
रत्नागिरी शहरातून दक्षिणेला सागरी महामार्गाने निघायचे. हा प्रवासच मोठा रम्य आहे. पावस, कशेळी, आंबोळगड अशी कितीतरी सुंदर ठिकाणं या मार्गावर पाहता येतात. मराठ्यांच्या इतिहासात कोकण किनारपट्टीचे स्थान फार महत्त्वाचे. सर्व खाड्यांच्या मुखाशी दुर्ग बांधून जलवाहतूक आणि व्यापारावर पहारा ठेवणे हे महत्त्वाचे. मुचकुंदी नदी जिथं समुद्राला जाऊन मिळते तिथं उत्तरेकडील टोकाला एका ५० मीटर उंच टेकडीवर एक छोटेखानी पण रेखीव दुर्ग आहे. तो म्हणजे किल्ले पूर्णगड.

या मुचकुंदी नदीतून साटवली पर्यंत बोटी वाहतूक करत असत. डॉम जोआओ कॅस्ट्रोने या नदीला बीटल रिव्हर असं नाव ठेवलं कारण इथं सुपारीचे उत्पादन, व्यापार आणि वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालत असे. नदीच्या पलीकडे काळसर वाळू असलेला गावखडीचा किनारा आहे. इथं आता ऑलिव्ह रिडले कासवांचं संवर्धनही केलं जातं. अशा परिसरात इतिहास आणि निसर्ग या दोहोंचा अनुभव घेण्यात आपण मग्न होऊन जातो.

किल्ल्याच्या पायथ्याशी छोटेसे गाव आहे. गावातूनच पायवाट १० मिनिटांच्या चढाईने आपल्याला किल्ल्यापर्यंत घेऊन जाते. किल्ला चढण्यापूर्वी गावातील सिद्धेश्वराचे मंदिर जरूर पाहावे असे आहे. पेशवेकालीन बांधणीच्या या मंदिरात महादेवाला नमन करून मग पुढं निघायचे.
किल्ल्यावर आपले स्वागत करतो तो महादरवाजा. अजूनही भक्कम असलेला हा दरवाजा द्वारशिल्पांनी नटलेला आहे. दाराच्या आत पहारेकऱ्यांसाठी बांधलेल्या देवड्या आहेत. इथं कमळ फुले आणि गणेश प्रतिमा दिसते. जांभा दगडातील हे बांधकाम निरखून पाहण्याजोगे आहे.

साधारणपणे चौकोनी आकार असलेला हा किल्ला आटोपशीर आहे. आतमध्ये जुन्या बांधकामांचे अवशेष, जोती वगैरे दिसतात. तटबंदीवर चढून जायला पायऱ्या आहेत. तटावर चढलं की गडफेरी करता करता संपूर्ण परिसर न्याहाळून पाहता येतो. ठिकठिकाणी तोफा ठेवण्यासाठी जंग्या आहेत. मुचकुंदी नदीचे मुख आणि गावखडीचा सुंदर समुद्रकिनारा इथून न्याहाळता येतो.

किल्ल्याच्या पश्चिम बाजूला सागराकडे उघडणारा दरवाजा आहे. इथं तटबंदी ढासळली होती, पण पुरातत्व खात्याने ती बांधून काढली आहे. मी गेलो तेव्हा इथं संवर्धनाचं काम सुरु होतं. दरवाजातून बाहेर पडून ही तटबंदी आणि दाराचे रेखीव बांधकाम नीट पाहता येते.
काही जण सांगतात की हा किल्ला शिवकालीन आहे. परंतु आंग्रे शकावलीतील नोंदीनुसार सरखेल कान्होजी आंग्रेंनी १७२४ मध्ये हा किल्ला आणि जयगड बांधला अशी माहिती सापडते.

१७३२ मध्ये किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता आणि हरबारराव धुळप तिथले शासक होते. त्यांनी तिथं भोसले, गवाणकर, कनोजे, आंब्रे अशा काही कुटुंबांची नेमणूक केली, यांचे वंशज आजही तिथं राहतात. (रत्नागिरी जिल्ह्याची दुर्गजिज्ञासा पृष्ठ ६१ – सचिन विद्याधर जोशी – बुकमार्क पब्लिकेशन) मुचकुंदी नदीच्या पाण्यात पीरबाबाचा दर्गा आहे. नदीपात्रातील हे बांधकाम फार मोहक दिसते
कोकणातील ऐतिहासिक स्थळांची ससंदर्भ माहिती आणि चित्र भ्रमंती करण्यासाठी आमच्या दर्या फिरस्ती ब्लॉगला नियमितपणे भेट देत रहा आणि तुमच्या कोकणवेड्या मित्रांबरोबरही हा ब्लॉग शेयर करा ही विनंती.