देवळात दर्शन घेताना शांतता, दिव्यत्व, मांगल्य हे सगळं अनुभवता येणं या बाबतीत कोकणातील बहुतेक सगळीच मंदिरे जागृत आहेत असं मला म्हणावंसं वाटतं. नवसाला पावतात म्हणून जागृत आहेत असं नाही.. निसर्गाच्या समीप एक समृद्ध आध्यात्मिक अनुभव घेण्याची संधी देतात म्हणून जागृत असं मी म्हणेन.. आणि अशी अनेक नितांतसुंदर देवालये नेहमीच्या पर्यटनस्थळांपासून दूर थोडी आडबाजूला आहेत. मुद्दाम वाट वाकडी करून तिथं गेल्याशिवाय कोकण पर्यटनाचा अनुभव पूर्णत्व प्राप्त करत नाही असं निदान मला तरी वाटतं. अशीच अनुभूती देणारं एक ठिकाण म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील श्री आमणायेश्वर देवस्थान. या नावाची उपपत्ती फार रंजक आहे. आमोणीच्या रानात वसलेला शिवशंकर म्हणून आमणायेश्वर.. Rhus Mysorensis हे त्याचं शास्त्रीय नाव.. आंब्याच्या कुटुंबातील हे झाड.. झुडपांच्या रानाच्या स्वरूपात देशाच्या दक्षिण भागात विखुरलेले आहे.. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू इथं ते मुबलक सापडते… श्रीलंका आणि पाकिस्तानातही ही झाडे सापडतात असं शास्त्रीय माहिती आपल्याला सांगते. विविध औषधी गुणांनी युक्त या झाडाला फेब्रुवारी मार्च महिन्यात मोहोर येतो. या झाडांमध्ये यकृताला रक्षक आणि मधुमेह विरोधक असे गुण असल्याचे मी फार्मा इनोव्हेशन जर्नलच्या २०१५ च्या आवृत्तीमध्ये वाचले होते..

मुंबई गोवा महामार्गावरील आरवली पासून हे गाव जवळच आहे. इथं मी प्रथम गेलो तो २०२१ च्या मार्च महिन्यात.. दिवस मावळतीला आलेला असताना अगदी थोडासाच वेळ हे देऊळ पाहायला मिळाला त्यामुळे हा परिसर नीटसा पाहता आला नाही. परंतु मंदिराच्या आवारातील प्रचंड मोठ्या दीपमाळेने मात्र माझे लक्ष नक्कीच वेधून घेतले.

मंदिराच्या बाजूला एक मोठा तलाव दिसला.. सूर्य मावळलेला असल्याने आसमंतात कृष्णरंग भिनायला लागला होता.. त्या तलावात अग्नितीर्थ, सर्वपापमोचनतीर्थ, व्याधीहरणतीर्थ, अमृतातीर्थ अशी ४ तीर्थे आहेत आणि पाण्याची पातळी घटली की ती दिसतात (कोकणातील पर्यटन – प्रा. प्र. के. घाणेकर) नंतर पुन्हा मी इथं पावसाळ्यात आलो तेव्हा हा तलाव पूर्ण भरलेला दिसला.. वातावरण स्वच्छ आणि पांढऱ्या मेघांनी नटलेलं आकाश आणि मंदिर परिसरातील हिरवळ असा स्मरणीय देखावा पाहून इथं तृप्त झालो.


शास्त्री नदीच्या अगदी जवळ असलेला हा परिसर हिरव्याकंच शेतांनी बहरलेला दिसत होता.. जिथवर नजर जाईल तिथवर हिरवळीचा गालिचा अंथरला आहे असं वाटत होतं.. हिरव्या रंगाच्या असंख्य छटा.. शेतांमध्ये राखण करत उभे असलेले वृक्ष अन नदीच्या पल्याड पार बुरंबाड-माखजन च्या डोंगरापर्यंत पसरलेला निसर्गाचा खजिना असं ते दृश्य मी ड्रोनने टिपलं आणि मग शिवदर्शनासाठी आणि ते सुंदर मंदिर पाहण्यासाठी आत गेलो.

इथल्या गाभाऱ्याला पायरी नाही हे एक खास वैशिष्ट्य म्हणता येईल. मंदिर शंकराचं असलं तरी संभामंडपाच्या कोनाड्यात दशावतार मूर्ती दिसल्या.. पिंडीवर अतिशय सुबक अशी फुलांची सजावट होती.. पाच शिखरांचे हे मंदिर सरदार गोविंदपंत बुंदेलेंच्या कडून बांधले गेले असं अभ्यासक श्री आशुतोष बापट नमूद करतात. त्यांचे संगमेश्वर तालुक्यावरील पुस्तक अतिशय वाचनीय आणि संग्रह करण्याजोगे आहे.


