शब्दांकन – पुरुषोत्तम करमरकर
मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) ही जागतिक वारसा स्मारक असलेली भव्य वास्तु आधुनिक गॉथिक स्थापत्याचा साचेबद्ध नमुना आहे. हा केवळ भारतातील रेल्वे क्रांतिचा एैतिहासिक मानबिंदुच नव्हे तर भारतीय रेल्वेमार्ग परिवहनाचा गजबजलेला आणि मोक्याचा वर्तमान केंद्रबिंदुही आहे. मध्य रेल्वे एका विशेष प्रेक्षादालनाद्वारे या वास्तुचा गौरवपूर्ण इतिहास आणि भव्यता याची झलक उपलब्ध करून देते. मात्रं बसल्या गावी अधिक जाणून घेण्यासाठी ही इथली दृकश्राव्य सहल सहजपणे घेऊया!
या वास्तुचं संकल्पचित्रं गाँथिक स्थापत्याचा पिरानेसी म्हणवल्या गेलेल्या स्विडिश अँलेक्स हरमन हेग यांनी आरेखित केलं. आराखडा मान्य करून घेऊन नीधी उभारण्यासाठी हे संकल्पचित्रं अतिशय परिणामकारक ठरलं. इमारतीचा अंतिम आराखडा या आरेखनाशी तंतोतंत मिळता-जुळता आहे. हेग महाशयांनी खड्या पवित्र्यात रेखाटलेले वाघ-सिंह हे प्रत्यक्षात बैठे आहेत, हाच एक अपवाद. मुख्य प्रवेशद्वाराकडे मोहरा वळवला की द्वाराच्या आधीच हे बैठे वाघ सिंह आपलंच अवलोकन करतांना दिसतात. सिंह ब्रिटिशांचा प्रतिनिधि तर वाघ हिंदुस्थानचा.
स्टेन्ड ग्लासेसमधून येणार प्रकाश एक खास माहौल निर्माण करतो. अशी अनेक चित्रे या स्थानकात रंगवलेल्या काचांनी घडवलेली आहेत. आणि त्यावरील नक्षीकामात भारतीयता दिसून येते.
विविध रंगी दुधाळ काचा आणि रंगीबेरंगी चित्रांकित फरशा या, या बाजूपासून त्या बाजूपर्यंत रांगा लावून कलासक्त आणि शिस्तबद्ध प्रवाशांचं नक्षिदार स्वागत करतात. असं स्वागत त्या इमारत उभारणीपासूनच करत आल्या आहेत हे लक्षात आणून द्यावं लागतं इतकं सुरेख जतन केलंय त्यांना. पुढे गेल्यास मध्य रेल्वे प्रबंधन मुख्यालयातलं वारसा संग्रहालय सामोरं येतं. हे पूर्वी headquarters of great Indian Peninsular railway म्हणून ओळखलं जायचं. संग्रहालय सोमवार ते शुक्रवार, दुपारी 2 ते 5 प्रेक्षकांसाठी खुलं असतं. हे संग्रहालय असं काही भारावून सोडतं की रुपये 200 हे शुल्क म्हणजे, बस एक कागज की पत्ति!
संग्रहालयात काही मोहक पुरातन कलाकृति सुरक्षित ठेवलेल्या आहेत. तशीच पूर्वीच्या धाटणीची काचेची भांडी व सामान आहे. पण अभियंत्यांची नजर टिकते ती अर्धा किलो वजनाने प्रभावरत झालेल्या दाबामुळे टिकटिकणार्या या घड्याळावर.
दुधाळ काचेच्या साच्यातलं आणि GIPR चं बोधचिन्हं अंकित केलेलं झुकझुकगाडीचं जनित्रं म्हणजे इंजिन बघतांना त्याची शिट्टी कानात घुमतेय असा भास होईतो विविध रेल्वेमार्गांच्या जाहिरातींमधे हरवायला होतं. इथून ते थेट पश्चिमी पंजाब म्हणजे आताच्या पाकिस्तानी पंजाब पर्यंत खोलवर शीळ घालणारी डेक्कन क्वीन पाहून तिच्या प्रेमात कोणी हरखायचा राहिला तरच नवल!
तिकिट खिडकी जरी जागा टिकवून असली तरी अंतर्गत रंगरंगोटी नाविन्य दर्शवते आणि तिथेच असलेल्या या विलक्षण छायाचित्रात गाडी हाकणारं इंजिन आणि देश हाकलेले तीन तीन पंतप्रधान एका चौकटीत बंदिस्त होऊन गतकाळाबद्दल उत्सुकता वाढवतात. गांधीटोपी धारी हसतमुख असे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, गांधीटोपीधारी कणखर लालबहादुर शास्त्री आणि नेहरूंचे नातू असलेले, त्यावेळी बालवयातले राजीव गांधी.
रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर रुबाबदार स्वागत करतो तो हा प्रचंड राजेशाही सिंह. त्याने आपल्या बलशाली पंजांमधे ब्रिटिश राजमुद्रा आणि रेल्वे इंजिनाचं बोधचिन्ह सुखरूप धरून ठेवलंय, हो अजूनही! तो त्यात व्यस्त असल्याचं पाहून बाजूला बघितलं गेलं की हा वीरपशु खडा भाला घेऊन अघोरी ताकदींपासून या ठिकाणाचं संरक्षण करतांना दिसतो.
भिंतींवर कोरलेले परस्परांना ढुश्श्या मारणारे हे पशू लक्षवेधक आहेत. या वास्तूच्या भिंती, दारं आणि छतांवर वनराई आणि वनचर पुनः पुन्हः दृक्गोचर होतात आणि वास्तुरुपी शिल्पाला सूसूत्रता आणतात. हे पशु भारतीयत्वाची द्वाही देतात, खासकरून भारतीय राष्ट्रीय पक्षी मोर या भावनेचं नेतृत्व करतो.
मुख्य प्रवेशद्वाराकडे मोहरा वळवला की द्वाराच्या आधीच हे बैठे वाघ सिंह आपलंच अवलोकन करतांना दिसतात. सिंह ब्रिटिशांचा प्रतिनिधि तर वाघ हिंदुस्थानचा. नजर वर गेली की पशुमुखी पोकळ आकार इमारती बाहेर डोकावत आधुनिक गाँथिक स्थापत्य शैलीची साक्ष देतात. इमारतीवर पावसावामुळे पडलेल्या पाण्याचा भींतींपासून दूर निचरा करण्याची ही सोय.
घडीव लोखंड किंवा बीड वापरून केलेलं बांधकाम नाजूक, सुबक व कसबी आहे. हे स्थानिक कारागिरांनी भारतातच निर्मित केलंय असं या विषयातले तले तद्न्य मानतात. इमारतीचे बहुतांशी स्तंभ इटालियन मार्बलने पोतलेले आढळतात. मध्यवर्ती असलेल्या अष्टकोनी घुमटाखालून वरपर्यंत जायसाठी वलयाकार जिना आहे. तो 7 फूट रूंद सज्जावर तोलला गेला आहे.
वास्तूचा घनघोर अष्टकोनी घुमट 40 मीटर उंचीपर्यंत डौलाने उभा आहे. त्याच्या आठही बाजू अंतर्गत व बाह्य बाजूंनी तिरप्या तुळयांनी संयुक्तपणे तोललेल्या आहेत. मूळ चौकोनी इमारतीचा घुमटाच्या अष्टकोनाशी मिलाप करण्यासाठी मुघल शैलीच्या महिरपी कामी आणल्या आहेत.
बाह्यांगाने दोन भिंतीचा कोपरा होतो तिथे कड न दिसता गोलाकार उभ्या पोकळ्या केलेल्या दिसतात. ह्या मलमूत्रं विसर्जनासाठी केलेल्या आडोशाच्या खोबणी आहेत, ज्या वापरायला अजूनही तंदुरुस्त आहेत. जागोजागी असलेले गुलाब पाकळ्यांसारखे झरोके वायुविजन करता करता गोथिक वास्तुशास्त्राचा गंध पसरवतात. वास्तु ठिकठिकाणी नक्षी, चित्रं, चिन्हं, मुद्रा यांनी यथोचित सजवलेली आहे. GIPR च्या तीन पूर्वप्रमुखांचे चेहरेही या सजावटीत बेमालूम मिसळतात. महिरपींची भूमिती त्यांच्या पातळीनुसार तीन ठिकाणी तीन वेगळ्या प्रकारांची आहे.
घनघोर घुमटाच्याही वर 14 मीटर उंच उभी विकासदेवता 100 वर्षांच्या वर मुंबईच्या भरभराटीची साक्षी आहे!
मुंबईतील आधुनिक गॉथिक स्थापत्य शैलीबद्दल खूप काही जाणून घ्यायचं आहे! तेव्हा दर्या फिरस्ती ब्लॉगला भेट देत रहा
शब्दांकन – पुरुषोत्तम करमरकर
Aprateem
Interesting information shared in a lucid way
खूप छान माहिती दिली आहे, मुद्देसुद आणी सखोल.