
समुद्र म्हणजे जणू निसर्गाचं स्थितप्रज्ञ, प्रशांत रूप. कधी हे रूप रौद्र तांडव अवतारही धारण करतं पण बहुतेक वेळेला ध्यानमग्न आणि स्तब्धच असतं. पण या रूपाचे वर्णन शब्दांच्या आवाक्यातले नाही. कोकणातील शेकडो किलोमीटर लांब किनारपट्टीवर कोसाकोसाला सागर सौंदर्याचे नवीन दर्शन होत राहते. रत्नागिरीजवळ असलेल्या गणेशगुळे किनाऱ्याची सोबत मनातल्या कवीला जागृत करणारी.. स्वच्छ सुंदर रेशमी वाळूवर चालता चालता फेसाळणाऱ्या लाटांना समांतर चालत या चंद्रकोरीच्या आकाराच्या किनाऱ्याला गवसणी घालायचा प्रयत्न करायचा. सड्यावरून उतरून किनाऱ्याला आलेल्या या वाटेवर मिळणारी उसंत अनुभवत मुग्ध व्हायचं.

रत्नागिरीहून सागरी महामार्गावरून दक्षिणेला पावसकडे निघाल्यानंतर रानपार जेटीच्या पलीकडे पोहोचले की उजव्या बाजूला एक फाटा येतो तो आपल्याला गणेशगुळेला घेऊन जातो. वाटेत स्वयंभू गजानन मंदिर आणि एक दगडी विहीर लागते. त्याची गोष्ट आपण स्वतंत्र ब्लॉगमध्ये पाहूच. किनारा सहसा पर्यटकांनी गजबजलेला नसतो. एखाद दुसरं कोणी येऊन लाटांवर खेळत मौज करत असतं. सकाळच्या वेळेला स्वच्छ शुभ्र वाळू चमकत असते आणि हा स्पर्श सुखद ऊब देणारा असतो.

किनाऱ्याजवळ असलेल्या गावात नारळ सुपारी आंब्याच्या बागा आहेत. त्यातून चालत असताना झाडांतून झिरपणारी सूर्यकिरणे अंगावर झेलत ऊन सावली अनुभवत मन तृप्त होते. कितीही वेळ इथं थांबलं तरीही कंटाळा येणार नाही हे नक्की. बॅगेत पुस्तके भरून चार-पाच दिवस निवांत राहायला इथं यायचे. सागर सावलीत मोक्ष अनुभवायचा.. असे हे कोकणातील एक सागरस्वप्न.