या देवळाचे बांधकाम साधारणपणे अठराव्या शतकाच्या मध्यातील असावे असे वाटते. अतिशय भव्य आणि प्रमाणबद्ध अशी बांधणी पेशवेकालीन मंदिर स्थापत्याच्या सर्व सौंदर्य स्थानांना खुलवणारी.. इथं शंकराला अभिषेक होत असताना सारंगीसारखा आवाज येतो असं सांगितलं जातं.. पण मुद्दाम तसा संकल्प करून आल्यास तो आवाज येत नाही असेही म्हणतात.. दुसरा बाजीराव पेशवा इथं दर्शनाला आला पण त्याला तो खास आवाज ऐकू आला नाही असे सांगतात.. मंदिराशी संलग्न एक आख्यायिका अनेक शिवमंदिरांच्या बाबतीत ऐकलेली असते तशी आहे.. शिवशर्मा नामक ब्राह्मणाने इथं त्याची गाय चरायला गेल्यावर दुधाची धार सोडत असे म्हणून पहार घेऊन प्रहार केला आणि मग त्याचे तीन तुकडे झाले एक कळपेश्वर झाला, दुसरा कळंबूशी गावात पडला म्हणून कळंबेश्वर झाला तर मधला भाग तिथेच राहिला आणि त्यातून रक्त वाहू लागले आणि मग तिथं आमनायेश्वर प्रतिष्ठापित झाला अशी ही गोष्ट. साठे, भावे, नामजोशी, भागवत, सहस्रबुद्धे, खरे, मालशे, खांडेकर, पटवर्धन अशा अनेक कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबांचा हा आराध्य देव आहे.


मंदिराच्या भिंतीवर असलेली गंडभेरुंड शिल्पे न पाहता इथून गेलात तर मग इथली वारी अपूर्ण ठरली असंच म्हणावं लागतं. पक्ष्याने पायात आणि चोचीत पकडलेले वाघ आणि त्या वाघांनी पंजात पकडलेले हत्ती अशी ही मोहक शिल्पे म्हणजे सत्ता आणि लष्करी सामर्थ्याचे प्रतीक आहेत असे मानले जाते. हर्णेचा गोवा दुर्ग किंवा देवाचे गोठणे येथील भार्गवराम मंदिर इथं अशी शिल्पे दिसतात.. महामार्गापलीकडं राजवाडी इथं असलेल्या सोमेश्वराच्या देवळावर सुद्धा गंडभेरुंड शिल्पे आहेत. यांचे नीट जतन तर व्हायला हवेच शिवाय या दृश्य संस्कृतीतील वारशाबद्दल लोकांना समजवून सांगितलेही पाहिजे. महेश तेंडुलकरांनी या विषयावर लिहीलेले गडमंदिरांवरील द्वारशिल्प हे माहितीपर पुस्तक; गंडभेरुंड आणि तत्सम शिल्पांबद्दल जाणून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. इथं जवळच तुरळला नितीन करकरेंचे मामाचा गाव/ रस्टिक हॉलिडे आणि गोळवली येथील अमोल लोध यांचे राई ही दोन अतिशय छान कृषी पर्यटन केंद्रे आहेत.. तिथं मुक्काम करायला हरकत नाही. सरंदचे विष्णू मंदिर, धामणीचा लक्ष्मीकेशव, आरवली आणि आंबव ची सूर्यमंदिरे.. शिरंबे येथील मल्लिकार्जुन देवस्थान.. देवपाट जवळ असलेले लक्ष्मी-मल्लमर्दन मंदिर.. मावळंगे चे योगनरसिम्ह देवस्थान अशी कैक अद्वितीय मंदिरे याच परिसरात आहेत. हे सगळं पाहायचं असेल तर संगमेश्वर तालुक्यात कोकण भ्रमंती साठी यायला हवं.. अन या सर्व मंदिरांचा शिरोमणी म्हणजे कसबा संगमेश्वर येथील श्री कर्णेश्वर.. शिवाय कसब्यातील अनेक प्राचीन मंदिरांचे अवशेष आहेतच. त्यामुळे कोकणात पाहण्यासारखं खूप काही आहे.. फक्त ते पाहायला वेळ आणि खुली दृष्टी हवी.. ती घेऊन इथं खुशाल या.. कोकण आपलाच असा..