
भारताच्या विविध भागांमध्ये महाभारत आणि पांडवांशी निगडित अनेक आख्यायिका आहेत. अनेक ठिकाणी स्थानिकांनी महाभारतातील पात्रांना तिथल्या दंतकथांमध्ये सामावून घेतलेले दिसते. आवासचा समुद्र किनारा पाहून आपण थोडे दक्षिणेकडे समुद्राला समांतर रस्त्याने गेलो तर आपल्याला एक छोटेसे साधेसेच मंदिर दिसते. हे आहे पांडवा देवीचे मंदिर. कोळी समाजामध्ये हे देवीला फार महत्व आहे.

मंदिरामध्ये असलेल्या देवीच्या मूर्तीबरोबरच तिथं असलेल्या दगडी होडीचीही पूजा केली जाते. अशी आख्यायिका आहे की या दगडी होडीत बसून पाच पांडव आवासजवळ आले आणि एका रात्रीत विविध मंदिरे निर्माण करून तिथं प्रतिकाशी वसवण्याचा प्रयत्न केला. देवीला हे पटले नाही आणि मग तिने कोंबड्याचे रूप धारण केले. कोंबडा आरवला म्हणजे सकाळ झाली असे समजून पांडवांनी काम थांबवले पण त्यांच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे. चिडलेल्या भीमाने देवीच्या श्रीमुखात ठेवून दिले आणि त्यामुळे देवीचे तोंड वाकडे झाले अशी समजूत आहे.

आवास चा समुद्रकिनारा पाहण्यासारखा आहे. पांढरी शुभ्र पुळण, सुरूचे बन आणि सागराची गाज. मन तृप्त होईपर्यंत इथं व्हिटॅमिन सी चा आनंद घेता येतो. जवळच वक्रतुंड विनायक आणि नागोबा मंदिर पाहण्यासारखे आहे. आणि सासवणे येथील शिल्पकार करमरकरांचे संग्रहालयही आवर्जून पाहण्यासारखे आहे.

काही जणांच्या मते देवीचे नाव पांडवा देवी नसून पाणबा देवी आहे. देवीचे वाहन म्हणून एखाद्या शिल्पकाराने ही होडी घडवली असण्याची शक्यता आहे. सुमारे तीन मीटर लांबीच्या या दगडी होडीची पूजा केली जाते आणि आपणही स्थानिक कोळी समाजाच्या श्रद्धेचा आदर हे ठिकाण पाहताना केला पाहिजे. समुद्र किनाऱ्यावर उभे राहिले की खांदेरी-उंदेरी किल्ले दिसू शकतात.