
The grand elephant at Gharapuri recreated by Amol Thakur
मुंबईच्या परिसरात पुरातन वास्तूंच्या टाइम मशीनमध्ये बसून प्रवास करण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. एके काळी मुंबई शहर मुंबई म्हणून प्रसिद्ध नव्हतं … टॉलेमीने त्याला सात बेटांचे शहर म्हणून हेप्टानेशिया असे नाव ठेवले होते … मुंबईपासून काही मैलांच्या अंतरावर समुद्रात श्रीपुरी म्हणून प्रसिद्ध असे एक बेट होते … व्यापाराची समृद्ध बाजारपेठ म्हणून या शहराची कीर्ती युरोप पर्यंत पोहोचली होती … इथल्या गजांत लक्ष्मीचे प्रतीक म्हणून कदाचित बांधलेला एक प्रचंड दगडी हत्ती अनेक शतके या बेटाची ओळख होता. आजही आपण त्या बेटावर सफर करायला जाऊ शकतो .. विश्व वारसा स्थळांच्या यादीत जागा पटकावलेलं बेट घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेण्यांबद्दल माहितीसाठी हा ब्लॉग वाचा. आज आपण तिथं पश्चिमेकडील टेकडीवर असलेल्या घारापुरी किल्ल्याला भेट देणार आहोत.

Elephanta seen from ferry
एलिफंटा लेण्यांची निर्मिती जोगेश्वरी नंतर ५० वर्षांनी म्हणजे सहाव्या शतकाच्या सुरुवातीला झाली (स्टोरीज इन स्टोन – डॉक्टर सूरज पंडित) सातवाहन आणि वाकाटक काळातील महत्वाचे व्यापारी ठाणे इथे होते. उत्तर कोकणची राजधानी म्हणून पुढे प्रसिद्ध झालेल्या या पुरी बेटावर इसवीसनपूर्व दुसऱ्या ते चौथ्या शतकात रोमन जहाजे येत असत हे इथं सापडलेल्या रोमन कुंभावरून सिद्ध झाले आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या जेटीवरून सकाळची पहिली बोट पकडून आम्ही निघालो … सोबतीला अनेक सीगल पक्षी होतेच … मुंबई बंदरातून बाहेर पडलेल्या आणि नांगर टाकायला जागेची वाट पाहणाऱ्या अनेक अजस्त्र बोटी सभोवार दिसत होत्या … एका प्रचंड बोटीने माझं लक्ष वेधून घेतलं! आम्ही नशीबवान कारण काहीच दिवसात नौदलातून निवृत्त केल्या जाणाऱ्या आयएनएस विराटचं दर्शन आम्हाला झालं.

INS Virat
बोटीने सुमारे सव्वा तास प्रवास केल्यावर जवाहर द्वीपाला वळसा घालून घारापुरी बेटाच्या जेट्टीला आपली लाँच पोहोचते. कांदळवनांनी म्हणजे मॅन्ग्रोव्हजनी या बेटाला वेढले आहे. विमानातून मुंबईत येत असताना कधीकधी न्हावा-शेवा बंदराच्या शेजारीच या बेटाचे दर्शन होते. बेटाच्या मध्यभागी दोन टेकड्या आहेत त्यापैकी पश्चिमेकडील टेकडीच्या पायथ्याशी लेणी आहेत. जेटीपासून सुमारे १०-१२ मिनिटे चालत गेल्यावर आपण गुफांपाशी पोहोचतो. वाटेत दुतर्फा दुकानांच्या रांगा आहेत. सुमारे १२०० कोळी समाजातील लोक इथले रहिवासी असून फक्त त्यांनाच इथे मुक्काम करता येतो. पर्यटकांना राहण्याची परवानगी नाही.

Elephanta and JNPT port, clicked from a flight about to land in Mumbai
जेटीकडून लेण्यांकडे पायऱ्यांची वाट जाते. पायऱ्या आणि दुकाने संपली की डाव्या बाजूला लेणी आहेत तर उजव्या दिशेला MTDC उपहारगृहाच्या बाजूने अजून काही पायऱ्या चढून पश्चिमेकडील टेकडी चढता येते. ही वाट दहा-पंधरा मिनिटांच्या सोप्या चढणीने आपल्याला किल्ल्याच्या परिसरात घेऊन जाते. इथं प्राचीन काळात बांधल्या गेलेल्या किल्ल्याचे अवशेष सापडत नाहीत. पोर्तुगीजांच्या ताब्यातील घारापुरी पुढे मराठ्यांकडे आले आणि नंतर त्यावर इंग्लिशांही सत्ता होती. आता आपल्याला दिसणारे बांधकाम हे ब्रिटिशांनी मुंबईच्या रक्षणासाठी बांधलेल्या किल्ल्याचे आहे. किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष पाहत टेकडीचा माथा गाठला की दिसते एक प्रचंड तोफ. ही तोफ ३५ फूट लांब असून ३६० अंश कोनात ती वळवता येईल अशी रचना इथं केलेली दिसते.

