
मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी १६९८ मध्ये अलिबाग शहराची नव्याने उभारणी सुरु केली. त्यापूर्वी अलिबाग शहराची वस्ती हिराकोट तलावाजवळच्या रामनाथ भागात होती. आजही तिथं असलेला हिराकोट तलाव ही अलिबागच्या नागरिकांसाठी चालायला जाण्याची जागा आहे. इथेच पुढं कान्होजी आंग्रेंनी हिराकोट नावाचा भुईकोट किल्ला इसवीसन १७२० च्या सुमारास बांधला. तिथं आंग्रे घराण्याचा खजिना ठेवला जात असे. आज तिथं सरकारी तुरुंग आहे त्यामुळे किल्ला फक्त बाहेरूनच पाहता येतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मारुतीचे शिल्प आहे ते विशेष पाहण्यासारखे आहे.

शनीला तुडवणाऱ्या मारुतीचे हे शिल्प पश्चिम दिशेला असलेल्या दरवाजावर आहे. किल्ल्याच्या सभोवताली रस्त्यावरून पोलिसांच्या परवानगीने तटबंदी आणि विविध बुरुज पाहता येतात. घडीव दगडांच्या राशीतून रचलेले हे बुरुज अगदी प्रमाणबद्ध वाटतात.
१७६१ ते १७८५ या काळात अनेकदा या किल्ल्यात आग लागण्याची दुर्घटना झाली. जयसिंगराव आंग्रे आणि बाबुराव आंग्रे यांच्यातील सत्ता संघर्षही या ठिकाणी झाल्याचे दिसते.