
छत्रपती शिवरायांच्या आरमाराच्या प्रमुखांपैकी एक नाव म्हणजे मायाजी भाटकर म्हणजेच मायनाक भंडारी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणग्राहकतेने अनेक सोन्यासारखी माणसे जोडली गेली. त्यांच्या कर्तृत्वाला मराठेशाहीत वाव मिळाला. नाविक युद्ध परंपरेला पुन्हा संजीवनी देणाऱ्या शिवरायांना कोकणातून अशी झुंजार माणसे शोधावी लागली. या मायनाक भंडारींची समाधी त्यांचे गाव भाट्ये येथे आहे. रत्नागिरी शहराच्या दक्षिणेला काजळी नदी ओलांडताच हे छोटेसे गाव लागते. नारळ संशोधन केंद्राची बाग आपण समुद्राला लागून जाणाऱ्या रस्त्याने पाहू शकतो. काजळी पूल उतरताच डावीकडे खाडीलगत काही अंतर जाऊन मग उजवीकडे गावाला जाऊन मिळणार रस्ता आपल्याला दिसतो. तिथेच आत ही समाधी आहे. ही जागा खासगी मालमत्तेत असल्याने परवानगी घेऊनच आत जावे.
मायनाक भंडारींच्या नेतृत्वाखाली मराठा आरमाराने अनेक पराक्रम केले. खांदेरी किल्ल्याच्या लढाईत त्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका होती.
जंजिऱ्याचा सिद्दी हा मराठ्यांचा शत्रू. त्याला मुंबईत आसरा मिळत असे आणि मदतही मिळत असे. इंग्लिशांच्या ताब्यातील मुंबई बंदरातील व्यापार वाढू लागला होता त्यामुळे इथं मराठ्यांचा वचक बसणे अतिशय आवश्यक होते. मुंबईपासून ३० किलोमीटर अंतरावरील या बेटावर १६७२ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला पण इंग्लिशांच्या विरोधामुळे तो फसला. पुढे २७ ऑगस्ट १६७९ रोजी मराठ्यांनी खांदेरी ताब्यात घेतले व तिथं ४०० माणसे आणि ६ तोफा तैनात करून किल्ला बांधायला घेतला.
२ सप्टेंबरला थळ हून सामान आणि मजूर आले व किल्ला बांधायला सुरुवात झाली. कल्पना करा की जिथं आजही पावसाळ्यात नौका घेऊन जायला लोक धजावत नाहीत तिथं शिवरायांचे आरमार किल्ला बांधत होते. इंग्लिशांनी हे बेट आमचे आहे आणि तुम्ही निघून जा अशी धमकी दिली आणि बेटाला वेढा घातला पण मायनाक भंडारी या नौदल अधिकाऱ्याने मी छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक असून फक्त त्यांचीच आज्ञा मानतो असे खमके उत्तर दिले आणि बांधकाम सुरूच ठेवले. इंग्लिशांनी आरमारी शक्ती वापरून त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण पुढे वारंवार त्यांना अपयशच आलेले दिसते.
१) इंग्लिशांनी एन्लाईन डॅनियल ह्युजेस च्या नेतृत्वाखाली तीन शिबाडे (मोठी लढाऊ जहाजे) पाठवून किल्ले बांधणी करणाऱ्या मराठ्यांची नाकेबंदी सुरु केली.
२) १५-१७ सप्टेंबर १६७९ ला वादळी हवामानातही मराठ्यांना रसद मिळणे थांबले नाही. ८ गुराबांची कुमक त्यांना मिळाली असे दिसते.
३) इंग्लिशांनी रिव्हेंज युद्धनौका व दारुगोळा पाठवला
४) १९ सप्टेंबरला आरमारी युद्ध झाले आणि तीन इंग्लिश अधिकारी मारले गेले व त्यांचे जहाज मराठ्यांच्या ताब्यात आले
५) रिचर्ड केग्वीन नावाच्या सरखेलाची नेमणूक इंग्लिशांनी केली आणि तो ऑक्टोबरमध्ये खांदेरी ताब्यात घेण्यासाठी हल्ला करू लागला.
६) १८ ऑक्टोबरला मराठ्यांनी केग्विन वर आरमारी हल्ला केला. वाऱ्याची साथ होती तोवर झुंज झाली आणि वारा पडताच हे आरमार नागावच्या खाडीत पसार झाले. केग्विनचे गुराब आणि पाच तारवे मराठ्यांनी ताब्यात घेतली.
७) फॉरचून सारखी युद्धनौका पाठवूनही इंग्लिश हल्ल्याला यश आले नाही. आणि डेप्युटी गव्हर्नर जॉन चाईल्डने अण्णाजी पंडिताशी तह करून मराठ्यांचे स्वामित्व स्वीकारले व आपल्या कैद्यांची सुटका करून घेतली.
खांदेरी किल्ल्याबद्दलचा स्वतंत्र ब्लॉग आपण इथं वाचू शकता.
तर मित्रांनो कोकणातील अशा विलक्षण ठिकाणांची चित्र भ्रमंती करण्यासाठी आमच्या दर्या फिरस्ती ब्लॉगला नियमितपणे भेट द्या बरं का आणि तुमच्या मित्रांना, आप्तेष्टांनाही दर्या फिरस्तीबद्दल सांगा ही अगत्याची विनंती.
Pingback: भाट्ये समुद्रकिनारा | Darya Firasti