
मुंबईजवळ असलेल्या पण तरीही तुलनेने शांत सागरतीरांपैकी एक म्हणून आवासच्या किनाऱ्याचे नाव घेता येईल. शुभ्र वाळूची पुळण, किनाऱ्याला लागूनच असलेलं सुरुचं बन, भरतीच्या पाण्यातून चालताना पायाला होणारा सागराचा थंडगार स्पर्श हे अनुभवायला अलिबागच्या उत्तरेला १५-१६ किमी अंतरावर असलेल्या आवास गावात यायलाच हवं. मुंबईतून रेवस किंवा मांडव्याला येणाऱ्या लाँचने रायगड जिल्हा गाठला की आवास फार दूर नाही. लेखक प्राध्यापक प्र. के. घाणेकरांचे मूळ गाव आवास. देवतांचा अधिवास असलेलं गाव म्हणूनही हे ओळखले जाते. इथं जवळच पांडवा देवीचे मंदिर आहे, नागोबा किंवा नागेश्वर देवस्थान आहे, वक्रतुंड विनायकाचेही सुंदर मंदिर आहे. कोकणातील स्वच्छ, सुंदर, साधी पण टुमदार ऐटीची मंदिरे पाहण्यासाठीही आवास गाठायला हवं.

अभिजित नावाच्या मूलबाळ नसलेल्या एका राजाला कनकेश्वराच्या डोंगरावर जाऊन तपश्चर्या केल्यावर महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाला वक्रतुंडाचा जप करत लोकसेवा करण्याचा आदेश दिला. या वक्रतुंडाच्या कृपेने राजाला पुत्ररत्न प्राप्त झाले अशी आख्यायिका सांगितली जाते. (साद सागराची – अलिबाग जंजिरा पृष्ठ क्रमांक २२)

इथली गणेशमूर्ती गावकऱ्यांना केवड्याच्या वनात सापडली असे ऐकिवात आहे. मूर्तीची पाठ मावळतीकडे असून तोंड पूर्वेकडे आहे. सोंडेचा आकार ૐकार सदृश आहे असे मानले जाते.

हे देवस्थान स्वयंभू गणेश मंदिर म्हणूनही ओळखले जाते. आवास गावाचे नाव खांदेरीवर तैनात असलेल्या आबासिंग नामक सरदाराच्या नावावरून पडले अशीही एक आख्यायिका आहे पण तिला लिखित आधार नाही. स्वयंभू मूर्तीबरोबरच या मंदिरात पाहण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे मंदिराच्या आत असलेले नाजूक लाकडी कोरीवकाम केलेले खांब. श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर हे खांब आवर्जून पाहायला हवेत.

प्रवेशद्वारावर लाकडात कोरलेली गणेशपट्टी, कोरीव स्तंभ आणि विशेष म्हणजे खिळे न ठोकता जोडले जाणारे पूरक आकारांचा वापर करून जोडले गेलेले बांधकाम हे कोकणातील मंदिर स्थापत्यात आढळणाऱ्या विशेष बाबींपैकी एक आहे. हर्णे-मुरुड ची दुर्गादेवी, आसूद जवळचे व्याघ्रेश्वर अशा अनेक मंदिरांमध्ये लाकडी कोरीवकाम असलेले खांब आपल्याला पाहता येतात. दुर्दैवाने याची काळजी घेण्याचे, जतन करण्याचे तंत्र अवगत केलेले कलाकार उपलब्ध नसल्याने विचित्र तैलरंग लावले जाणे आणि या खांबांची निगा राखण्यासाठी पुरेसे लक्ष न दिले जाणे अशी परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे या लाकडी खांबांचे संवर्धन एक आव्हान झाले आहे. मंदिराच्या आवारात असलेल्या एका पिंपळाच्या झाडाखाली नारिंगी रंगात झाकले गेलेले एक शिल्प दिसते. ते गजांतलक्ष्मीचे शिल्प आहे.

आवास परिसरात नागोबा मंदिरही पाहण्यासारखे आहे आणि समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या पांडवा देवीच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पवित्र दगडी होडीही आवर्जून पाहायला हवी. भ्रमंती करायला वेळ असेल आणि डोंगर चढण्याचा मूड असेल तर जवळच मापगांव ला जाऊन कनकेश्वराचा डोंगर चढून महादेवाचे दर्शनही जरूर घेता येईल.