
अलिबागमधील शाळेजवळ छत्री बाग नामक एक आंग्रेकालीन बाग प्रसिद्ध आहे. या बागेत आंग्रे घराण्यातील सदस्यांच्या स्मृतीनिमित्त बांधलेल्या छत्र्या आहेत. आता इथं बरीच पडझड झालेली असली तरीही या दगडी छत्र्यांवरील कलाकुसर पाहण्यासारखी आहे. इथल्या एक एकर परिसरात जवळजवळ २० वृंदावने आहेत परंतु त्यापैकी नक्के कोणते कोणाचे हे मात्र माहिती अभावी लक्षात येत नाही. मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांची समाधी इथेच आहे. दरवर्षी ४ जुलैला त्यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. मुंबईतील नौदलाच्या नाविक तळाला आणि खांदेरी किल्ल्यावरील दीपगृहाला सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नाव देण्यात आलेले आहे. इंग्रज, पोर्तुगीजांसारख्या बलाढ्य नाविक सत्तांना आव्हान देऊन त्यांना वेळोवेळी पराभूत करत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर जरब बसवण्याचे काम कान्होजींनी केले. अलिबागच्या किनाऱ्यावर तर इंग्लिश-पोर्तुगीज संयुक्त फौजेचा पराभव करण्याचा पराक्रम आंग्रेंच्या नावावर आहे.

छत्री बाग जवळच आंग्रे घराण्याचा जुना वाडा, विठ्ठल मंदिर असे अनेक अवशेष पाहता येतात. कान्होजींच्या पत्नी मथुराबाईसाहेब, पुत्र मानाजीराव आणि अनेक आंग्रे कुटुंबियांच्या समाधी या ठिकाणी आहेत. चपला काढून कान्होजींच्या समाधीला नमस्कार/ मुजरा करायला विसरू नका बरं का! दगडातील कोरीव कामाचे नमुने पाहण्याच्या दृष्टीने सगळीच वृंदावने पाहण्यासारखी आहेत.
हा परिसर पवित्र असून इथं स्वच्छ आणि हिरवीगार बाग तयार केली गेली आहे. पर्यटक म्हणून इथं हिंडत असताना या ठिकाणाचं पावित्र्य जपलं पाहिजे. अलिबाग शहरातील भू-चुंबकीय वेधशाळा, समुद्रकिनारा, कुलाबा किल्ला, हिराकोट तलाव अशी अनेक ठिकाणे आवर्जून पाहण्याजोगी आहेत.
Very nice
समाधिजवळ विठ्ठल मंदिर म्हणजे बालाजी मंदिर का?
समाधिसमोर पूर्वी विहिर होती, जिथे आता महाराज्यांचा पुतळा आहे. तसेच समोरृशिवमंदिर आहे.