
शास्त्री नदीच्या दक्षिण तीरावर असलेला जयगड किल्ला तर बहुसंख्य कोकणप्रेमींना माहिती आहेच. पण याचा जोड किल्ला सुद्धा आहे. तवसाळ येथे असलेला विजयगड. शास्त्री नदीच्या मुखाच्या उत्तरेला तवसाळ किनाऱ्यावर खडा पहारा देणारा हा दुर्ग. आज मात्र आपण या किल्ल्याचे अवशेषच पाहू शकतो. हे अवशेष सागरी महामार्गावरच आहेत पण पटकन दिसत नाहीत. जयगड ते तवसाळ फेरी पकडून आपण गुहागरच्या दिशेने सहज जाऊ शकतो. तवसाळ जेट्टीहून निघाले की डाव्या बाजूला तवसाळचा समुद्र किनारा आहे. हा टप्पा पार झाला की चढण येते आणि ही नागमोडी चढण संपताना रस्ता जिथं उजवीकडे वळतो त्याच ठिकाणी डाव्या बाजूला झाडीत आपल्याला चिरेबंदी बुरुज आणि तटबंदीचे अवशेष दिसतात. हाच विजयगड.

या ठिकाणी घडलेल्या ऐतिहासिक घटनांचा काही तपशील उपलब्ध नाही. एक आख्यायिका मला वाचायला मिळाली ती अशी की किल्ला बांधला जात असताना वारंवार बांधकाम पडत होते. तेव्हा किल्ल्यासाठी आणलेले चिरे तपासून पाहिले असता एका चिऱ्यावर गणेश शिल्प दिसले. त्याचा वापर महादरवाजात केल्यानंतर बांधकाम सुरळितपणे पार पडले. (कोकणातील पर्यटन – प्र. के. घाणेकर पृष्ठ क्रमांक ६८) इथं पूर्वी धामणखोल बंदर होते त्याचा हा संरक्षक किल्ला मानला जातो.

तवसाळ गावातील समुद्रकिनारा काळ्या वाळूचा असला तरीही सुंदर आहे. शास्त्री नदीचे मुख, जयगड बंदर आणि त्यामागील जिंदालचा प्रकल्प, किनाऱ्यावरील वाळूत चालताना होणारा थंडगार लाटांचा स्पर्श हे सगळं अनुभवायला तवसाळ ला जरूर जा. या भागात नरवण, रोहिले असे अनाघ्रात समुद्र किनारे आहेत आणि हेदवीची बामणघळ सुद्धा इथून जवळच आहे. या सगळ्या ठिकाणांची चित्र भ्रमंती करण्यासाठी दर्या फिरस्ती साईटला भेट देत राहा.
Pingback: साद रोहिले किनाऱ्याची | Darya Firasti