Canon on West Hill

fortification
पुढे हे ठिकाण पोर्तुगीजांच्या ताब्यात आले १५३४CE ला तेव्हा इथं वस्ती नव्हती. त्यांनी इथं बरीच नासधूस केली. अनेक शिल्पांवर बंदुका डागून त्यांना विद्रुप केलं गेलं. जॉन फ्रायर, ओविंग्टन सारख्या अनेक ब्रिटिश प्रवासी बखरकारांनी पोर्तुगीजांना इथे विध्वंस करण्यासाठी जबाबदार धरले आहे. डे कूटो ने सुद्धा याची पुष्टी केली आहे. सहाव्या गुंफेचं चर्चमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचीही नोंद सापडते. मंडपेश्वरला तसं झालंही आहे. १५५०CE ला इथं गुरांचे गोठे आणि साचलेले पाणी दिसले असं गारचिया दि ओर्टाच्या लिखाणात सापडतं. घारापूरीला सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज येऊन गेल्याचं सांगितलं जातं.

View from Gun Hill
रायगड जिल्हा गॅझेट मधील माहितीप्रमाणे या तोफा इथं १९०४ आणि १९१७ साली बसवल्या गेल्या. दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तिथून राजबंदर आणि पुरी गावाचं सुंदर दृश्य दिसतं. मागे लगेचच नाव्हाशेवा बंदराच्या क्रेनही दिसतात. या बेटाला गोड्या पाण्याचा पुरवठा एका प्राचीन झऱ्याने केला जातो जो आजही वाहता आहे आणि त्यावर बांध आहे. तोफांच्या खाली त्यांना फिरवता यावे म्हणून काही जागा आहे. ती पाहावी म्हणून पायऱ्या उतरलो तर आम्हाला कुतूहल जागृत करेल असे काही सापडले. तोफांना लागणार दारुगोळा ठेवण्यासाठी आणि सैनिकांना बॅरॅक्स म्हणून इथं भुयारांची रचना आहे. काही ठिकाणी झरोके खोदून हवा आणि प्रकाश खेळता ठेवण्याची व्यवस्था केलेली दिसते. दुर्दैवाने आज या ठिकाणी पर्यटकांनी बराच कचरा केलेला दिसतो.

opening for light

Passage under cannon
या भुयारांबद्दल अधिक अंदाज तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. शत्रूवर भडिमार करताना दारुगोळा आणायला आणि दोन मोर्चाच्या मध्ये ये जा सुरक्षितपणे करता यावी म्हणून कदाचित ही भुयारे बांधली गेली असावीत. मुंबईच्या आसपासच्या समुद्रावर टेहेळणी करायला या ठाण्याचा उपयोग होत असावा असं वाटतं. तेव्हा एलिफंटा कसं असेल याची थोडीफार कल्पना काही ब्रिटिश चित्रकारांच्या चित्रांतून येते. ही सर्व लेणी आज भग्न असली तरीही त्यांचं सौंदर्य आपल्याला मोहित करतं. त्या कारागिरांनी काय हत्यारे आणि संदर्भ वापरून हे सर्व घडवलं असेल असा विचार करून स्तिमित व्हायला होतं.

Drawn by Sir Harry Francis Colville Darell

Elephant at Raj Bandar
या द्वीपाचे नाव ज्या हत्तीवरून पडले तो हत्ती इथून नेण्याचा प्रयत्न केला गेला. क्रेन तुटली व मूर्ती पडून भंगली. या अजस्त्र दगडी हत्तीला जमेल तसे जोडून भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या आवारात राणीच्या बागेजवळ ठेवण्यात आले आहे. पुरी बंदरात हा हत्ती कसा दिसत असेल याचा अंदाज आपल्याला ब्रिटिशकालीन चित्र पाहून काही प्रमाणात येतो.
संदर्भ –
भारताचे संस्कृती वैभव – शोभना गोखले,
रायगड जिल्हा गॅझेट
Stories in Stone – Dr. Suraj Pandit,
Cultural Heritage of Mumbai – Dr. M K Dhavalikar,
Elephanta – George Michell