
काही ठिकाणे अगदी जवळच असतात पण तरीही दुर्लक्षित .. नजरेआड गेलेली असतात.. मग हळूहळू त्यांना दुर्गमता प्राप्त होते आणि परिसरात राहणारे लोकही त्याबद्दल अनभिज्ञ होतात. पण अशीच आडवाटेवरील ठिकाणे हाडाच्या भटक्यांना खुणावत असतात. दापोली शहरापासून जेमतेम १५-१६ किलोमीटर अंतरावर असलेलं सडवे विष्णू मंदिर असंच एक ठिकाण. बहुसंख्य दापोली करांना या ठिकाणाबद्दल कल्पना नाही. दापोलीतून सडवली च्या दिशेने गेले की सडवे गाव लागते. काही घरे आणि एखादी शाळा आपल्याला दिसते. तिथून उतार असलेल्या कच्च्या रस्त्याने ओढ्याजवळ गेले की कोकणच्या इतिहासातील एक रत्न आपल्याला सापडते. आपण नकळत ७००-८०० वर्षे मागे जातो.

ओढ्याजवळ झाडीच्या गर्द हिरवळीत एक नवीन मंदिर आपल्याला दिसते. पण तिथं असलेली जांभा दगडाची दीपमाळ या ठिकाणच्या प्राचीनतेची साक्ष देते. मंदिरात गेल्यावर आपल्याला दिसते अप्रतिम कोरीवकाम केलेली विष्णू मूर्ती.

स्थानिक या मंदिराला लक्ष्मीनारायण मंदिर म्हणतात परंतु मूर्तीच्या हातातील आयुधांचा क्रम पाहून ही मूर्ती केशवाची आहे हे ओळखता येते. हे कसं ओळखायचं तर मूर्तीचा खालचा उजवा हात, वरचा उजवा हात, डावा वरचा हात आणि डावा खालचा हात क्रमाने पाहायचे. त्यातील आयुधांची अद्याक्षरे घ्यायची. इथं पद्म (कमळ), शंख, चक्र आणि गदा असा क्रम दिसतो. म्हणजे पशंचग क्रम. यावरून ही केशव रूपाची मूर्ती आहे हे सांगता येते. (संदर्भ प्राध्यापक देगलूरकर) मूर्तीच्या मागे असलेल्या प्रभावळीवरही अतिशय सुंदर कोरीव काम आहे असे दिसते. या ठिकाणी दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीचे दागिने, गळ्यातील माळा, पायातील वाळे हे सर्व बारकावे नीट पाहायला हवेत.
चार फूट उंच या काळ्या दगडाच्या मूर्तीच्या बाजूलाच एक फूट उंचीही गरुड मूर्ती सुद्धा आहे. त्याची मुद्रा, आभूषणे, उभं राहण्यातील आदर भाव सगळंच जीवित वाटावं इतकं बोलकं शिल्पकाम येथे केले आहे.

या मूर्तीच्या पायाशी असलेल्या दगडी पट्टीवर देवनागरीत लिहिलेला संस्कृत शिलालेख आहे. त्याचा अर्थ असा – विष्णूची मूर्ती सुवर्णकार कामदेवाने केली. उत्तर शिलाहार राजा द्वितीय केशीराज याचा मांडलिक जैत्र सामंत याचा प्रधान देवुगीनायक याने शके ११२७, सोमवार रोहिणी नक्षत्र या दिवशी मूर्तीची स्थापना केली (इसवीसन १२०५ साली मूर्तीची स्थापना झाली) म्हणजे आपल्याला ८१५ वर्षे जुना पुरातत्व वारसा पाहायला मिळाला तर!
कोकणात अनेक ठिकाणी अतिशय अप्रतिम विष्णू मूर्ती पाहता येतात. दापोलीजवळ टाळसुरे मोकल बाग येथे मानाई देवीच्या मंदिरातील भग्न मूर्ती, कोळिसरे येथील लक्ष्मीकेशव, दिवेआगरचा सुंदरनारायण, शेडवई ची विष्णुमूर्ती आणि सप्तेश्वर मंदिरातील विष्णू मूर्ती ही काही ठळक उदाहरणे आहेत. कोकणात आडवाटेवरील ठिकाणांच्या भ्रमंतीचा आनंद घेण्यासाठी आमच्या दर्याफिरस्ती ब्लॉगला नियमित भेट देत रहा ही अगत्याची विनंती.
Pingback: टाळसुरेचा केशव | Darya Firasti
Pingback: बिवलीचा श्री लक्ष्मीकेशव | Darya Firasti