
या ब्लॉगपोस्टच्या प्रायोजक कांचन कोडिमेला जी आहेत. त्यांच्यासारख्या समर्थकांच्या मदतीनेच दर्याफिरस्ती कव्हरेज शक्य झाले.
माडबन या नितांतसुंदर समुद्रकिनाऱ्याजवळच असलेलं मीठगव्हाणे हे गाव. पर्यटकांची गर्दी इथं सहसा होत नाही. या गावात श्री अंजनेश्वर शिव मंदिर आहे. कोकणी पद्धतीच्या स्थापत्याचा उत्तम नमुना असलेलं हे सुंदर देवालय सुमारे तीनशे वर्षे जुने मानले जाते.

मंदिराच्या चारही बाजूला दगडी तटबंदी असून दरवाजावर कौलारू नगारखाना बांधलेला आहे. त्यातून मंदिरात प्रवेश करायचा. आणि कोकणी पद्धतीच्या दीपमाळांचा दिमाख पाहायचा. मी जेव्हा इथं गेलो होतो तेव्हा मागे निळ्याशार स्वच्छ आकाशात दिवसाही स्पष्ट दिसणाऱ्या चंद्रबिंबाने माझे लक्ष वेधून घेतल्याची आठवण आहे.

या मंदिरात असलेलं लाकडी कोरीवकाम फारच देखणं आहे. फुलांच्या वेलबुट्ट्या आणि नाग प्रतिमा अशी विविध शिल्पे इथं कोरलेली दिसतात.
कोकणातील लाकडी बांधकाम असलेली पेशवेकालीन मंदिरे हे कोकणच्या सांस्कृतिक ठेव्यातील एक महत्त्वाचे रत्न आहे असं म्हणता येईल. इथं एका स्तंभावर ब्रम्हदेवाचे शिल्प कोरलेले आहे.

इथेच श्री देव कालभैरवाचे मंदिरही आहे. दोन्ही ठिकाणी नतमस्तक होऊन मग माडबन बाकाळे चे समुद्रदर्शन करायला निघायचे. कोकणातील अशा अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांची भ्रमंती आमच्या या दर्याफिरस्ती ब्लॉगद्वारे तुम्ही करू शकता. तेव्हा नेहमी इथं या ही अगत्याची विनंती. आपल्या मित्रांना, कोकणवेड्या भटक्यांनाही दर्याफिरस्तीबद्दल आवर्जून सांगा बरं का!