाकडे घेऊन जातो. राहुल कुलकर्णी आणि संपदा जोगळेकर या जोडप्याने इथं कोकणातील जीवनशैलीचा अनुभव घेता येईल असं सुंदर घर बांधलं आहे. तिथं आवर्जून जायला हवं. तासभर वेळ असेल तर इथं पुढं उक्षीच्या सड्यावर जाऊन तिथली कातळशिल्पे पाहता येतात.. मी तिथं विलक्षण सूर्यास्त अनुभवला होता. तूर्तास करजुवे गाठायचे आहे तेव्हा पुढं निघू.

इथून नदीला लागूनच असलेल्या रस्त्याने पिरंदवणे मार्गाने आपण करजुवे गावात येऊन पोहोचतो. इथून एक रस्ता मावळंगे – तुरळ मार्गे गोवा महामार्गाला जाऊन मिळतो तर दुसरा माखजन मार्गे थोडा उत्तरेला महामार्ग गाठतो. दोन्हीचे अंतर साधारण सारखेच म्हणजे ३२ ते ३५ किमी आहे. मावळंगे ला अतिशय सुंदर असे नरसिंह मंदिर आहे आणि तुरळ ला नितीन आणि शिल्पा करकरेंनी चालवलेले मामाचा गाव किंवा रस्टिक हॉलिडेज नावाचे कृषी पर्यटन केंद्र आहे. ते पाहण्याचा योग अजून आलेला नाही. या दोन्ही ठिकाणांबद्दल पुन्हा केव्हातरी लिहीनच.

साधारणपणे ५०० घरे असलेल्या आणि २ हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या करजुवे गावात आता आपण येऊन पोहोचलो आहोत. देवरुख, चिपळूण, रत्नागिरी या बाजारपेठा इथून बऱ्याच दूर आहेत. सकाळच्या वेळी आम्ही इथं पोहोचलो तेव्हा गाव अगदीच सुशेगाद होतं. घरे नांदती पण कसलाच आवाज नाही.. रस्तेही रिकामे.. एखादी मोटरसायकल किंवा टमटम घरघरत जाईल तेवढाच शांततेत व्यत्यय.. नदी पाहायला म्हणून एक पायवाट उतरलो तर शाळेतील मुलांच्या कविता पठणाचा आवाज आला. निसर्गाच्या सहवासात वसलेल्या शाळेचे ठिकाण अगदी अद्भुतच होते. झुडुपांतून एक पायवाट आपल्याला संगमाकडे घेऊन जाते आणि नदीचे विस्तीर्ण पात्र आपल्या दृष्टीस पडते. कुसुमाग्रजांच्या कवितेतील नदीचे वर्णन या ठिकाणी चपखल बसेल आहे आहे.

नदीबाई माय माझी डोंगरात घर
लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर
नदीबाई आई माझी निळे निळे पाणी
मंद लहरीत गाते ममतेची गाणी


कुसुमाग्रज

निळे निरभ्र आकाश आणि नदीच्या मध्ये हिरवळीने नटलेला डोंगर असं दृश्य समोर तिसंगवाडीच्या दिशेने दिसत होतं. इथं असलेल्या वनश्रीचा खरंतर अभ्यास व्हायला हवा.. इथंच नाही समग्र कोकणातच असलेल्या वनराईचा अभ्यास करणाऱ्या कोणीतरी सोप्या भाषेत माहिती देणारं पुस्तक करायला करायला हवं. जेणेकरून कोकणातून भ्रमंती करत असताना आपल्याला दिसणारी झाडे कोणती, त्यांचे वैशिष्ट्य काय हेही कळू शकेल. इथं मला बोटीतून नदीचा परिसर पाहण्याची खूप इच्छा झाली. बापटांच्या पुस्तकात संतोष महांकाळ नावाच्या नावाड्याचा उल्लेख आहे. बराच काळ थांबूनही बोटिंग काही जमले नाही.. पण पुन्हा इथं येण्यासाठी काहीतरी निमित्त हवे ना… बोटीच्या धक्क्यावर बसून थंडगार पाण्यात मी पाय बुडवले.

काही जण या ठिकाणाला तीन नद्यांचा संगम म्हणतात तर काही म्हणतात तीन खाड्या एकत्र आल्या आहेत. खरे म्हणजे खाडी आणि नदी काही वेगळं नाही. पण भरतीच्या वेळेला जिथवर समुद्राचे खारे पाणी नदीत शिरत असेल तेवढ्या भागाला खाडी म्हणत असावेत. इथं पाणी स्तब्ध वाटावे इतके संथ वाहत होते.. त्यामुळे निसर्गाने आकाशात काढलेल्या चित्राचे प्रतिबिंब नदीच्या पाण्यात स्थिरावले होते. नदीच्या काठाजवळ तिवरांचे रान होते तर परिसरातील टेकड्यांवर हरित जंगले नटली होती. दूर डोंगरावर ढंगाची सावली पडली होती.

राई-भातगाव चा पूल इथून जवळच असला तरीही टेकडीच्या खांद्यामागे लपला होता. काठांजवळ असलेल्या झुडपांची शीतल छाया किनाऱ्यावर पडली होती. तिथल्या लाल मातीत ओलावा होता.. भरतीला सुरुवात झाली असावी कारण पाण्यावर आता तरंग उमटायला लागले होते. पात्रातील गाळ आणि तळाशी असलेली लाल माती यांनी काठाजवळ असलेल्या पाण्याला काहीशी विटकरी रंगाची छटा दिली होती.. पण प्रवाहाच्या मध्यभागी असलेले पाणी मात्र हिरवट निळाईच्या साजाने ल्याले होते. फोटोग्राफी व्हिडीओग्राफी सगळं करून झालं तरीही तिथून पाय निघत नव्हता.. तिथल्या गूढ रम्य आसमंतातले गंध, नाद, स्पर्श, प्रतिमा यांच्या डोहात मी बुडून गेलो होतो.

त्या क्षणी मला बा. सी. मर्ढेकरांच्या काव्यपंक्ती आठवल्या ..

किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच

One comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: