
दर्या फिरस्तीच्या महाराष्ट्र टप्प्याचा प्रवास जिथं संपतो किंवा जिथून सुरु होतो ते एक निसर्गरम्य, शांत असं ठिकाण आहे. भौगोलीकदृष्टीने म्हणाल तर महाराष्ट्रात पण राजकीय दृष्टीने गोव्यात. तेरेखोल नदीच्या मुखाशी एका डोंगरावर बांधलेला किल्ला .. त्याचं नावही फोर्ट तिराकोल किंवा तेरेखोल किल्ला. आता आरोंदा गावाजवळ किरणपाणी येथे पूल झाल्याने गोव्यातून इथं येणं खूप सोपं झालं आहे.
तेरेखोल नदीला बांदा नदी म्हणूनही ओळखलं जातं. सुमारे २८ किमी लांब असलेल्या या नदीचं महत्त्व एकेकाळी दळणवळणासाठी विशेष मानलं जात असे. काही अभ्यासकांच्या मते तीर खोल वरून तेरेखोल अशी या नावाची व्युत्पत्ती आहे. या नदीचा उगम मनोहरगड येथे सह्याद्री पर्वत रांगेत होतो आणि पात्रादेवी नावाच्या ठिकाणी ही नदी गोव्यात प्रवेश करते. गोवा राज्यातील ही सर्वात उत्तरेची नदी असून तिला तोरसे, खडशी आणि पेडणे नावाच्या मुख्य उपनद्या आहेत.

हा किल्ला गोवा राज्य पर्यटन विभागाच्या ताब्यात होता तो त्यांनी एका खासगी विकसकाकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये परावर्तित केला आहे. तिथं राहणं महागडं काम असलं तरीही परवडत असेल तर एक दिवस अनुभव घ्यायला हरकत नाही कारण दगडी तटबंदीखाली मस्त नैसर्गिक गारवा अनुभवत इथं पडून राहता येतं.. गोव्याच्या भाषेत ज्याला सुशेगात म्हंटलं जातं… या किल्ल्याची निर्मिती १७व्या शतकात सावंतवाडीचे राजे खेम सावंत भोसले यांनी केली. पुढं १७४६ मध्ये पोर्तुगीज व्हाइसरॉय पेद्रो मिगेल दे अल्मिडा याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीज आरमाराने खेम सावंतांचा पराभव करून हा किल्ला पोर्तुगीज साम्राज्याला जोडला. पूर्वी या किल्ल्यावर १२ तोफांची शिबंदी होती. आता पोर्तुगीज पद्धतीने नवीन बळकट बुरुज बांधले गेले.

या किल्ल्यात सेंट अँथनीचे चर्च आहे आणि समोरच क्रुसावरील येशूचा पुतळा. किल्ल्याचे बुरुज पोर्तुगीज धाटणीचे असून नवीन बांधकामही त्याच शैलीत केले गेले आहे. किल्ल्याच्या उत्तर टोकाला किनाऱ्यापर्यंत बांधलेली संरक्षक तटबंदी आपण पाहू शकतो. तेरेखोल नदीच्या मुखावर पहारा ठेवण्याची कामगिरी हा किल्ला करत असे.

इथं राहणं महागडं असलं तरीही तेरेखोल नदी आणि केरी किनाऱ्याचे सुंदर दृश्य पाहता येईल अशा रेस्तरॉं मध्ये बसून भोजन आणि मदिरापानाचा आनंद घेणे शक्य आहे. ज्यांना किल्ला नुसताच पाहायचा आहे त्यांनाही हा परिसर रजिस्टरमध्ये नोंदणी करून पाहता येतो.

नदी पल्याड केरी नावाचा एक सुंदर समुद्रकिनारा आहे. तिथून फेरीतून गाडी/ दुचाकी घालूनही तेरेखोलला पोहोचता येते. किंवा जर दर्याफिरस्ती गोमंतकातही सुरूच ठेवायची असेल तर तेरेखोल ते केरी असेही जाता येते. गोव्यातील आरंबोळ, अश्वेम, मोर्जे अशा किनाऱ्यांकडे इथून जाता येते. सुमारे दीड तासाच्या प्रवासाने आपण मापसा मार्गे पणजीला जाऊ शकतो आणि दाबोळी येथील विमानतळ सव्वादोन तासांच्या अंतरावर आहे.

गोव्याचा प्रथम भारतीय व्हाइसरॉय डॉ बर्नार्डो पेरेस डिसिल्वा यांच्या नेतृत्वाखाली १८२५ साली इथं एक उठाव झाला आणि पोर्तुगीज राजसत्तेला झुगारून देण्याचा प्रयत्न झाला. परंतु टायगर किलर या उपाधीने प्रसिद्ध असलेल्या कमांडंट डा कुन्हा ने हा उठाव दडपून टाकला. १५ ऑगस्ट १९५४ रोजी गोवा मुक्तिसंग्रामात सहभागी क्रांतिकारी तिरंगा झेंडा घेऊन या किल्ल्यात दाखल झाले आणि त्यांनी इथल्या ध्वजस्तंभावर भारताचा झेंडा फडकवला. पोर्तुगीज सरकारने या सत्याग्रहींना कैदेत टाकले. पण गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात या किल्ल्याला एक विशेष महत्त्व या घटनांनी मिळाले.

या ठिकाणाहून वेंगुर्ला तालुक्यातील स्थळे आणि सावंतवाडी शहर पाहणे सोपे जाते. आंबोली घाटातून उतरून सावंतवाडीला मुक्काम करणे आणि मग सकाळी सकाळी तेरेखोल दर्शनाला जाणे सोपे पडते. तिथं जवळच कनयाळे ची नवदुर्गा, रेडीचे गणेशमंदिर व यशवंतगड किल्ला अशी ठिकाणे पाहता येतात. कोकण किनाऱ्यावरील अशाच मोहक स्थळांची चित्र भ्रमंती करण्यासाठी या संकेतस्थळाला भेट देत राहा.