अलिबाग शहराच्या ईशान्येला जवळपास १५ किमी अंतरावर एक डोंगर आहे. या पहाडाची उंची जवळजवळ ३८५ मीटर असून माथ्यावर एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे. ते म्हणजे श्री कनकेश्वर देवस्थान. मापगांव नावाच्या गावातून सुमारे ७५० पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला हे दगडी शिवमंदिर पाहता येते. थोडीशी विश्रांती घेत धडधाकट माणूस हा प्रवास दीड ते दोन तासात पूर्ण करू शकतो. जांभा दगडातील पायऱ्या कोरलेल्या असल्याने आणि रस्ता रुंद असल्याने काळजी करण्यासारखे काहीच नाही. तीव्र चढ पार केल्यानंतर देवाचे पाऊल व गायीचे शिल्प असलेल्या गायमांडीचा टप्पा लागतो. तिथं नमस्कार करून काही काळ बसावं आणि दम घ्यावा. पुढे डोंगराच्या खांद्यावरून विशेष चढ नसलेल्या वाटेने झाडांची शीतल छाया अनुभवत जायचे आहे.
रघुजी आंग्ऱ्यांचे दिवाण गोविंदशेट रेवादास दलाल यांनी कनकेश्वर मंदिराची पुष्करिणी आणि पायऱ्यांचे काम स्वखर्चाने इसवीसन १७७४ जूनच्या सुमारास केल्याची नोंद आढळते. देवाच्याच इच्छेने त्याचा अधिवास असलेल्या ठिकाणी हे बांधकाम झाले असं मानून तिथं देवाचे पाऊल उमटलं आहे या श्रद्धेतून देवाची पायरी बांधली गेली. पुढे माधवराव हरी फडके , रघुजी आंग्रे असे अनेक मान्यवर कनकेश्वराला दर्शनासाठी आल्याच्या नोंदी सापडतात.

दगडी ब्रम्हकुंडाच्या अलीकडे पालेश्वर नावाचे छोटेसे शिवमंदिर आहे. या ठिकाणी श्री शंकराला फुले न वाहता पाने वाहण्यात येतात हे या ठिकाणचे खास विशेष. एका आख्यायिकेनुसार कनकासूर नावाच्या राक्षसाने येथे महादेवाचे उग्र तप केले आणि वर म्हणून त्याच्याशी द्वंद्व करण्याची संधी मागितली. हे द्वंद्व अनिर्णित राहिले. प्रसन्न झालेल्या शंकराने कनकासूर दैत्याला उद्धार करणारा वर मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे या राक्षसाने डोंगरावर शंकर आणि कनकासूर या दोघांचे वास्तव्य असावे असा वर मागितला. शंकराने राक्षसाला पालथे पडण्यास सांगितले व त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्यात कनकासूर भस्मसात होऊन त्यास मुक्ती मिळाली व हे स्थान कनकेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले अशी ही कहाणी.

डोंगराच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आपल्याला दिसते ते पश्चिमाभिमुख कनकेश्वर मंदिर आणि त्याच्या मागील बाजूला असलेली दगडी अष्टकोनी पुष्करणी. पूर्ण भरल्यानंतर या पुष्करणीच्या वर्तुळाचा व्यास जवळपास ३१ मीटर असतो. मंदिराचा विन्यास तारकाकृती असून शिखरावर आमलक आणि कळस दिसतात. धुळे जिल्ह्यातील लिंपणगाव मंदिराप्रमाणेच इथेही २८ कोन असलेले बांधकाम दिसते. त्यापैकी २२ कोण हे बाहेरील बाजूस असून ६ कोन आत लुप्त झालेले दिसतात.

कनकेश्वर हे आंग्रे घराण्याचे कुलदैवत असल्याने याला विशेष महत्व आहे. रघुजी आंग्ऱ्यांनी पायथ्याजवळील सागाव या गावाचे उत्पन्न कनकेश्वराची व्यवस्था पाहण्यासाठी देवस्थानाला मिळावे याकरिता श्रीमंत माधवराव पेशवे यांच्याशी पत्रव्यवहार केलेला दिसतो. कार्तिकातील त्रिपुरी पौर्णिमा आणि माघ महिन्यातील महा-शिवरात्रीच्या दिवशी कनकेश्वर देवस्थानात मोठा उत्सव साजरा केला जातो.

मंदिराच्या दर्शनी भागातील बांधकाम तुलनेने नवीन असून लोकवर्गणीतून केले गेले. तिथली दीपमाळ पारंपरिक कोकणी धाटणीची असून मंदिराच्या शिखरातील विविध दैवतांची शिल्पे पाहण्यासारखी आहेत.
कोनाकृती छत असल्याने गर्भगृहात केलेला ओम नमः शिवाय चा जप आणि घंटेचा निनाद मनात घर करून राहील असा निनादतो. गाभाऱ्यात गेल्यानंतर सहा पायऱ्या खाली उतरून स्वयंभू शिवस्वरूपाला पितळी लिंग, मुखवटा आणि फणाधारी नागाचे पितळी छत्र आहे.

याच मंदिराच्या परिसरात अनेक छोटी दगडी मंदिरे आहेत. रचनेवरून ती पेशवेकालीन मंदिरे असावीत असे वाटते. रामेश्वर, राम सिध्दीविनायक, माणकेश्वर, कुंडेश्वर अशी ही देवस्थाने आहेत. कृष्ण-बलराम मंदिर, लक्ष्मी विष्णू मंदिर आणि विविध धर्मशाळाही आहेत. यापैकी एक धर्मशाळा मुंबईतील फडके गणपतीशी संलग्न आहे. झिराडकडून येणाऱ्या वाटेवर पात्रुबाई देवीचे मंदिर आहे. आणि पश्चिमेकडे थक्क करणारा देखावा इथून पाहता येतो.
अगदी निवांतपणे या परिसराचा आनंद घेत महादेवाचे दर्शन घ्यायचे असेल तर एक दिवस हवा. तिथल्या धर्मशाळेत घरगुती भोजन आणि प्रसादाचाही आस्वाद घ्यायला हवा. आणि मावळतीच्या सूर्याला नमन करून त्याच्या लाल नारिंगी किरणांचा प्रसाद घेऊन मग परतीची वाट उतरत मापगावला उतरायचे.

कोकण हे अति-वृष्टीचे क्षेत्र असून महाराष्ट्रात जरी बारव (खोदलेल्या दगडी विहिरी) स्थापत्य प्रचलित असले तरीही कोकणात अशी उदाहरणे तुलनेने कमी आहेत. त्यापैकी कनकेश्वराची गोलाकार बारव हे एक विशेष उदाहरण आहे असं बारव स्थापत्य अभ्यासक अरुणचंद्र पाठक मानतात. या डोंगरावरून पश्चिमेकडे पाहताना समुद्रात खांदेरी-उंदेरी तर दिसतातच. शिवाय थळ येथील आरसीएफ च्या प्रकल्पाचेही मनोहर दृश्य दिसते. आवास आणि किहीम परिसरातील भटकंती कनकेश्वराच्या ट्रेकशी जोडून वीकएंड प्लॅन करणे शक्य आहे.
खूप सुंदर लेख, कोकणात असूनही ह्या देवळाची विशेष माहिती नव्हती. धन्यवाद!
मंदिराकडून पुढे गेल्यावर एक आमराई आणि खाली उतरणार्या पायर्या लागतात ( पश्चिमेकडे) . इथे एक गोमुख आहे, विलक्षण एकांत आणि शांतता लाभते .